सह्याद्रीचे वारे - १५३

महाराष्ट्रापुरतें बोलावयाचें झाल्यास नवबुद्ध समाज आणि इतर समाज यांच्यामध्यें पंधरावीस वर्षांपूर्वी जेवढी कटुतेची भावना होती तेवढी ती आज राहिलेली नाहीं. पण ती अजिबात गेली आहे असें मी म्हणणार नाहीं. तसें म्हणणें वस्तुस्थितीला सोडून होईल. अजूनहि खेड्यापाड्यांमध्यें एक प्रकारचा राग आहे. कांही लोकांच्या मनांत अजूनहि जुन्या वतनगिरीच्या कांहीं गोष्टी असतील, देशमुखीपणा असेल किंवा आणखी कांहीं रागलोभ असतील. पण मी आपणांला सांगूं इच्छितों कीं नवा विचार स्वीकारलेली जी नवी पिढी आज शिक्षणांतून उभी राहत आहे तिच्या मनांत हें पाप राहिलेलें नाहीं. सामाजिक विषमतेच्या भावनेचा आमचा जो वारसा होता तो आम्हीं टाकून दिला पाहिजे, गाडला पाहिजे. आणि एका नव्या वातावरणाचें, प्रेमाचें, सहकाराचें चित्र या देशांत उभें राहिलें पाहिजें, महाराष्ट्रांत उभें राहिलें पाहिजे. आपला रिपब्लिकन पक्ष असेल, माझा काँग्रेस पक्ष असेल; आपला धर्म वेगळा असेल, माझा धर्म कदाचित् वेगळा असेल. परंतु शेवटीं तुम्ही आणि मी भारतीय असून तुमचें आणि माझें एकमेकांशीं जवळचें नातें आहे. या प्रांतांत राहणारे नागरिक म्हणून तुमचा आणि माझा एकमेकांवर एक प्रकारचा हक्क आहे. शेकडों वर्षे या भूमींत आपण राहिलों, रगडले गेलों, दबले गेलों आणि शेवटीं येथेंच तुमची माझी सगळ्यांचीं हाडें पडणार आहेत, जळणार आहेत. परंतु कर्मभूमि म्हणून, मायभूमि म्हणून ज्या भूमीवर आपण वाढलों आहोंत आणि जगतों आहोंत, तिचें काम करण्याचें, समान हक्काचें तुमचें माझें बंधुबंधु म्हणून जें नातें आहे त्या नात्यानें, आपण एकमेकांजवळ गेलें पाहिजे, एकमेकांचीं मनें समजून घेतलीं पाहिजेत, एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि पुढें जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

माझ्या मतें हेंच खरें स्वातंत्र्याचें वातावरण आहे, हीच खरी वैचारिक स्वांतत्र्याची हवा आहे. वैचारिक स्वातंत्र्याच्या पाठीमागें एक मानसिक परिस्थिति असावी लागते. जेव्हां मनुष्य आपलें स्वतःचें म्हणणें खरें आहे यावर विश्वास ठेवतो, पण त्याचबरोबर दुस-याचेंहि खरें असण्याचा संभव आहे हीहि शक्यता मानतो, तेव्हांच खरें विचार स्वातंत्र्य संभवतें. माझेंच खरें आहे आणि दुस-याचें खरें असणें सुतराम् शक्य नाहीं, असा जेव्हां माणूस आग्रह धरतो, तेव्हां वैचारिक स्वातंत्र्याची भूमिका घेणा-या माझ्यासारख्याला तो आग्रह फार चुकीचा वाटतो. दुस-याचेंहि बरोबर असण्याची शक्यता आहे हा विचार मनामध्यें स्वीकारल्याशिवाय आणि त्याची शक्यता मानल्याशिवाय वैचारिक स्वातंत्र्य संभवत नाहीं आणि वैचारिक स्वातंत्र्याच्या भूमिकेवर आधारलेली लोकशाहीहि संभवत नाहीं.

माझे मित्र आमदार श्री. भंडारे यांनीं बुद्धधर्म आणि लोकशाही यांचा संगम झाला आहे असें जें सांगितलें तें ऐकून मला आनंद वाटला. खरोखरच ते म्हणाले तसा हा संगम झालेला आहे. भारतामध्यें ख-या अर्थानें लोकशाहीची भावना निर्माण करण्याचें काम बुद्धाच्या जन्मानें घडलेलें आहे ही गोष्ट नाकारतां येणार नाहीं. हिंदुस्तानला ज्या थोड्या गोष्टींनीं एक प्रकारचें अमरत्व प्राप्त झालें आहे, त्यांत बुद्धांचा जन्म आणि बुद्धांनी केलेली कामगिरी या अमर गोष्टी आहेत. निव्वळ भारतानेंच नव्हे तर अखिल मानवतेनें जेव्हां मानव्याचा इतिहास लिहिला तेव्हां तिला येथें क्षणभर उभें राहावें लागलें, आणि इतक्या हजार वर्षांपूर्वीं हा विचार मांडणारा जो महापुरुष होऊन गेला त्याला प्रणाम करूनच तिला पुढें जावें लागलें. म्हणून आपल्याला बुद्धांनीं दिलेली लोकशाहीची ही भावना जर टिकवावयाची असेल तर मी आपणांस एक विनंती करीन कीं, मी म्हणतों तीहि भावना आपण कृपा करून समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचें म्हणणें बरोबर असणें शक्य आहे. परंतु दुस-याचें म्हणणेंहि आपण थोडेंफार समजावून घेतलें पाहिजे. कारण तेंहि बरोबर असण्याचा संभव आहे. म्हणून, दुस-याचें म्हणणें ऐकण्याचा प्रयत्न करूं या, अशा प्रकारची भावना आपण आपल्यांत निर्माण करा. आणि आज या कामासाठीं मला बोलावून आपण ही भावना स्वीकारली आहे असें मी मानतों. हीच देवाणघेवाण-विचारांची, बैठकीची, चर्चेची तुम्हींआम्हीं निर्माण केली पाहिजे. तरच आपण महाराष्ट्राचें आणि भारताचें कल्याण साधूं शकूं. महाराष्ट्रांतील एवढा मोठा महार समाज जागृत झाला, राजकीय दृष्ट्या त्याच्यांत एक प्रकारची आकांक्षा निर्माण झाली, आणि राज्यामध्यें माझा हक्क आहे, अशा भावनेनें तो पुढें चालूं लागला, हें पाहून मला आनंद वाटला. एक मोठा मानवसमाज या आग्रहानें तयार झाला आहे ही महाराष्ट्रांत एक चांगली गोष्ट झाली. मी इतरांना सांगत असतों कीं, तुम्ही त्यांचा राग कां करतां ? त्यांचें त्यांना द्या. तुम्हांला ज्याप्रमाणें हक्काची भावना आहे, तशीच त्यांच्यामध्येंहि ती निर्माण झाली आहे. म्हणून आम्हीं त्यांना जवळ घेतलें पाहिजे, त्यांना समजून घेतलें पाहिजे. पण मेहेरबानी म्हणून नव्हे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org