सह्याद्रीचे वारे - १६६

तथापि, माणसाने आपल्या जीवनांतील वास्तवता लक्षांत घ्यावयास हवीच. निव्वळ स्वप्नसृष्टींत कांही आपण वावरूं शकत नाही. ध्येयवादी वृत्तीने कार्य करीत असतांना स्वप्नाळू श्रद्धा उपयोगी पडत नाहीं. जीवनांतील कटु सत्यावर प्रकाश टाकणा-या व वास्तवतेची झळ कमी करणा-या हास्यरसाची जोड त्याला हवीच. गंभीर गोष्टींकडे सुद्धां कांहींशा स्मित वदनानें पाहतां येण्याएवढा सोशीकपणा अंगीं असावयास हवा. रोजच्या व्यवहारांत अशा वृत्तींने जर आपण काम करूं शकलों तर क्षणाक्षणाला जीवनाचा आनंद आपल्याला लुटतां येईल. विख्यात लेखक लिन युतांग ह्यानें मानवी रहस्य सांगितले आहे. तो म्हणतो, ''जीवनांतील वास्तवता ध्यानांत घेऊन ध्येयवादी प्रवृत्तीनें कार्य करणारा व येणा-या अडचणींना हसत हसत तोंड देणारा गृहस्थच खरा ज्ञानी होय.'' वास्तवता, स्वप्नसृष्टि व हास्यरस ह्या तीन गोष्टींचे एकत्र मिश्रण म्हणजेच ज्ञान होय, असें त्यानें जीवनाचें गणित मांडले आहे. हें गणित संपूर्ण बरोबर आहे की नाही तें मी सांगूं शकणार नाही. पण मला वाटतें, त्यांत पुष्कळसा अर्थ आहे.

कांही तरी नवें शोधावें व जें सांपडले त्यांत रस घ्यावा अशा प्रवृत्तीने आपण जीवन जगलों तरच त्याला जगणें म्हणतां येईल. ह्यांत काय आहे? त्यांत काय आहे? अशा तुसड्या वृत्तीने आपण जर प्रत्येक क्षण वाया घालविला तर जीवनाचा लपंडाव आपण हरलोंच असें समजावयाला हरकत नाहीं. जीवनांत जे सुखाचे क्षण येतात ते सूर्याच्या कोंवळ्या किरणांसारखे सोनेरी व सतेज असतात. ते क्षणभर राहतात आणि नंतर कडक होतात. परंतु ज्या वेळी हे किरण कोंवळे दिसतात त्या वेळी त्यांचे तें तेज, तें रम्य स्वरूप पाहून मनाला आल्हाद वाटतो, गंमत वाटते. नदीच्या खोल डोहांत दगड टाकला कीं, पाण्यावर तरंग उठतात, एकांतून एक अशी वर्तुळे उठतात, आणि पाहणा-याला मोठी मजा वाटते. जंगलाच्या वाटेनें जात असतांना उन्हाच्या वेळी एखादा झरा दिसला कीं, त्याचें पाणी पितांना केवढा आनंद होतो. एवढेंच कशाला, ओढ्याच्या काठी भरगच्च जांभळांनीं भरलेल्या झाडाचीं चार जांभळें तोंडांत टाकलीं की तीं किती गोड लागतात. बाजारांतून विकत आणलेल्या जांभळांना त्या गोडीची सर थोडीच येणार! जीवनामधील आनंदाचे क्षण हे असे असतात.

जुन्यापासून बोध आणि नव्याचा शोध घेत घेत जाणारा हा मानवी जीवनप्रवाह आहे. ह्या प्रवाहांत प्रवाहपतित न बनतां सुजाणपणे मार्ग आक्रमीत जाणें व जगण्याचा आनंद लुटणें हा एक छोटासा आदर्श माझ्यापुढें आहे. हाच माझा खरा विरंगुळा आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org