सह्याद्रीचे वारे - १५०

किती भव्य आणि खरी कल्पना आहे ही. व्यास-वाल्मिकींपासून तों आजच्या रवीन्द्र-गांधी-जवाहरलालपर्यंत दुनियेला आणि मानवतेला रत्नें पुरविण्याचें काम हा महापुरुष करतो आहे. इतिहासकाळीं त्यानें हें काम केलें आहे आणि त्याहि पुढें तो तें करीत राहणार आहे. आणि हें महत्त्वाचें काम त्यानें केलें पाहिजे. रवीन्द्रांच्या जीवनाचा याच्यापेक्षां आणखी सुंदर अर्थ तुम्हांला आम्हांला समजेल असें मला वाटत नाहीं.

काल मोतीलाल नेहरूंच्या सभेंत बोलत असतांना श्री. होमी मोदींनी एक उतारा सांगितला आणि तो मला फार आवडला म्हणून त्याचा पुनरुच्चार मी येथें करतों. तो उतारा असा कीं, ''दि नेशन वुइच फरगेट्स् इट्स् हिस्टरी इज कंडेम्ड टु रिपीट इट.'' जो देश आपला इतिहास विसरतो त्याला त्या इतिहासाची पुनरावृत्ति करण्याची शिक्षा मिळते. आम्हांला आमच्या देशाच्या इतिहासाची पुनरावृत्ति करावयाची नाहीं. आम्हांला महापुरुष निर्माण करावयाचे आहेत. शेकडों वेळां दुस-यांचे हल्ले पत्करून त्यांची आम्हांला आतां गुलामी करावयाची नाहीं; ज्ञानाला बंदिखान्यांत ठेवणारा आणि चित्तामध्यें भय निर्माण करणारा समाज यापुढें आम्हांला निर्माण करावयाचा नाहीं. मीं सबंध गीतांजलि वाचल्यानंतर गीतांजलींतील माझ्या मनावर ठसलेल्या त्या दोन ओळी मला फार महत्त्वाच्या वाटतात. त्यांत भारतासाठीं परमेश्वराला उद्देशून रवीन्द्रनाथांनीं प्रार्थना केली आहे. त्यांनी परमेश्वराला आळविलें आहे कीं, ''जिथें चित्त निर्भय झालें आहे आणि जिथें ज्ञान मुक्त झालें आहे, अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात, भारताला देवा, जागृति येऊं दे.'' जिथें ज्ञान मुक्त झालें असेल आणि जिथें चित्त निर्भय झालें असेल अशा प्रकारची परिस्थिति ज्याच्या साहित्यांत, संस्कृतींत, विचारांत आणि समाजांत निर्माण झाली असेल असा नवा भारत आपणांला निर्माण करावयाचा आहे. ही प्रार्थना ज्या कविमनांतून निर्माण झाली तें कविमन केवळ एका तत्त्वज्ञाचेंच होतें असें नव्हे, तर एका अत्यंत थोर अशा मानवाचें तें मन होतें. तुमचें माझें भाग्य असें कीं, तें थोर मानवी मन ज्या संस्कृतींतून आणि परंपरेंतून निर्माण झालें त्या परंपरेचें आणि संस्कृतींचे तुम्ही आणि मी वारस आहोंत. आणि इतिहासाची पुनरावृत्ति करावयाची नसेल तर त्यांनीं पाहिलेलें तें स्वप्न पूर्ण करण्याचें सामर्थ्य परमेश्वरानें तुम्हांआम्हांला द्यावें अशी मी प्रार्थना करतों आणि गुरुदेव रवीन्द्रांच्या स्मृतीला लाख लाख नमस्कार करून माझें भाषण पुरें करतों.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org