सह्याद्रीचे वारे - १४१

त्यांना काय व्हावेंसे वाटत होतें तें मीं आपणांला सांगितलें. पण त्यांना काय व्हावें लागलें तें सर्व आपल्यापुढें आहे. त्यांना केसरीचे संपादक व्हावें लागलें. त्या काळी संपादक होणें आजच्या इतकें सोपें झालेलें नव्हतें. ते केसरीचे संपादक झाले आणि त्या संपादकीय कामाकरितां त्यांना वारंवार तुरुंगाच्या यात्रा कराव्या लागल्या. संपादक म्हणून त्यांनी स्वतःच्या छापखान्याच्या पाट्या उचलल्या; गादीच्या वळकटीचें टेबल करून त्यावर त्यांनीं अग्रलेख लिहिले; कुठल्याहि त-हेनें कुणाचीहि पर्वा न करतां स्वाभिमानानें आलेला विचार त्यांनीं लिहिला; त्यासाठीं त्यांना अनेकदां तुरुंगामध्यें जावें लागलें. आणि हें त्यांना सर्व आयुष्यभर करावें लागलें, त्यांना काय वाटेल तें होतां येणें शक्य होतें, पण त्यांनीं त्याकडे पाठ फिरवली. त्यांच्या आख्यायिकांमध्यें कुठें तरी पूर्वी एक गोष्ट वाचल्याचें मला आठवतें. ते जेव्हां कॉलेजमध्यें जाऊं लागले तेव्हां त्यांना, त्यांच्या बहिणीनें तूं कोण होणार म्हणून विचारलें, तर त्यांनीं तिलाच उलट मीं कोण व्हावेंसें तुला वाटतें, असें विचारलें. त्याकाळच्या कोंकणामध्यें वाढलेलीं ती बहीण विशेष असें काय सांगणार ? तिनें त्यांना तूं आपल्या तालुक्याचा मामलेदार हो असें सांगितले. आणि तुम्हीं जर सहृदयतेनें तिच्या त्या सूचनेचा विचार केला तर तुम्हांला त्या सूचनेचा अर्थ कळेल. तिला माहेरपणाला दोन घोड्यांच्या बगीमध्यें घेऊन जाणारा मामलेदार भाऊ हवा होता. आणि त्या काळांतील बहिणीनें आणखी दुसरी कसली अपेक्षा करावयाची? पण यापेक्षां किती तरी पट जास्त मोठे लोकमान्यांना होतां आलें असतें. ही परिस्थिति जेव्हां होती त्या वेळीं, बुद्धीचा वकूब असणा-या या माणसानें देशासाठीं आपलें जीवन अर्पण करण्याचा निर्णय घेतला. तेव्हां सुद्धां सार्वजनिक जीवन होतें पण तें पसरलेलें नव्हतें, तेव्हां सुद्धां सार्वजनिक जीवनामध्यें काम करणारीं मोठमोठीं माणसें होतीं. तुलनेनें कोणाला कमीजास्त लेखण्याकरितां मी हें बोलत नाहीं. पण लोकमान्य टिळक आणि आगरकर या दोघांनीं घेतलेला हा निर्णय तेव्हांच्या हिंदुस्तानच्या सार्वजनिक जीवनामधला एक अपूर्व निर्णय होता, असें मला स्वतःला तरी वाटतें. आणि निदान महाराष्ट्राच्या जीवनापुरतें बोलावयाचें तर तो तसा निश्चित होता.

आणि म्हणून त्यासंबंधींची सल्लामसलत करावयास जेव्हां लोकमान्य आणि आगरकर रानड्यांकडे गेले - तेव्हां हजर असणा-या एका गृहस्थाची प्रसिद्ध झालेली ही आठवण आहे - तेव्हां तेथें असलेल्या लोकांनीं त्यांची हेटाळणी केली. पण रानड्यांना हीं मुलें कांहीं तरी नवीन मार्गानें जाण्याचा प्रयत्न करीत आहेत हें दिसलें. म्हणून त्यांनीं त्यांना उत्तेजनच दिलें. याप्रमाणें स्वतःचें सगळें शिक्षण, स्वतःची एवढी बुद्धिमत्ता, स्वतःचें कर्तृत्व असतांना सुद्धां या सगळ्यांचा उपयोग स्वार्थत्यागानें देशसेवेकरतां करण्याचा, लोकजागृतीसाठीं करण्याचा जो निर्णय लोकमान्यांनीं त्या वेळीं घेतला आणि त्यांतील सगळीं व्रतें स्वीकारून पुढें पाऊल टाकण्याची जी हिंमत त्यांनीं दाखविली त्याला फार मोठें महत्त्व आहे. आज सगळा बगीचा फुलला आहे. स्वातंत्र्य मिळालें आहे, राज्यें मिळालीं आहेत, आणि त्या राज्यांतील एका राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी बोलतों आहे, पण पायांतले दगड होण्याचे निर्णय ज्यांनीं घेतले त्यांचे आम्हीं लाख लाख उपकार मानले पाहिजेत. कुठल्या तरी अंधा-या रात्रीं चर्चा करतां करतां हे निर्णय या दोन तरुण माणसांनीं घेतले. या निर्णयांमध्यें हिंदुस्तानच्या आजच्या प्रगतीचीं बीजें आहेत, हें कृतज्ञतेनें आम्हीं मान्य करावयास पाहिजे.

लोकमान्यांच्या ह्या निर्णयाचा निव्वळ हिंदुस्तानपुरताच परिणाम घडलेला आहे असें नव्हें. आजहि आम्ही पाहतों. अनेक बाहेरचीं माणसें या देशांत येतात आणि आम्हांला भेटतात. त्यांतहि पूर्व आशियांतील आणि आफ्रिका खंडांतील माणसें जेव्हां आम्हांला भेटतात तेव्हां आमच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या इतिहासाचा फार सखोल अभ्यास या मंडळींनीं केला आहे असें आम्हांला आढळून येतें. अलीकडेच पूर्व नायगेरियाच्या राज्याच्या मुख्य मंत्र्यांची आणि माझी भेट झाली, त्यावेळी त्यांनी अत्यंत कृतज्ञतापूर्वक टिळक आणि गोखले यांचा माझ्याजवळ उल्लेख केला. आणि म्हणून मी म्हणतों कीं लोकमान्यांनीं त्या वेळीं घेतलेल्या निर्णयांतून निर्माण झालेले विचारप्रवाह आणि त्यांतून निर्माण झालेल्या भावना ह्या कांहीं भाषेच्या क्षेत्रांत किंवा देशाच्या सीमेंत मर्यादित होणारे विचार व भावना नव्हत्या. कुठल्याहि स्वाभिमानी मानवसमाजाला मार्गदर्शक ठरावे इतके महत्त्वाचे ते विचार आणि त्या भावना होत्या. अत्यंत थोर परंपरा असलेलें एक राष्ट्र दुस-या कुठल्या तरी राष्ट्राच्या जोखडाखालीं जें दबून पडलेलें आहे त्याला त्यांतून मुक्त करण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे, अशा त-हेचा मर्द विचार बोलून त्याप्रमाणें स्वतःचें जीवन आंखण्याचा प्रयत्न लोकमान्यांनीं केला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, हा मंत्र त्यांनीं त्या काळांत उच्चारला - आणि नुसताच उच्चारला असें नव्हे तर यशाची कांहींहि चिन्हें ज्या वेळीं दिसत नव्हतीं अशा काळांत आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षणन् क्षण त्यासाठीं त्यांनीं वेंचला. आज आम्ही म्हणतों कीं त्यांच्या कामाची दखल घेतली आहे आणि लौकिक अर्थानें त्यांचें जीवन यशस्वी झालें आहे. पण लोकांमध्यें जागृति निर्माण करण्याचें जें काम लोकमान्यांनीं केलें तें त्या अर्थानें तेव्हांहि यशस्वी झालें असें आतां आपण म्हटलें पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org