सह्याद्रीचे वारे - १३८

आणि त्याच छत्रपति शिवाजी राजांची प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतरचा पहिला प्रजासत्ताक दिन आम्ही आज साजरा करतों आहोंत. तो साजरा करतांना छत्रपतींची पवित्र स्मृति ध्यानांत ठेवून आजच्या या महान् प्रसंगी महाराष्ट्र राज्यातर्फे मी जुन्या प्रतिज्ञांचा नव्यानें उच्चार करूं इच्छितों. हें मराठी राज्य समतेचें राज्य व्हावें अशी महाराष्ट्र राज्याची प्रतिज्ञा आहे. जनतेंतील साधुता वाढावी ह्या तत्त्वाशीं प्रतिज्ञाबद्ध झालेलें असें हें राज्य आहे. आणि म्हणून यापुढच्या कांही वर्षांत दारिद्र्य आणि अज्ञान यांच्याशीं झगडा करून स्वाभिमानी, साधुतेवर विश्वास ठेवणारा आणि नीतिमत्तेनें आपलें पाऊल पुढें टाकणारा असा नवा समाज महाराष्ट्राच्या भूमीवर चालतांना, बोलतांना पाहण्याचे आमचें स्वप्न आहे तें पुरें करण्याची शपथ, शिवाजी राजांच्या स्मृतीला साक्ष ठेवून आज आम्ही पुन्हा घेत आहोंत.

शिवस्मारक समितीचें मला आज अभिनंदन केलें पाहिजे. या समितीचें काम माझे मित्र श्री. बाळासाहेब देसाई ह्यांनी हातांत घेतल्यापासून, त्यांनी आणि त्यांच्या अनेक सहका-यांनीं गेले कित्येक दिवस जे श्रम केले त्या श्रमांबद्दल जाहीरपणें त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मला टाकली पहिजे. आज आपल्या सर्वांच्या वतीनें आणि माझ्यातर्फे मी त्यांचें अभिनंदन करतों आणि त्यांना धन्यवाद देतों. माझे मित्र श्री. बाबूराव अत्रे आतांच माझ्याजवळ म्हणाले कीं, बाळासाहेब देसाईंनीं कुस्ती जिंकली. मी बाबूराव अत्र्यांना सांगूं इच्छितों कीं, आम्ही पुष्कळ कुस्त्या जिंकतों, पण तुम्ही त्या पाहात नाहीं. आज संयुक्त महाराष्ट्र समितीचे प्रतिनिधि म्हणून श्री. बाबूराव अत्रे आणि महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधि म्हणून मी एका व्यासपीठावर प्रेमानें बोलत होतों, हा माझा आनंदाचा भाग आहे हें मी आपणांला सांगू इच्छितों. या आनंदाच्या क्षणीं सगळीं मराठी मनें आज जशीं एकत्र आलीं आहेत, तशींच ज्या एका कठीण प्रयत्नांतून महाराष्ट्राला न्यावयाचा आहे त्या कामामध्यें तीं एकत्र यावींत व आमची एकमेकांची शक्ति एकमेकांना उपयोगी पडावी अशी शिवाजी महाराजांच्या जवळ आज मी प्रार्थना करतों. सुखाच्या वेळीं एकत्र येणारी माणसें दुःखाच्या आणि प्रयत्नाच्या वेळींहि एकत्र येतील तर दुनियेमध्यें कधीं कुणीं न पाहिलेला असा पराक्रम करून दाखवितील असा माझा विश्वास आहे, म्हणून मीं या गोष्टीचा उल्लेख केला. मला शिवस्मारक समितीचे आभार मानावयाचे आहेत, मराठी राज्यातर्फे आणि सबंध मराठी जनतेतर्फे तिचे आभार मानावयाचे आहेत. आज येथें अनेक व्यक्ति हजर नाहींत. त्यांचेंहि मला अभिनंदन केलें पाहिजे, त्यांचेहि मला आभार मानले पाहिजेत. माझे मित्र श्री. तिरपुडे आज येथें हजर नाहींत. पण त्यांनीं या शिवस्मारक समितीची कल्पना काढली आणि प्रयत्नाला सुरुवात केली. आज ते येथें हजर नसले तरी माझ्यातर्फे आणि श्री. बाळासाहेब देसाई यांच्यातर्फे त्यांचे मी मनापासून आभार मानतो.

मुंबई शहरांतील एक मोठें काम पुरें झालें म्हणून माझ्या मनाला आज अतिशय आनंद होत आहे. मुंबई शहरांत आज हजारों पुतळे आहेत. त्यांमध्यें छत्रपति शिवाजी राजांचा पुतळा नाहीं याचें मनाला दुःख होत होतें. पण इतिहास योग्य क्षणाची वाट पाहात असतों असेंच म्हटलें पाहिजे. शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा या शहरांत उभा रहिला तो नव्या महाराष्ट्राच्या रचनेची वाट पाहत होता असेंच म्हणावें लागेल. आणि नव्या महाराष्ट्राच्या रचनेंनंतरसुद्धां, त्यांतील भारतीय संदर्भ विसरला जाऊं नये म्हणून भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सुमुहूर्तावर तो येथें बसविला गेला. परमेश्वराला सुद्धां हेवा वाटावा अशा ठिकाणीं आज शिवाजी राजांची मूर्ति येऊन बसली आहे. परंतु एक गोष्ट अद्यापि अपुरी राहिली आहे. आज जसा येथें हा शिवाजी महाराजांचा पुतळा बसला आहे, तसाच त्यांच्या नांवानें समरांगण झालेल्या शिवाजी पार्कमध्येंहि त्यांचा पुतळा बसविण्याचें काम अपुरें राहिलेलें आहे याची आठवण आज मी आपणांस देतों. पु-या केलेल्या कामाची नोंद घेत असतांना अपु-या राहिलेल्या कामाचीहि आठवण आपण एकमेकांना करून देणें आवश्यक आहे. थोड्याच दिवसांमध्यें आपण सर्वजण मिळून तें काम पुरें करण्याचा प्रयत्न करूं. या अपु-या राहिलेल्या कामाची आठवण देऊन कोणाला हिणवावें अशा बुद्धीनें मीं त्याचा उल्लेख केलेला नाहीं. सबंध महाराष्ट्रीय जनतेची ती जबाबदारी आहे. त्यांतला माझाहि हिस्सा मी उचलावयास तयार आहें या भावनेनें मीं त्याचा उल्लेख केला आहे.

आज सबंध मुंबई शहरांतील जनता, निव्वळ महाराष्ट्रीय म्हणजे महाराष्ट्रांत राहणारी जनताच नव्हे, निव्वळ मराठी भाषिकच नव्हेत, तर हिंदी भाषिक, गुजराती भषिक आणि मुंबई शहरांत बोलल्या जाणा-या सगळ्या भाषांचे प्रतिनिधि येथें हजर असलेले मला दिसत आहेत. त्यांत ख्रिश्चन आहेत, हिंदु आहेत, मुसलमान आहेत. आज शिवाजी महाराज हे कुठल्याहि एका धर्माचें, कुठल्याहि एका जमातीचे, कुठल्याहि एका भाषेचे प्रतिनिधि नाहींत. आणि म्हणून मुंबई शहरांतील शेकडों जाति, शेकडों भाषा आणि सगळे धर्म यांचे प्रतिनिधि आज छत्रपति शिवाजी राजांना प्रणाम करण्यासाठी येथें एकत्र आले आहेत हे पाहून मला अतिशय आनंद वाटतो. धन्य शिवाजी महाराजांच्या स्मृतीची आणि धन्य महाराष्ट्र भूमीची कीं तिनें असा महापुत्र प्रसवला. मीं माझ्यातर्फे आणि आपल्या सर्वांच्या तर्फे छत्रपति शिवाजी महाराजांना पुन्हा प्रणिपात करतों आणि माझ्या नव्या शपथेचा उल्लेख करून मी आपणां सर्वांची रजा घेतों.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org