सह्याद्रीचे वारे - १५६

ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रांतील मूलभूत संशोधन हातीं घेण्याचा प्रयत्न ज्या भाषेंत होतो तीच भाषा ज्ञानाची भाषा होऊं शकते. आज आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असतांनाहि एक गोष्ट मान्य करावीच लागेल. निदान मीं माझ्या मनाशीं ती मान्य केली आहें. ती गोष्ट म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रांत मूलभूत संशोधनाचें काम करणा-या इंग्रजीसारख्या आज ज्या भाषा आहेत, त्यांचें महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ इंग्रजी भाषिकच इंग्रजी भाषा शिकतात असें नव्हे; तर अलम दुनियेंमध्यें, विज्ञानाच्या क्षेत्रामध्यें होणा-या पराक्रमांशी व प्रगतीशीं ज्यांना संबंध ठेवावयाचा असतो त्यांना त्या भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता वाटते. याचें कारण या क्षेत्रांतील मूलभूत संशोधनाचें काम या भाषेमधून होत असते. मराठी भाषेचा तुमचाआमचा अभिमान जर ख-या अर्थानें पहिल्या प्रतीचा राहणार असेल तर हें काम मराठी भाषेमध्येंहि झालें पाहिजे. तशा प्रकारची परिस्थिति आपण येथें निर्माण केली पाहिजे. मराठी भाषेला राजसिंहासनावर बसविण्याचा ऐतिहासिक प्रसंग तुमच्या-आमच्या जीवनांत कांहीं आठवड्यांच्या आंत निर्माण होणार असल्यामुळें ही जिम्मेदारी माझ्या मतानें अधिकच तीव्र होते. आणि ही तीव्रता - ह्या जाणिवेची तीव्रता - जर साहित्यिकांच्या मनापर्यंत जाऊन पोहोंचली तर, मला वाटतें, त्याचा चांगलाच परिणाम होईल, लोकजीवनाच्या दृष्टीनें अत्यंत फायद्याची अशी गोष्ट असल्यामुळें मराठी साहित्यिक तिच्याकडे सातत्यपूर्वक लक्ष देतील अशी आशा या वेळीं मी व्यक्त करतों.

दुसरा एक विचार या प्रसंगीं मला आपल्यापुढें मांडावयाचा आहे. आणि तो म्हणजे विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यामध्यें फरक आहे अशा प्रकारची भावना वाढविण्याचा प्रयत्न साहित्यिकांकडून होऊं नये. राजकीय महत्वाकांक्षा असणा-या माणसांनीं असा प्रयत्न केला तर तो मी समजूं शकतों. परंतु विदर्भांतील साहित्यिक भावनात्मक एकतेसाठीं जो प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल मला त्यांना धन्यवाद द्यावयाचे आहेत. यापुढेंहि असेच अधिक प्रयत्न आपण केले पाहिजेत. एकभाषिक जनतेच्या जीवनामध्यें प्रादेशिक अंतरामुळें थोडाफार फरक होतात आणि ते तसे झालेहि पाहिजेत. हवामानामध्यें जो फरक असतो त्यामुळें जीवनपद्धतींतहि थोडाफार फरक पडतो. परंतु या नव्या जमान्यांत एकमेकांच्या जीवनामध्यें जीं साम्यस्थळें आहेत, ज्या एकजिनसी परंपरा आहेत, एकमेकांना जवळ नेणा-या ज्या गोष्टी आहेत, त्यांच्यावर भर देऊन त्यांचें महत्त्व प्रतिपादण्याची फार आवश्यकता आहे. कोंकणापासून घाटमाथा किती अलग आहे आणि घाटमाथ्यापासून मराठवाड्यांतील गोदावरीचा तीरहि किती दूर आहे. तेव्हां या तिन्ही ठिकाणीं जी मराठी भाषा बोलली जाते तिच्यांत थोडाफार फरक हा राहणारच. आणि गोदावरीच्या तीरावरील व पूर्णेच्या तीरावरील भाषेंतहि फरक असणें शक्य आहे. परंतु अशी ही विविधता जीवनामध्यें नसेल तर जीवन समृद्ध होणार नाहीं, संपन्नहि होणार नाहीं. या विविधतेंतहि एक प्रकारची एकता आहे. या एकतेवर भर देऊन तिचा प्रत्यय दैनंदिन जीवनामध्यें, नित्याच्या कामामध्यें आणण्याचें काम साहित्यिकांनीं केलें पाहिजे. हें काम कथालेखकांचें, कवींचें आणि कादंबरीकारांचें आहे. आणि अशा प्रकारचा प्रत्यय आजपर्यंतच्या मराठींतील लेखनामध्यें आलेलाहि आहे.

आपणांला माहीतच आहे, कीं खामगांवला ज्यांनीं आपली कर्मभूमि मानली त्या तात्यासाहेब कोल्हटकरांच्या स्फूर्तीतून निघालेलें गीत आज महाराष्ट्र गीत झालें आहे. विदर्भांतील कुठलेंहि उत्कृष्ट कथावाङ्मय सबंध महाराष्ट्रभर सारख्याच जिव्हाळ्यानें वाचलें जातें. मला आठवतें, माझ्या विद्यार्थीदशेमध्यें, कोल्हापूरच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेजवळ राहणा-या श्री. ना. सी. फडक्यांची 'दौलत' ही कादंबरी आणि पूर्व सीमेजवळ राहणा-या नागपूरच्या श्री. पु. य. देशपांड्यांची 'बंधनाच्या पलीकडे' ही कादंबरी या दोन्ही कादंब-या सारख्याच जिव्हाळ्यानें मीं वाचल्या आहेत. याचें कारण त्यांच्या पाठीमागची भावना आणि महाराष्ट्रीय संस्कृति एक होती. महाराष्ट्रीय अनुभव एक होते आणि मराठी मनहि एक होतें. आणि ही जी भावनेची, संस्कृतीची आणि मनाची एकता आहे त्या एकतेची जाणीव तीव्रतेने वाढविण्याची आजच्या काळांत फार आवश्यकता आहे असें मला वाटतें. कारण आजचा काळ असा आहे कीं, त्याच्या पाठीमागच्या राजकीय प्रेरणा पुढें अलग होऊं शकतील, त्यांमध्यें बदल होऊं शकेल. पण त्यांच्या पलीकडे जें सामाजिक मन आहे तें सांस्कृतिक संबंधांनी बांधले असल्यामुळें तें सलगच राहील. या सामाजिक मनाला जागें करण्याचा प्रयत्न साहित्यानें केला पाहिजे. त्यामागील ज्या सांस्कृतिक प्रेरणा आहेत त्यांना जागें करण्याचें काम साहित्यानें केलें पाहिजे. साहित्याची खरी सेवा या क्षेत्रांत झाली पाहिजे. हें काम निव्वळ विदर्भातील साहित्यिकांनीच केलें पाहिजे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाहीं. विदर्भ साहित्य सम्मेलनाच्या या व्यासपीठावरून महाराष्ट्रांतील सगळ्या साहित्यिकांना उद्देशून मी हें बोलतों आहें. आम्हांला हा प्रयत्न अधिक जोरदारपणें केला पाहिजे. त्याचबरोबर आमच्या वागण्याचालण्यांत जे दोष असतील ते दूर करण्याचाहि आम्हीं प्रयत्न केला पाहिजे. प्रांतीयतेमधला एक दोष असा आहे कीं, प्रांतीयतेची भावना एकदां जागृत झाली म्हणजे ती निव्वळ प्रदेशापुरतीच मर्यादित राहते असें नव्हे, तर ती वाढूं लागली म्हणजे एक गांव दुस-या गावाविरुद्ध, एक शहर दुस-या शहराविरुद्ध अशा त-हेनें ती पसरत जाते. प्रांतीयतेचा हा धोका लक्षांत घेऊन आपल्या जीवनामध्यें जीं साम्यस्थळें आहेत, जो एकजिनसीपणा आहे, त्याची वाढ करण्याचा आम्हीं प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतें, महाराष्ट्रीय भाषिकांच्या दृष्टीनें ही अत्यंत महत्त्वाची अशी बाब असून मराठी भाषा आणि आपलें एकभाषिक राज्य हीं तिच्या पूर्तीचीं साधनें आहेत असेंच आपण मानले पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org