सह्याद्रीचे वारे - १५८

साहित्य आणि संस्कृति

आजचा हा औपचारिक समारंभ ही महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर घडणारी एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे असें मी मानतों. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळीं शासनाच्या धोरणासंबंधींचें मीं जें वक्तव्य केलें होतें, त्यामध्यें साहित्य आणि संस्कृति यांच्या वृद्धि व संवर्धनासाठीं एक विद्वज्जनांची यंत्रणा निर्माण करण्याचा सरकारचा हेतु प्रथमच जाहीर करून महाराष्ट्राशीं मी वचनबद्ध झालों होतों. त्याच धोरणाचा पुनरुच्चार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. श्री. प्रकाशजी यांनीं महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनासमोर केलेल्या आपल्या भाषणांत केला. त्या वेळीं त्यांनीं ज्या शब्दांत या धोरणाचा उल्लेख केला होता ते शब्द आपल्यापुढें वाचून दाखविण्याचा मोह मला आवरत नाहीं. त्यांनीं आपल्या भाषणांत असें म्हटलें होतें कीं, ''सरकारनें मराठी भाषेच्या विकासासाठीं आणि समृद्धीसाठीं, महाराष्ट्राची भाषा, संस्कृति आणि इतिहास यांच्यासंबंधींच्या संशोधनाकडे तांतडीनें लक्ष देण्याचें ठरविलें आहे. अशा प्रकारच्या संशोधनास उपयुक्त होईल असें साहित्य निरनिराळ्या भारतीय व पाश्चात्य भाषांत भरपूर प्रमाणांत उपलब्ध आहे. म्हणून या बाबतींतील संशोधनाचें काम हातीं घेण्यासाठीं व त्यावर देखरेख ठेवण्यासाठीं, या क्षेत्रांतील तज्ज्ञांची व विद्वानांची एक उच्चाधिकार यंत्रणा लवकरच निर्माण करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार आहे.'' या बाबतींत शासनामार्फत वेळोवेळीं ज्या घोषणा केल्या गेल्या व त्यांचा जो उच्चार व पुनरुच्चार झाला त्या सर्वांचें मूर्त स्वरूप म्हणजेच आज हें मंडळ स्थापन होत आहे. माझ्या दृष्टीनें मी मराठी जनतेला दिलेल्या वचनाची आज परिपूर्ति झाल्याबद्दलचें समाधान माझ्या मनांत आहे.

साहित्याच्या प्रश्नांसंबंधीं बोलतांना माझ्यासारख्या माणसानें थोडेंसें जपून बोलावें याची मला जाणीव आहे. तरीहि कांही गोष्टींचा उल्लेख जर मीं येथें केला तर त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. मी असें मानतों की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, आणि भाषिक राज्याच्या निर्मितीनंतर, वैचारिक व सांस्कृतिक पुनरुज्जीवन घडवून आणणारा एक शक्तिशाली नवा प्रवाह भारतीय जीवनांत निर्माण झाला असून आपण आतां एका समृद्ध अशा कालखंडांत प्रवेश करीत आहोत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकजीवन समृद्ध करण्याची जी प्रतिज्ञा आपल्या देशानें केली तिचाच हें पुनरुज्जीवन एक भाग असून भाषिक राज्यांच्या निर्मितीमुळें या पुनरुज्जीवनाच्या कार्यासाठीं आम्हांला एक नवें साधन प्राप्त झालें आहे. यापुढें आतां एक निश्चित अशी यंत्रणा आपण तयार केली पाहिजे, असें मला वाटूं लागलें आणि त्यांतूनच या मंडळाची कल्पना निर्माण झाली. साहित्य अकादमी ही अशाच प्रकारची संस्था असून ती १९५४ सालीं अस्तित्वांत आली. वेगवेगळ्या भाषेंतील दुर्मिळ ग्रंथ प्रसिद्ध करणें, इतिहासाचें, वाङ्मयाचें आणि निरनिराळ्या संस्कृतीचें संशोधन करणें यासारखें विविध स्वरूपाचें कार्य ही संस्था करीत असते. साहित्य अकादमीसारखेंच व शक्य झाल्यास त्यापेक्षांहि अधिक व्यापक स्वरूपाचें कार्य या मंडळाकडून व्हावें या उद्देशानें हें मंडळ स्थापन करण्यांत आलें आहे. या मंडळाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारखे अध्यक्ष लाभले ही या मंडळाच्या दृष्टीनें मोठी भाग्याची गोष्ट असून त्यांच्या एका थोर ग्रंथाला केंद्रीय साहित्य अकादमीनें नुकतेंच मोठें अनुदान दिलें आहे.

या मंडळाच्या निर्मितीसंबंधी जो सरकारी आदेश प्रसिद्ध झाला आहे त्यांत या मंडळाच्या कार्याची व्याप्ति स्थूलमानानें दर्शविण्यांत आली आहे. परंतु या मंडळानें कोठल्या प्रकारचें काम करावें, यासंबंधीं कुठलेंहि बंधन, कुठल्याहि मर्यादा शासन या मंडळावर घालूं इच्छीत नाहीं. सरकारी आदेशांतील यासंबंधींचा उल्लेख केवळ नाममात्र आहे. या मंडळावर जी तज्ज्ञ आणि विद्वान मंडळी आहेत त्यांनीं या कार्याची सर्व बाजूंनीं व्याप्ति वाढावी म्हणून अधिक व्यापक व अधिक सर्वंकष असा प्रयत्न केल्यास, शासन त्याचें स्वागतच करील हें मी सुरुवातीलाच स्पष्ट करूं इच्छितों. या कार्याच्या बाबतींत या मंडळावर किंवा त्याच्या विचारावर सरकार कुठलेंहि बंधन घालूं इच्छीत नाहीं. कारण, देशांतील विचारवंत, कलावंत, लेखक, शास्त्रज्ञ व संशोधक यांच्या प्रयत्नानें निर्माण होणारें विचारधन हेंच समाजाचें फार मोठें धन आहे असें मी आणि महाराष्ट्र शासन मानतों. तें असलें तरच देश ओळखला जातो, समाज ओळखला जातो, समाजाचें जीवन प्रवाही राहतें, चिरंतन राहतें. समाज जिवंत राहतो तो त्याच्याजवळ असलेल्या भौतिक सामर्थ्यानें नव्हे, तर त्याच्याजवळ असलेल्या सांस्कृतिक मूल्यांवर आणि विचारधनावर तो जिवंत राहतो आणि वाढतो असाच इतिहासाचा दाखला आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org