सह्याद्रीचे वारे - १६०

त्याचप्रमाणें या संस्थेच्या अध्यक्षांनीं आणि सदस्यांनीं हें काम करावें असाहि याचा अर्थ नाहीं. या मंडळाचे अध्यक्ष माझे मित्र तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आहेत आणि आपल्याकडचे श्री. मिराशी त्यांत आहेत. त्यांनी हें सर्व काम करावें असें जर आपण म्हणालों तर तो त्यांच्यावर अन्याय होईल. परंतु हें काम, आपण जी ही यंत्रणा उभी केली आहे तिनें, महाराष्ट्रांत ज्या निरनिराळ्या संस्था आहेत त्यांच्याकडून करवून घेतलें पाहिजे, महाराष्ट्रांत जी विद्वान मंडळी आहेत त्यांच्याकडून करवून घेतलें पाहिजे. या मंडळानें त्यांच्या विचारांचा, त्यांच्या शक्तीचा, साधनांचा उपयोग करून घेतला पाहिजे, त्यांना कार्यक्षम केलें पाहिजे, क्रियाशील केलें पाहिजे. आपले संबंध व आपल्या कामाचें स्वरूप लक्षांत घेऊन आणि या मंडळींच्या ज्ञानाचा, साहित्याचा, विचारांचा उपयोग करून, काम करण्याची एक प्रवाही योजना या मंडळांनें करावी अशी या मंडळाकडून माझी अपेक्षा आहे.

परंतु या मंडळाचा जन्म निव्वळ इतिहासाचें संशोधन करण्यासाठीं झाला आहे असा मात्र याचा अर्थ नव्हे. या बाबतींत परवांच कांहीं मित्रांशीं, विचारवंतांशीं माझी चर्चा झाली. त्याचप्रमाणें यासंबंधीं महाराष्ट्रांतील विद्वानांची झालेली चर्चा वृत्तपत्रांतून मीं काळजीपूर्वक वाचली, अभ्यासली. मी जेव्हां या मंडळानें इतिहासाचें संशोधन केलें पाहिजे असें म्हणतों तेव्हां भूतकालाचें उत्खनन करून जेवढी माहिती मिळेल तेवढी त्यानें जमा करावी एवढीच त्याची जबाबदारी आहे असा त्याचा अर्थ नसून या संशोधनाबरोबरच त्यानें वर्तमानकाळाकडे लक्ष दिलें पाहिजे व वर्तमानकाळाकडे बघतांना भविष्यकाळाकडे नजर ठेवून त्यानें आम्हांस मदत केली पाहिजे. मी जेव्हां साहित्य म्हणतों तेव्हां ललित साहित्य म्हणतों असें नव्हे, किंवा ललित साहित्य हेंच तेवढें साहित्य असाहि त्याचा अर्थ नाहीं. ललित शब्द म्हणजे साहित्य अशी माझी कल्पना नाहीं. साहित्य म्हणजे सामान्य जनतेचें हित करण्याचें साहित्य अशी साधीसुधी व्याख्या मी करतों. ह्या व्याख्येंत शास्त्रांचाहि अभ्यास गृहीत धरावा लागतो. आज ही गोष्ट कोणीहि नाकारूं शकणार नाहीं कीं, मराठी भाषेमध्यें अमृताशीं समान अक्षर लिहिणा-या महान पंडितांना आम्ही शिरोधार्य मानतो असे आम्हीं कितीहि म्हटलें, तरी संशोधनासाठीं इंग्रजी भाषेचा पाठपुरावा करणें आम्हांला आवश्यक होतें. तेव्हां इतर भाषांमध्यें जें ज्ञानभांडार असेल, जे विचार असतील ते मराठी भाषेंत खेचून आणण्याचा आम्हांला प्रयत्न करावा लागणार आहे. परवांच माझ्या एका संपादक मित्रानें ह्या मंडळाला उद्देशून एक सूचना केली कीं, विद्वान मंडळीकडून तयार होणारे ज्ञानकोश, शब्दकोश हे निव्वळ त्यांच्या ग्रंथालयांची शोभा वाढविणारे ग्रंथ न होतां, ते जनतेला उपलब्ध होतील अशा स्वरूपाचे झाले पाहिजेत. एवढेंच नव्हे तर यासाठीं त्यांनी वेगवेगळ्या संस्कृतींचें आणि शास्त्रांचें संशोधन करून लोकांना उपयुक्त होईल असें मार्गदर्शन केलें पाहिजे. परंतु हें मंडळ वेगवेगळ्या भाषांतील ग्रंथांचें प्रकाशन करणारें प्रकाशन खातें व्हावें असा याचा अर्थ नव्हे. तर एक प्रकारचें सर्जनशील आणि विचार करणारें हें मंडळ एकप्रकारचें पॉवर हाऊस बनावें, विद्युतगृह बनावें, अशी माझी या मंडळासंबंधी अपेक्षा आहे. तें कुठें तरी क्षितिजापलीकडे राहणारी दुनिया बनतां कामा नये. त्यानें वाढतीं क्षितिजें निर्माण केलीं पाहिजेत. एवढेंच नव्हे तर हें मंडळ महाराष्ट्राचें जीवन व्यापक, विस्तृत व क्रियाशील करणारें माध्यम बनावें अशी माझी त्याबद्दलची कल्पना आहे. या उद्देशानेंच अनेक मित्रांशी, विचारवंतांशीं, विद्वानांशीं, चर्चा करीत करीत या मंडळाचा जन्म झाला आहे. अशा प्रकारच्या साधनाची, माध्यमाची आवश्यकता होती. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी अनेक दिवस अशा त-हेचा विचार, अशा त-हेची कल्पना माझ्या मनांत घोळत होती. आतां ती कल्पना साकार होत आहे.

या मंडळाचें अध्यक्षस्थान माझे मित्र आणि ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीं स्वीकारलें याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. तो व्यक्त करण्यास माझ्याजवळचे शब्द अपुरे पडतात. ते अशा पदापासून दूर राहणारे आहेत. त्यांच्या माझ्या केवळ घरोब्याच्या आणि प्रेमाच्या संबंधामुळें मीं त्यांना येथें पकडून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनीं ही जबाबदारी स्वीकारण्याचें कबूल केलें. त्याबद्दल त्यांचे प्रथम मला आभार मानले पाहिजेत. त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदा-या आहेत. असें असूनहि त्यांनीं ही नवीन जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या वाई येथील प्राज्ञपाठशाळेंत धर्मकोश तयार करण्याची जबाबदारी त्यांनीं गुरुप्रेमासाठीं स्वीकारली. मी त्यांना असें म्हणेन कीं, या गुरुप्रेमाच्या स्वरूपाचेंच, मराठी भाषेचें, मराठी जनतेचें हें जें ऋण आहे, तें परतफेडीचें ऋण आहे. हें कार्य ते करतील अशी माझी खात्री आहे. सरतेशेवटीं, ही नवी संस्था सारखी वाढती राहो, आणि साहित्यिकांच्या या महान यात्रेंत, संस्कृतीचा आणि स्वाधीन साहित्याचा जरीपटका खांद्यावर घेऊन ही संस्था यशःश्रीच्या सतत आघाडीवर राहो अशी सदिच्छा व्यक्त करून मी या मंडळाचें उद्घाटन झालें असें जाहीर करतों.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org