सह्याद्रीचे वारे - १६७

प्रगतीचें पहिलें पाऊल

महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या आजच्या या मंगल प्रसंगी तुमच्यासमोर बोलतांना मला अतिशय आनंद होत आहे. एका अर्थी महाराष्ट्र राज्य आज अवघे एक वर्षांचें आहे, तर
दुस-या आणि अधिक खोल व व्यापक अर्थानें महाराष्ट्र हा भारताचा हजारों वर्षांपूर्वीपासूनचा एक भाग आहे. भारताचा एक अविभाज्य भाग म्हणून महाराष्ट्राच्या कांही थोर परंपरा आहेत, कांही अधिकार आहेत, पण त्याचबरोबर त्याच्या कांही जबाबदा-याहि आहेत. आपणां सर्वांची मायभूमि असलेल्या भारताचा महाराष्ट्र हा बलशाली व सामर्थ्यवान घटक बनविण्याची आजच्या या शुभप्रसंगी आपण प्रतिज्ञा करूं या.

एक वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटन प्रसंगी सरकारच्या वतीनें मी कांही अभिवचनें दिली होती. आपल्याला पुढें ज्या भूमिकेवरून कार्य करावयाचें आहे त्याचीं कांही तत्त्वें व धोरणें मीं त्या वेळीं सांगितली होतीं. त्या प्रसंगीं मी दिलेली आश्वासनें व अभिवचनें नुसतीं आश्वासनें व अभिवचनेंच नव्हती. त्यांच्या पूर्ततेच्या दिशेने महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या वर्षांत कसोशीचे प्रयत्न करण्यांत आले आहेत. आजच्या प्रसंगी, केलेल्या प्रगतीचा आढावा घेणें व पुढें करावयाच्या कामाची पुन्हा एकदां उजळणी करणें उचित ठरेल. आपणां सर्वांना माहीतच आहे कीं, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली ती कांही भारतापासून महाराष्ट्राचें वेगळें अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नव्हे, तर राज्यांतील लोकांना आपल्या राज्यकारभारांत अधिक सुलभ रीतीने भाग घेतां यावा यासाठींच होय, अशा रीतीनें त्यांना केवळ आपल्या राज्याच्याच नव्हे तर सर्व देशाच्या प्रगतीस अधिक परिणामकारक रीतीनें हातभार लावतां येईल. महाराष्ट्र जेवढा अधिक सामर्थ्यवान व समृद्ध होईल तेवढा भारतहि अधिक सामर्थ्यवान व समृद्ध होईल. एकभाषी राज्याच्या कल्पनेमागील प्रेरक शक्ति हीच आहे असें मी मानतों.

लोकांची भाषा ही राज्यकारभाराची भाषा व्हावी ही अगदीं स्वाभाविक अपेक्षा आहे. तसें झालें तरच लोकांना आपले नित्य व्यवसाय व कामें आपल्या मातृभाषेंतून करतां येतील, आपल्या अडचणी व प्रश्न सरकारपुढें बिनदिक्कत मांडतां येतील आणि साहित्य, कला, इत्यादींतून आपला सांस्कृतिक विकास घडवून आणतां येईल. या विचारानेंच सरकारनें डायरेक्टोरेट ऑफ लँग्वेज म्हणजे भाषा मंडळाची स्थापना केली आणि इंग्रजींतून चालणारा राज्यकारभार मराठींतून चालविण्याकरितां आवश्यक ती भूमिका तयार करण्याचें काम त्याच्याकडे सोंपविले. राज्य सरकारचें माध्यम म्हणून मराठीला स्थान देण्याची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने शब्दकोश व इतर मार्गदर्शक ग्रंथ तयार करण्याकरितां एक भाषा सल्लागार मंडळ स्थापण्यांत आलें आहे. तसेंच, महाराष्ट्रातील साहित्य, इतिहास व संस्कृति यासंबंधीं संशोधन करण्याकरितां एक वेगळ्या  मंडळाची स्थापना करण्यांत आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनें ज्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनास चालना मिळाली त्याला आपल्याकडून सर्वतोपरी साहाय्य करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. तथापि राज्यांत इतर भाषा बोलणारे जे मोठे व महत्त्वाचे गट आहेत त्यांची यामुळें कोणत्याहि प्रकारें कुचंबणा होणार नाही असें आश्वासन सरकार त्यांना देऊं इच्छितें, तेव्हां महाराष्ट्र राज्याच्या या महान मंदिरांत भाषा, वंश, धर्म वा जात असा कोणत्याहि प्रकारचा भेदाभेद न होतां सर्वांना समान स्थान राहील.

खुद्द महाराष्ट्रांत ऐक्याच्या भावनेची आज किती आवश्यकता आहे हें मी वेगळें सांगण्याची गरज नाहीं.. निरनिराळ्या शासनांखाली राहिल्यामुळें व निरनिराळ्या ऐतिहासिक घटनांमधून गेल्यामुळें मराठी भाषिकांची अनेक शतकें ताटातूट झाली. या अनेक शतकांच्या ताटातुटीनंतर ते एकत्र आले तो दिवस त्यांच्या जीवनांतील सोनियाचा दिवस होता. असा हा सुवर्णकाल सुरू झाल्यानंतर आपली शक्ति व साधनसामुग्री क्षुद्र गोष्टींवर फुकट दवडणें केवळ मूर्खपणाचेंच ठरेल - मग अशा क्षुद्र गोष्टी वरपांगी कितीहि महत्त्वाच्या वाटोत. सबंध भारताप्रमाणेंच सबंध महाराष्ट्र हा एक आहे आणि कोणत्याहि एका भागाची प्रगति व भरभराट ही दुस-या एखाद्या भागास तोशीस लावून होऊं शकणार नाही अशी महाराष्ट्र सरकारची धारणा आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org