सह्याद्रीचे वारे - १५२

मी आपणांला सांगूं इच्छितों कीं, मोठ्या माणसांची तुलना करणा-यांपैकी मी नाहीं. उलट, मोठ्या माणसांची परस्परांशीं तुलना करूं नये असें मानणारा मी आहें. आणि म्हणून महात्मा गांधी मोठे होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोठे होते कीं बॅरिस्टर जीना मोठे होते, या वादांत मी पडूं इच्छीत नाहीं. मी महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानणारा माणूस आहें. पण म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला कमी आदर आहे असें समजण्याचें कारण नाहीं. मी तर असें मानतों कीं, मोठ्या माणसांची तुलना करणें ही त्यांचा अपमान करण्याची उत्कृष्ट रीत आहे. माझ्या मतें हा मोठा आणि तो लहान, अशा प्रकारची दोन मोठ्या माणसांची तुलना होऊंच शकत नाहीं. कारण दोघांचें निरनिराळ्या प्रश्नांचे मूल्यमापन वेगवेगळें असतें. आणि म्हणून मी गांधीजी आणि आंबेडकर यांची तुलना करणार नाहीं. खरें म्हणजे माणसें आपापल्या परीनें मोठी असतात. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीं या भूमीवर उभें राहून, त्यांचा शब्द मानणा-या त्यांच्या अनुयायी समाजाला बुद्ध धर्माची दीक्षा देण्याचें जें काम केलें तें सामाजिक परिणामाच्या दृष्टीनें, महत्त्वाचें काम झालें असें मी मानतों. बुद्धांनी दिलेला मानवतेचा महान् संदेश स्वीकारून एका नव्या सामाजिक दृष्टिकोनांनें काम करण्याची स्वाभिमानी वृत्ति त्या समाजामध्यें निर्माण व्हावी हा जो त्यांतला हेतु आहे त्या हेतूचें आणि त्यांतून निर्माण होणा-या सामाजिक परिणामाचें मी स्वागत करतों. मला त्याचें महत्त्व जास्त वाटतें.

आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हिंदुस्तानांत ज्याच्यासाठीं विचार करणा-या माणसांनी आपली सर्व शक्ति आणि आपलें सगळें बुद्धिकौशल्य खर्च करावें असा जर कोणता प्रश्न असेल तर तो या देशांत एक प्रकारची सामाजिक एकतानतेची, एका मनाची भूमिका निर्माण करण्याचा आहे. या गोष्टीची आज फार आवश्यकता आहे. डॉ आंबेडकर आणि महात्मा गांधी वेगळे पडले याचें कारण हिंदुस्तानच्या  जुन्या इतिहासांतून निर्माण झालेल्या ज्या वेगवेगळ्या सामाजिक भावना होत्या, ज्या वेगवेगळ्या सामाजिक परंपरा होत्या, त्या भावनांतून आणि त्या परंपरांतून ते वाढले होते हें आहे. आम्ही हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यासाठीं झगडत असतांना ही माणसें अशीं वेगवेगळें कां बोलतात, हा विचार माझ्या मनांत नेहमीं येत असे हें मी आपणांस प्रामाणिकपणें सांगूं इच्छितो. पण जातीजातीनें विभागलेल्या, दबलेल्या समाजांत स्वातंत्र्याकरितां प्रयत्न करून आम्ही पुन्हा अस्पृश्यच राहणार असलों, दलितच राहणार असलों, दबलेले राहणार असलों तर त्या स्वातंत्र्याची आम्हांला काय गरज आहे असें जर कुणाला वाटलें असेल तर तें आम्हीं समजून घेतलें पाहिजे. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वातंत्र्याचा पूर्वीचा अर्थ बदलून, त्याला सामाजिक न्यायाचा अर्थ देणें आणि त्यासाठीं आर्थिक न्यायाची भूमिका निर्माण करणें, हें महत्त्वाचें काम तुम्हांआम्हांला आज आपल्या देशामध्यें करावयाचें आहे. आणि हें काम माझ्या मतें सर्वांत महत्त्वाचें काम आहे. आणि म्हणून राजकीय भूमिका, राजकीय पक्ष आणि राजकीय कार्यक्रम अगदीं वेगळा असतांना सुद्धां मी येथें आनंदानें येत असतो. हिंदुस्तान पूर्वी एक असला तरी वेगवेगळीं सामाजिक मनें, वेगवेगळीं सामाजिक जगें यामुळें शेकडों वर्षे येथें जी परिस्थिति निर्माण झाली ती बदलण्यासाठीं, एका समाजाला दुस-या समाजापासून वेगळ्या ठेवणा-या सामाजिक विषमतेच्या ज्या भिंती आहेत त्या आपण पाडून टाकल्या पाहिजेत असें मला वाटतें. आतां आपण एक मन, एक समाज अशी भावना निर्माण केली पाहिजे, एक सामाजिक पुरुष निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा प्रकारचा प्रयत्न करणें हेंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचें खरें स्मारक आहे असें मी मानतों.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीं ज्या भूमीवर दीक्षा घेतली त्या ऐतिहासिक भूमीवर हें कॉलेज बांधून आपण त्यांचें स्मारक करीत आहांत. आणि या कोनशिलासमारंभाच्या यानिमित्तानें त्याला माझा जो हातभार लागत आहे त्यामुळें माझ्या जीवनाची थोडीफार फलश्रुति झाल्याचा मला आज आनंद होतो आहे. परंतु एका गोष्टीची आपण खबरदारी घेतली पाहिजे. ती म्हणजे हें जें काम आपण उभें करीत आहांत त्या कामामध्यें यापुढें हा वेगळा समाज, तो वेगळा समाज अशी भावना निर्माण होतां कामा नये. या सगळ्या समाजांची मतें वेगळी असलीं तर तीं मी समजूं शकतों. मतें जरूर वेगळीं असलीं पाहिजेत, मतभेद जरूर असले पाहिजेत. सगळ्या लोकांचें मत एकच असलें पाहिजे अशा प्रकारचा समाज कोणाला निर्माण करावयाचा असेल त्यांनीं तो करावा. पण मी तो कोंडवाडा निर्माण करणारा नाहीं. किंबहुना समाजाचा असा कोंडवाडा करणा-या तत्त्वज्ञानाला माझा विरोध आहे. माझ्या मतें प्रामाणिक मतभेद असले पाहिजेत, मतभेद बोलण्याचें सामर्थ्य असलें पाहिजे आणि त्याला तशी संधि असली पाहिजे. परंतु एकमेकांच्या समाजाबद्दलच्या भावनेमध्यें कडवटपणा असतां कामा नये. तसा तो शिल्लक असेल तर प्रयत्न करून तो आपण कमी केला पाहिजे. हें या देशांतील महत्त्वाचें काम आहे असें मी मानतों.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org