सह्याद्रीचे वारे - १४९

साठाव्या वर्षी या माणसाला चित्रकलेचा अभ्यास करण्याची जरूर वाटली याचें कारण काय असावें ? त्यासंबंधीं त्यांचा खुलासा असा कीं रवीन्द्रांना इतकें काहीं सांगावयाचें होतें आणि त्यासंबंधीं त्यांची भावना इतकी तीव्र होती कीं त्यासाठीं त्यांना त्यांचे शब्द अपुरे वाटूं लागले, शब्दांचे अर्थ अपुरे वाटूं लागले, शब्दांचें माध्यम अपुरें वाटूं लागलें. ज्या शब्दांचा उपयोग त्यांनीं काव्यासाठीं केला, कादंब-यांसाठी केला, कथांसाठीं केला, नाटकांसाठीं केला, तेच शब्द शेवटीं त्यांना फार अपुरे वाटूं लागले. मला वाटतें, माणसाच्या मनामध्यें, माणसाच्या समर्थ मनामध्यें निर्माण होणा-या भावना आणि कल्पना व्यक्त करण्याचें शब्द हें अत्यंत तोकडें माध्यम आहे. म्हणून रवीन्द्रांनीं विचार केला असेल कीं आपल्या मनांतील भावना आणि कल्पना व्यक्त करण्यासाठीं आतां कुंचल्याचा आणि रंगांचा आपण आश्रय घ्यावा. तो किती यशस्वी झाला हा प्रश्न नाहीं. परंतु त्यांच्या आत्म्याची तळमळ होती कीं आपल्याला कांहीं तरी सांगावयाचें आहे, कांही तरी बोलावयाचें आहे. पण आपल्या मनांतला विचार निव्वळ भाषेंत सांगावयाचा प्रयत्न केला तर तो बंगालींतच सांगावा लागेल, त्याचें भाषांतर केलें तर निव्वळ तें इंग्रजींतच करावें लागेल. परंतु रंगांच्या आणि कुंचल्याच्या मदतीनें जर आपण आपला विचार सांगूं शकलों तर जे पाहूं शकतात त्या सगळ्या माणसांना आपला विचार कदाचित् समजूं शकेल. हीच भावना त्यांच्या या नव्या प्रयोगाच्या पाठीमागें असण्याचा संभव आहे. तें कसेंहि असो; रवीन्द्रांच्या रूपानें एक अत्यंत सुसंस्कृत, अत्यंत हळवें, अत्यंत थोर असें मन भारतामध्यें निर्माण झालें. पण ही आमची परंपराच आहे; ऋषिमुनींची आणि महाकवींची, रवीन्द्रांची मूर्तीच या महान् परंपरेंतल्या जुन्या थोर ऋषिमुनींची आपणांला आठवण करून देते.

मी आपल्याला आतां त्यांची एक कथा सांगणार आहें. ही कथा मीं जेलमध्यें असतांना ऐकलेली असून कुठें प्रसिद्ध झालेली अशी ही कथा नाहीं. ती प्रत्यक्ष घडलेली कथा असून शांतिनिकेतनमध्यें राहिलेल्या एका गृहस्थांनींच मला ती सांगितलेली आहे. आणि जेव्हां जेव्हां मी विद्यार्थ्यांच्या पुढें गेलों आहें तेव्हां तेव्हां न कंटाळता महाराष्ट्रांतील शेकडों ठिकाणी अलिकडे ही कहाणी मीं सांगितली आहे. ही कहाणी अशी आहे :

एके दिवशीं संध्याकाळीं रवीन्द्रनाथांनीं त्यांच्या शांतिनिकेतनमधील सगळ्या विद्यार्थ्यांना बाहेर बोलावून सांगितलें कीं आज मला तुमची एक परीक्षा घ्यावयाची आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या समोर त्यांनीं भारताचा नकाशा ठेवला आणि ते म्हणाले, ''असं पाहा कीं तुम्ही सगळे विचार करणारे इथले तरुण आहांत. तुमच्यामध्यें कुठंतरी थोडं काव्यमय मन जागं झालंय अशी कल्पना करा, आणि या भारताच्या नकाशाकडे पाहिल्यानंतर तुम्हांला काय कल्पना सुचते ते तुम्ही मला सांगा. तुम्हांला मदत व्हावी म्हणून आधीं मी विषय सांगतों. भारत म्हणजे जणुं कुणी तरी एखादा पुराणपुरुष आहे, महापुरुष आहे आणि तो काखेइतक्या पाण्यामध्यें उतरला आहे, अशी कल्पना करा.'' कवीची कल्पना आहे. आतां आपण महाकवीसंबंधानें बोलतों आहों, तेव्हां कल्पना करावयास कांहीं हरकत नाहीं. ''आतां सांगा कीं हा महापुरुष काय करीत असेल तें. तुम्हांला मीं कल्पना सुचविली आहे, '' रवीन्द्र म्हणाले. तेव्हां गंभीर चेहरा करून त्यांच्या शांतिनिकेतनमधला, त्यांच्या आश्रमामधला एक विद्यार्थी उठला आणि म्हणाला,''गुरुदेव, मला या बाबतींत एक कल्पना सुचतेय. कल्पना अशी आहे कीं, हा कुणीतरी धर्मनिष्ठ पुरुष आहे. पुराणकालापासून हा या समुद्रामध्यें उतरलेला आहे आणि तेव्हांपासून प्रार्थना करून सूर्याला आणि चंद्राला, दिवसा आणि रात्रीं सारखा अर्घ्य देतोय.'' कल्पना चांगली आहे. कुणीतरी धर्ममार्तंडाच्या घरांतला हा मुलगा असला पाहिजे असें ही कल्पना ऐकल्यानंतर वाटतें. ''आणखी कोण कल्पना सुचवतंय ?'' गुरुदेवांनी विचारणा केली. दुसरा एक मुलगा उभा राहिला, जरा गंभीर, चेह-यावर विस्कटलेले केस असलेला. आवेशांत येऊन त्यानें सांगितलें, ''गुरुदेव, खोटी कल्पना आहे ही. कुचकामी, निरुपयोगी कल्पना आहे ही. मला नाहीं वाटत कीं, हा महापुरुष तिथे उतरून कुठल्या तरी सूर्याला आणि कशासाठी तरी अर्घ्य देऊन प्रार्थना करतोय. हा महापुरुष समुद्रामध्यें उतरलाय हें खरं आहे. पण आपल्या दैन्याला, गरिबीला, कष्टाला कंटाळून, समुद्रामध्यें आत्महत्या करण्यासाठीं तो उतरलाय असं मला वाटतंय.'' ''तीहि कल्पना होऊं शकते. आणखी कुणाला सुचते कांहीं कल्पना ?'' गुरुदेव विचारते झाले. तेव्हां एक तिसरा मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, ''गुरुदेव, मला नाही वाटत ह्या दोन्ही कल्पना बरोबर असतील म्हणून. हा महापुरुष प्रार्थनेकरितां उतरलेला नाहीं. आणि आत्महत्येकरितां तर मुळींच नाहीं. हा आहे पुराणपुरुष; पण हा पुराणपुरुष उतरलाय, तो नुसत्या सागरामध्यें म्हणजे खा-या पाण्याच्या समुद्रांत नाहीं उतरलेला. या समुद्राला दुसरंहि नांव आहे, 'रत्नाकर' म्हणून. हा जो या महासागरांत उतरला आहे तो या महासागराच्या तळाशीं असलेली माणकें, मोतीं, रत्नें, हिरे, दुनियेला देण्याकरितां उतरलेला आहे.''

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org