सह्याद्रीचे वारे - १४५

लोकमान्यांच्या जीवनाकडे महाराष्ट्रांतल्या माणसानें कसें पाहावें याचाहि विचार करावयास तुम्हींआम्हीं शिकलें पाहिजे. महाराष्ट्राच्या इतिहासांत अत्यंत थोर व पूजनीय अशा ज्या व्यक्ति आहेत त्यांतलें एक अत्यंत मोठें व्यक्तिमत्त्व लोकमान्यांचे आहे. आणि आज ह्या नव्या महाराष्ट्राचें जीवन एका नवीन त-हेनें घडावें, त्यांत एक प्रकारची नवी आशा निर्माण व्हावी, त्यांत एक प्रकारचें नवें सामर्थ्य निर्माण व्हावें आणि हें महाराष्ट्र राज्य त्याचें साधन व्हावें अशी जनतेची अपेक्षा आहे. त्या परीक्षेला महाराष्ट्र राज्य किती उतरतें हें मला माहीत नाहीं. परीक्षा लोक करतील, परीक्षा होत राहील, पण मूळ गोष्ट ही आहे कीं त्यांचें साधन हें महाराष्ट्र राज्य जरूर आहे. त्याच्यासंबंधीं मीं आतांच सांगितलेल्या ज्या सगळ्या आकांक्षा आणि अपेक्षा आहेत त्या आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठीं जीं दैवतें आपणांला स्वीकारलीं पाहिजेत त्यांमध्यें लोकमान्य टिळक हें फार मोठें दैवत आहे. आम्हांला आमच्या जीवनामध्यें सामाजिक एकजिनसीपणा आणला पाहिजे असें मीं अनेक वेळा सांगितलेलें आहे. त्याच शब्दप्रयोगाचा मी आज पुन्हा उच्चार करतों आहें. केवळ मुख्यमंत्री म्हणून मी हें बोलत नसून हजारों लोक जें मानतात तेंच मी बोलतों आहें. एकटेंच कुणी कांहीं बोलतें आणि करतें असें नव्हे. पण हा प्रयत्न फार चिकाटीनें, फार धीरानें, तात्पुरत्या राजकीय फायद्या-तोट्याच्या कसोटीनें न पाहता दूरवर नजर ठेवून जर तुम्हीं-आम्हीं केला तरच लोकमान्यांचे वंशज म्हणवून घेण्यास आपण पात्र ठरूं असें माझें मत आहे. महाराष्ट्रामध्यें हा प्रयत्न आपण निकरानें केला पाहिजें. या प्रकारच्या सामाजिक एकजिनसीपणासाठीं मनाची, विचारांची, भावनांची परिस्थिति निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हें काम जर आम्ही करूं शकलों, एवढें एकच काम जरी आम्ही करूं शकलों, तर मला वाटतें, बाकीचे प्रश्न आपोआप सुटत जातील.

महाराष्ट्र राज्याचें पहिलें वर्ष फार सुखानें गेलें असा त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशीं माझ्या मनामध्यें विचार आला. आतां जेव्हां महाराष्ट्र राज्याचा दुसरा वाढदिवस येईल तेव्हां तो विचार कांहीं माझ्या मनाशीं असणार नाहीं. पुण्याच्या प्रलयानंतर निर्माण झालेल्या भावना आणि दुःख, त्यांत बसलेले आर्थिक तडाखे आणि त्यांतून निर्माण झालेल्या वेदना हें सर्व आठवलें म्हणजे दुसरा वाढदिवस साजरा करतांना माझ्या मनामध्यें ती निर्भेळ भावना कशी असणार ? पण या संकटांनीं आम्ही दबणार आहोंत काय, हाच तुमच्या-माझ्यापुढें खरा प्रश्न आहे. व्यक्ति हरतील, पक्ष हरतील, राज्यें म्हणजे गव्हर्न्मेंट्स हरतील, जातील, राहतील. परंतु महाराष्ट्राचें राज्य, लोकमान्यांच्या महाराष्ट्राचें राज्य असें जेव्हां आम्ही म्हणतों तेव्हां त्याला कांहीं अर्थ आहे कीं नाहीं ? लोकमान्यांचा महाराष्ट्र म्हणजे तुम्ही-आम्ही आज जी भाषा बोलतों तीच भाषा लोकमान्य बोलत होते म्हणून लोकमान्यांचा महाराष्ट्र एवढाच त्याचा अर्थ नाहीं. अर्थांत् तोहि जरूर अभिमानाचा विषय आहे. अभिमानाचा विषय नाहीं असें नाहीं. सबंध देशांत आणि त्याच्या बाहेरहि ज्यांचा विचार व्हावा, अभ्यास व्हावा असे विचार आपल्या मराठी माउलींत लोकमान्यांनी आणले म्हणून त्याचाहि अभिमान जरूर तुमच्या आणि माझ्या मनाशीं आहे. पण मी त्यासंबंधानें बोलत नाहीं. त्यांचे जे गुण आहेत आणि संकटांशीं त्यांनी ज्या एका निर्धारानें तोंड देण्याचा प्रयत्न केला तो निर्धार आणि ते गुण जर महाराष्ट्र जीवनामध्यें तुम्हां आम्हांला निर्माण करतां आलें नाहींत तर महाराष्ट्राची नवीन रचना करण्याचें जें काम आपण अंगिकारलें आहे तें करण्यामध्यें आपण पाठीमागें पडूं. आज आपणांवर संकटें आली आहेत, आकाश कोसळलेलें आहे. पण त्या कोसळलेल्या आकाशाखालीं तुम्ही आणि मी दबणार कीं अशा त्या कोसळलेल्या आकाशाचे बगीचे बनविणार हा खरा तुमच्या-माझ्यापुढें आज प्रश्न आहे. आणखीहि संकटें येतील. संकटें म्हणजे धरण पडण्याची संकटें परत येणार नाहींत याची जरूर खात्री आहे. आणि अशीं जर वारंवार धरणें फुटूं लागलीं तर धरणें बांधणा-या सरकारला कुणी सरळ ठेवणार नाहीं याचीहि मला खात्री आहे. परंतु समाजाच्या जीवनामध्यें व्यक्तीच्या जीवनाप्रमाणेंच संकटें येतात, अडचणी येतात. आणि तशीं संकटें आणि तशा अडचणी यापुढें येणार नाहींत अशी खात्री आपण कशी देऊं शकूं ? पण त्या संकटांशीं आपण कसें लढणार आहोंत हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून या विषयासंबंधानें बोलत असतांना मीं सांगितलें होतें कीं, पानशेत झालें, पण पानशेतचें आपण पानिपत होऊं देतां कामा नये. पानिपतनंतर आम्ही पराभूत मनोवृत्तीनें वागलों. महाराष्ट्रामध्यें आतां त्याची पुनरावृत्ती होतां कामा नये. पानशेतचें आपण पाणशेत केलें पाहिजे, म्हणजे त्या पाण्याचा उपयोग परत चांगली सुजलाम् सुफलाम् शेती करण्याकरितां, वाढविण्याकरितां व्हावा म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे, अशा त-हेचें सामर्थ्य आपल्या जीवनामध्यें निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि तसें तें आपण निर्माण करूं शकलों तर लोकमान्यांच्या जीवनांतला एक पाठ आम्हीं आत्मसात् केला असें मी म्हणेन.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org