सह्याद्रीचे वारे - १६३

महाराष्ट्र सरकारकडून हिंदी भाषेच्या अध्ययनास व अध्यापनास योग्य ते प्रोत्साहन दिलें जातें. महाराष्ट्र शासनाच्या नोकरवर्गाला हिंदीचा चांगल्या प्रकारें परिचय व्हावा म्हणून हिंदीच्या कांहीं परीक्षा उत्तीर्ण होणें त्यांच्या बाबतींत आवश्यक करण्यांत आलें आहे. त्याचप्रमाणें कांहीं हिंदी परीक्षांना इतर शैक्षणिक परीक्षांच्या बरोबरीची मान्यताहि देण्यांत आली आहे. शाळांतून हिंदी शिक्षणाची योग्य ती व्यवस्था करण्यांत आली आहे. अशा प्रकारें महाराष्ट्र राज्यांत हिंदीचा प्रसार वाढविण्यासाठीं आवश्यक तें कार्य करण्यांत येत आहे.

मुंबई प्रांतिक राष्ट्रभाषा प्रचार सभा हिंदीच्या प्रसारासाठी प्रशंसनीय कार्य करीत असून गेली पंचवीस वर्षे हिंदीची सेवा करीत असलेल्या वर्ध्याच्या राष्ट्रभाषा प्रचार समितीशीं ती निगडित आहे. या समितीच्या परीक्षांना भारत सरकार, मुंबई सरकार आणि इतर राज्य सरकारांनीं व विद्यापीठांनीं मान्यता देऊन तिचा सन्मान केला आहे. वर्ध्याच्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचें कार्यक्षेत्र या देशांत तसेंच परदेशांत सुद्धां फैलावलेलें आहे. या समितीच्या अंतर्गत सुसंघटित अशा बारा समित्या कार्य करीत आहेत. मुंबई प्रांतिक राष्ट्रभाषा प्रचार सभेचें कार्यक्षेत्र मुंबई शहर व उपनगर यांपुरतेंच मर्यादित असलें तरी ह्या संस्थेकडून आतां बरीच प्रगति होत आहे. या संस्थेच्या प्रेरणेनें दरवर्षी हिंदी परीक्षांना बसणा-यांची संख्या आज सत्तावीस हजारांपेक्षां अधिक झाली असून या संस्थेमार्फत चालविण्यांत येणा-या शिक्षणकेंद्रांची संख्या आतां दोनशें पंधरापर्यंत वाढली आहे. जवळ जवळ एक हजार निःस्वार्थी कार्यकर्ते राष्ट्रभाषेचे प्रचारक बनून या शिक्षणकेंद्रांतून सेवावृत्तीनें हिंदीच्या अध्यापनाचें कार्य करीत आहेत ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यकर्त्यांच्या अविश्रांत प्रयत्नानेंच या बहुभाषी मुंबईत हिंदीच्या प्रसाराचें कार्य दिवसेंदिवस वाढत जाईल यांत शंका नाहीं.

आमच्यासमोर प्रत्यक्ष लोकमान्य टिळक व विनोबाजी भावे यांचे आदर्श आहेत. लोकमान्यांना सुरुवातीस हिंदी येत नव्हतें. परंतु आपल्या देशभक्तीमुळें आणि आपल्या स्वदेशाभिमानामुळें राष्ट्रभाषा हिंदीचें त्यांनीं ज्ञान करून घेतलें आणि पूर्ण विचारांती हिंदी हीच सबंध देशाची भाषा होऊं शकेल या निर्णयाप्रत ते आले. त्यानंतर त्यांनीं हिंदीच्या प्रसारकार्यामध्यें लक्ष घालण्यास सुरुवात केली. राष्ट्रांचे संघटन व ऐक्य साधण्यासाठीं सगळ्या ठिकाणीं समजली जाईल अशा भाषेची फार आवश्यकता असून हिंदी हीच अशा प्रकारची भाषा आहे असें ते नेहमीं म्हणत असत. महात्मा गांधींच्या विचारानुसार हिंदीला त्यांनीं राष्ट्रभाषा म्हणून मानली होती. हिंदी भाषेच्या प्रसारकार्यामागें याप्रमाणें महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्या विचारांची प्रेरणा आहे. महाराष्ट्रांत हिंदीचा प्रचार सुव्यवस्थित रीत्या चालू असून येथें या भाषेचा जो व्यापक स्वरूपांत प्रसार झालेला आहे त्या प्रसाराची पार्श्वभूमि या प्रांतांतील या महान् नेत्यांनींच तयार केली आहे, ही आमच्या दृष्टीनें अतिशय अभिमानास्पद अशी बाब आहे. सर्वश्री बाबुराव विष्णु पराडकर, माधवराव सप्रे, लक्ष्मण नारायण गर्दे, दुगवेकर आणि काका कालेलकर या मराठी विद्वानांनीं तर हिंदी भाषेची अविस्मरणीय अशी सेवा केली आहे. अशा त-हेची, हिंदी सेवा करण्याची महाराष्ट्रांत एक परंपरा निर्माण झाली आहे. ही परंपरा कायम राखणें हें आपलें पवित्र कर्तव्य आहे.

महाराष्ट्रांत हिंदीच्या प्रचारासाठीं अतिशय अनुकूल असें वातावरण आहे. विदर्भ आणि मराठवाड्यांतील बहुसंख्य लोकांना हिंदी चांगलें येतें. पश्चिम महाराष्ट्रांतील मोठ्या शहरांतून हिंदीच्या प्रसाराकडे योग्य त-हेनें लक्ष देण्यांत येत आहे. तथापि महाराष्ट्रांतील प्रत्येक व्यक्तीला कांही ठराविक कालावधींत हिंदीचा चांगला परिचय होईल अशा दृष्टीनें या राज्यांत हिंदीच्या प्रसारचें योजनाबद्ध कार्य जोमदारपणें होण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रांत मराठी व इतर दुस-या भाषा यांच्या प्रगतीबरोबरच हिंदीचीहि द्रुतगतीनें प्रगति होईल याबद्दल मला बिलकुल संदेह वाटत नाहीं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org