सह्याद्रीचे वारे - १४६

पुरांत सांपडलेल्या बंधूंच्याकरितां मीं थोडेंफार तरी बोललें पाहिजे. पानशेतच्या इतर प्रश्नांबाबत मी आतां बोलत नाहीं, कारण त्याची आपणांला कल्पना आहे. त्यासंबंधानेंहि बोलावयास माझी कांहीं हरकत नव्हती. पण हा चौकशीचा प्रश्न असल्यामुळें त्यासंबंधीं आतां मी बोलत नाहीं. मी जरूर परत केव्हां तरी पुणेकरांच्या पुढें उभा राहून ही चौकशी संपल्यानंतर माझ्या सरकारतर्फे जी कांहीं बाजू आहे, ती जाहीरपणें मांडण्याचा प्रयत्न करीन. त्याचें कारण लोकमताविषयीं विश्वास असणारा मी माणूस आहे. लोकशाहीच्या राज्यामध्यें लोकमत जितकें ठेवील तितकेंच राहिलें पाहिजे. त्यापलीकडे राहतां येत नाहीं, राहतों म्हटलें तरी. असा मनाचा संपूर्ण कौल आणि अनुभव असणारा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी हें आपणांस सांगूं इच्छितों. पण मी माझ्या पूरग्रस्त बंधूंना सांगूं इच्छितों कीं, कॉम्पेन्सेशनचा प्रश्न त्यांनीं उभा करूं नये. कारण ती गोष्ट स्वीकारणें सरकारला शक्य नाहीं. परंतु पुण्याचें जीवन जें आज कांहीं प्रमाणांत उध्वस्त झालें आहे तें उध्वस्त झालेलें जीवन पुन्हा रचण्याच्या कामाची प्रतिज्ञा महाराष्ट्र राज्याची आहे, हें मी आपणांस सांगूं इच्छितों. तें जीवन सामर्थ्यशाली करणें, स्वतःच्या शक्तीनें तें चालूं लागेल, वाढूं लागेल, असा प्रयत्न, असा आत्मविश्वास, अशी शक्ति पुण्याच्या जीवनामध्यें निर्माण करण्याच्या बाबतींत महाराष्ट्र सरकार बांधलें गेलें आहे. हा विश्वास आपण मनाशीं बाळगा, एवढीच लोकमान्यांच्या या पुण्यतिथीच्या दिवशीं मी आपणांला विनंती करतों.

लोकमान्य टिळकांच्या या पुण्यतिथीला बोलावून आपण माझा सन्मान केलात. या मोठ्या कठीण काळांतल्या पुणें शहरामध्यें येऊन लोकमान्यांच्या स्मृतीला वंदन करण्यानें तुमच्याप्रमाणेंच मीसुद्धां माझ्या मनाला थोडीफार शक्ति घेऊन येथून जाणार आहें. ही संधि आपण मला दिल्याबद्दल लोकमान्य टिळकांच्या स्मृतीला वंदन करून मी आपले आभार मानतों आणि आपली रजा घेतों.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org