सह्याद्रीचे वारे - १३५

परवांच आपल्या राज्यांतील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सत्काराला उत्तर देतांना त्यांनीं एक उत्कृष्ट सल्ला दिला. हा सल्ला त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळाला होता. डॉक्टरनें दिलेलें सर्टिफिकेट, पोलिस अधिका-यानें केलेली चौकशी व इंजिनिअरनें तयार केलेला अंदाज या तीन गोष्टींखेरीज जगांतील इतर कोणतीहि गोष्ट तुम्ही बदलूं शकतां असें त्यांनी सांगितलें. कारण या तीन गोष्टींविरुद्ध कोठेंहि दाद मागतां येत नाहीं. यांतील विनोदाचा भाग सोडला तर तांत्रिक बाबींसंबंधीं सध्याची परिस्थिति अशाच प्रकारची आहे. जेव्हां धंदेवाईक प्रशासक सल्ला देतो तेव्हां तो नव्याण्णव टक्के धोरण ठरवीत असतो. तेव्हां प्रशासकाचें काम निव्वळ ठरलेलें धोरण अंमलांत आणण्याचे असतें असें समजणें या काळांत तरी सयुक्तिक होणार नाहीं.

धंदेवाईक राजकारणी आणि धंदेवाईक प्रशासक निरनिराळ्या पातळींवर कार्य करीत असले आणि त्यांच्या कार्याच्या पद्धती व त्यांचीं साधनें भिन्न असलीं तरी लोकशाहीमध्यें त्यांना मार्गदर्शन करणारी शक्ति व तत्त्वें एकच असतात. जो निवडून येतो तोच लोकशाहीचें प्रतिनिधित्व करतो, परंतु लोकशाही यंत्रणेचा कायम स्वरूपाचा घटक असणारा मात्र तें करीत नाहीं असें म्हणणें रास्त होणार नाहीं. अशा प्रकारच्या कल्पनांनीं लोकशाही कधींच यशस्वी होणार नाहीं. कारण त्यामुळें लोकशाहींत सतत मतभेद व अडथळे निर्माण होऊन राज्यकारभारांत लोकशाही नाममात्र देखील शिल्लक राहणार नाहीं. म्हणून लोकशाहींशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीनें, केवळ राजकीय क्षेत्रांतच नव्हे तर सामाजिक व आर्थिक क्षेत्रांत देखील, लोकांचें समाधान हेंच आपलें अंतिम उद्दिष्ट मानलें पाहिजे. राजकारण आणि प्रशासन या दोन्ही क्षेत्रांतील लोकांचे हेंच उद्दिष्ट असलें पाहिजे. कारण ह्या दोन्ही क्षेत्रांतील व्यक्ति शेवटीं जनतेंतूनच आलेल्या असतात आणि त्यांना जनतेचें भवितव्य घडवून आणण्याचेंच कार्य करावयाचें असतें. राज्यशास्त्र आणि लोकशाहींतील प्रशासन यांना सांधणारा दुवा हाच आहे असें मला वाटतें.

लोकशाहींतील प्रशासनांत जे जाऊं इच्छितात त्यांनीं ही गोष्ट सुरुवातीपासून नीट समजावून घ्यावी. मी म्हणतों त्याप्रमाणें त्यांनीं ही गोष्ट समजावून घेऊन आपल्या दैनंदिन कामांत सतत नजरेसमोर ठेवली तर आपले पुष्कळसे प्रश्न आपोआप सुटतील. एका ज्येष्ठ प्रशासकानें एकदां असे उद्गार काढले होते कीं, मंत्र्यांना 'नाहीं' म्हणण्याचें आणि प्रशासकांना 'होय' म्हणण्याचें शिक्षण मिळालें तर बरें होईल. यांत पुष्कळच अर्थ आहे. कारण हें घडून आलें तर लोकशाहींतील आणि लोकशाहीच्या प्रशासनांतील पुष्कळशा प्रश्नांसंबंधी चिंता करण्याचे आपणांस कारणच राहणार नाहीं.

या सर्व गोष्टी आपल्याला मी हेतुपूर्वक सांगत आहें. प्रशासनाच्या कोणत्याहि शाखेंत तुम्ही प्रवेश करा, परंतु मीं सांगितलेल्या गोष्टी कृपा करून विसरूं नका. एखाद्या खासगी संस्थेंत किंवा एखाद्या कारखान्यांत तुम्ही काम करणार असलां तरी तेथेंहि हीच कसोटी तुम्हांला दृष्टीसमोर ठेवावी लागेल. प्रशासकाकडून अखेरीस हीच अपेक्षा असते. खासगी व्यापारी संस्थेत देखील ग्राहकांचे समाधान ह्याच न्यायाचें त्याला पालन करावें लागतें. प्रयोगशाळेंत काम करणारा शास्त्रज्ञ असो किंवा रंगभूमीवर काम करणारा नट असो किंवा समाजसेवेच्या क्षेत्रांत गाजावाजा न करतां काम करणारा कार्यकर्ता असो, त्यानें एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे ती ही कीं, आपण जें कांहीं काम करतो त्याचा अंतिमतः जनतेच्या जीवनावर परिणाम होत असतो.

लोकशाही ही केवळ विधानसभेपुरतीच नसते, किंवा ती केवळ प्रशासनाचेंच कार्य करीत नाहीं. अधिक खोल अर्थानें पाहिलें तर सध्यांच्या आधुनिक समाजांत प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर लोकशाहीचीं तत्त्वें आपला प्रभाव पाडीत असतात. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हीं समजावून घेतली पाहिजे. लोकशाही ही केवळ राजकीय कल्पना नाहीं असें जें मी म्हणतों तें याच अर्थानें. लोकशाही आतां एक सामाजिक आणि आर्थिक कल्पनाहि बनली आहे. जो विद्यार्थ्यांचें खरें समाधान करतो तो चांगला शिक्षक. तो निवडणुकीसाठीं उभा राहात नाहीं, तरीहि त्याला मान्यता मिळते. माझ्या विद्यार्थिदशेंत एक प्राध्यापक होते. त्यांच्या कॉलेजांतील विद्यार्थीच नव्हे तर दुस-या कॉलेजांतील विद्यार्थीहि त्यांचा अतिशय मान राखीत असत. शेक्सपिअर शिकविणारें दुसरे एक  अत्यंत नामवंत प्राध्यापक होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org