सह्याद्रीचे वारे - १३७

शिवछत्रपतींचे पुण्यस्मरण

महाराष्ट्राच्या इतिहासांत आणि एका अर्थांनें भारताच्याहि इतिहासांत आजचा हा दिवस सोन्याचा दिवस म्हणून गणला जाईल. आज प्रजासत्ताक दिन सबंध भारतभर साजरा केला जाईल. परंतु महाराष्ट्र राज्यांतील प्रजासत्ताक दिनाचा आजचा हा सोहळा, महाराष्ट्रांतील जनता छत्रपति शिवाजी महाराजांना प्रणिपात करून साजरा करीत आहे. छत्रपति शिवाजी महाराजांच्या ह्या मूर्तीची पश्चिम सागराच्या प्रवेशद्वारापाशीं स्थापना करून भारतनिष्ठेची आम्ही आज पुन्हा शपथ घेत आहोंत.

छत्रपति शिवाजी महाराजांची स्मृति ही भारताच्या सेवेची स्मृति आहे. छत्रपति शिवाजी महाराजांना मराठी मनानें निव्वळ महाराष्ट्राचे नेते मानले नव्हतें. छत्रपति शिवाजी महाराज हे सबंध भारताचे नेते होते. मानव्याचा एक अत्यंत उत्कृष्ट आदर्श त्यांच्या जीवनामध्यें आपल्याला पाहावयास सांपडतो. छत्रपति शिवाजी महाराज झाले नसते तर भारताचें काय झालें असतें तें सर्व जगाला माहीत आहे. पाकिस्तानची सीमा शोधण्याकरितां फार लांब जावें लागलें नसते. कदाचित् ती तुमच्यामाझ्या घरापर्यंतहि येऊन पोहोंचली असती. छत्रपति शिवाजी महाराजांनीं केलेली ही सेवा निव्वळ मराठ्यांचें राज्य निर्माण व्हावें म्हणून केलेली नव्हती. त्या वेळच्या मोंगली सत्तेशीं ते लढले, पण मुसलमानांशी त्यांचें वैर होतें असें नव्हें. सामान्य माणसांना बरोबर घेऊन एक नीतीचें नवे राज्य उभारावें अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती. त्यावेळी हिंदुस्तानांतील सगळी मनें दबलीं गेलीं होतीं. त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला होता. त्याला वाचा फोडण्याचें काम कुठल्या तरी वाणीद्वारा होणें आवश्यक होतें. हें काम छत्रपति शिवाजी महाराजांच्या मुखानें सह्याद्रीला करावें लागलें. हा इतिहास आम्ही विसरूं इच्छीत नाहीं. दुर्दैवानें शिवाजी महाराजांचें नांव कांहीं प्रसंगी आम्ही चुकीच्या अर्थानें घेतों आणि त्यामुळें कांहीं लोकांच्या मनांत गैरसमज निर्माण होतो. त्यांच्यासाठी मी सांगूं इच्छितों कीं, नव्या महाराष्ट्र राज्याची निर्मिति ही छत्रपति शिवाजी राजांची पुण्याई आहे असें आम्ही मानतों. त्याचा अर्थ आम्हांला प्रांतिक भावनेची वाढ करावयाची आहे असा मात्र नाही. महाराष्ट्राबाहेरच्या विचारी माणसांना मी सांगू इच्छितों कीं; अशा त-हेची कुठलीहि भावना आमच्या मनांत नाहीं. छत्रपति शिवाजी महाराजांची ही मूर्ति त्यांची निव्वळ प्रतिमा आहे असें आम्ही मानीत नाहीं, तर भारतामध्यें जी तेजस्विता आहे, भारताची जी अस्मिता आहे, भारताचा जो स्वाभिमान आहे, त्या तेजस्वितेचें, त्या अस्मितेचें आणि त्या स्वाभिमानाचें ही मूर्ति एक प्रतीक आहे अशी आमची तिच्या पाठीमागची भावना आहे. आणि म्हणून आजचा हा दिवस निव्वळ महाराष्ट्राच्याच इतिहासांतील नव्हे तर भारताच्याहि इतिहासांतील एक सोन्याचा दिवस आहे असें मी सुरुवातीस म्हणालों.

छत्रपति शिवाजी महाराजांनी त्या काळी महाराष्ट्र राज्याची जी रचना केली तिच्यामध्यें त्यांनीं कांहीं मूलभूत गोष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्यांचा आदर्श भारताच्या राज्यानें आजहि स्वीकारावा अशा त्या गोष्टी आहेत. पश्चिम समुद्राकडे तोंड करून मी असा उभा असतांना महाराजांनी निर्माण केलेल्या मराठ्यांच्या आरमाराचा विचार माझ्या मनाशीं आला. आमच्या पश्चिम किना-यावरील गरीब जनतेच्या सामर्थ्यावर आरमार उभें करण्याचा त्यांनीं प्रयत्न केला. हा इतिहास मीं आज परत आपणांला सांगितला पाहिजे असें नाहीं. विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग त्याची साक्ष देत आजहि पश्चिम समुद्रामध्यें उभे आहेत. त्यांनीं जनतेचें राज्य रचण्याचे जे नवे नवे प्रकार अंमलांत आणले ते तेव्हांच्या हिंदुस्तानच्या इतिहासामध्यें नवे होते. जुन्या सरंजामी मदतीवर शिवाजी महाराजांनी आपलें राज्य उभें केलें नाही. मावळच्या खेड्यांतील लंगोटी घालणा-या साध्या शेतक-याला त्यांनीं शूर शिपाई बनविला. मोडकीं तोडकीं भीमथडीचीं तट्टें त्यांनीं आपली विमानें बनविलीं आणि त्यांच्या बळावर आपली सेना त्यांनीं सबंध हिंदुस्तानभर विखुरली. असा हा सामान्य माणसांचा राजा होता. आणि तो नीतीचें प्रतीक होता, चारित्र्याचें प्रतीक होता. म्हणूनच महाराष्ट्रांतील लाख लाख मनें छत्रपति शिवाजी राजांच्या स्मृतीवर स्वतःची कुरवंडी करण्यास तयार झालीं. त्याच्या पाठीमागची महाराजांची भव्य शक्ति आपण लक्षांत घेतली पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org