सह्याद्रीचे वारे - १३

आम्हीं आमच्या मनांतून तें काढून टाकलें पाहिजे. आमच्यामध्येंहि कांहीं उद्योगधंद्याचें कर्तृत्व निर्माण करतां येतें. तें तसें निर्माण करून, त्याची वाढ करून या क्षेत्रांतहि पुढें जाण्याचा आम्ही प्रयत्न करावयास पाहिजे. आम्हीं आमच्यामध्यें किर्लोस्करांसारख्या व्यक्ति निर्माण केल्या. आजहि आमच्या येथें मोठ्या पल्लेदार बुद्धीने विचार करणारे कारखानदार निर्माण होत आहेत, ते काय आमच्यांत उद्योगधंद्याची दृष्टि नसण्याचें लक्षण आहे ? मी म्हणतों, ख-या अर्थांनें आमच्यामध्येंहि ही दृष्टि आहे. फक्त आम्हांला तांत्रिक शिक्षण, वेगवेगळ्या शास्त्रांचे शिक्षण घेतलें पाहिजे. अशा त-हेच्या शिक्षणाला आम्ही प्राधान्य दिलें पाहिजे. याशिवाय ज्याला आपण निव्वळ ह्युमॅनिटीजचें शिक्षण म्हणतों अशा त-हेच्या शिक्षणाचेंहि अर्थात् महत्त्व आहेच. तें मूलभूत शिक्षण आम्हांला मंजूर आहे. आणि या शिक्षणाच्या बाबतींत, शिक्षणाची सारीं दारें सताड उघडी करून तें खालच्या थरापर्यंत पोहोंचविण्याचें आमचें ध्येय असलें पाहिजे. मी तर असें म्हणेन कीं, या त-हेच्या शिक्षणाचे प्रकाशझोत अगदीं शेवटच्या थरापर्यंत जर आम्ही नेऊं शकलों, तर महाराष्ट्राची शक्ति इतकी जबरदस्त वाढेल कीं, त्याला कोणाच्याहि मेहेरबानीवर अवलंबून राहण्याचें कारण राहणार नाही. तो स्वतःचे रक्षण करील आणि राष्ट्राचेंहि रक्षण करील. हा एक महत्त्वाचा विचार मला या निमित्तानें आपल्यापुढे मांडावयाचा आहे.

राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांत माझ्या दृष्टीनें महाराष्ट्रापुढें आज ज्या समस्या आहेत त्यांची चर्चा करून त्यांसंबंधी माझ्या मनांतील विचार आज आपल्यापुढें मांडण्याचा मीं प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणें त्यांतून निघणारीं, माझ्या बुद्धीला सुचतील अशीं उत्तरेंहि आपणांला मीं दिलीं आहेत. आणि आज मी प्रत्यक्ष तुमच्यापुढें बोलत असलों तरी तुमच्यामार्फत सबंध महाराष्ट्राशींच मी बोलत आहें, आणि म्हणून तुमच्यामार्फत महाराष्ट्रांतील सर्व जनतेला, जेथपर्यंत माझा आवाज पोहोंचू शकेल तेथपर्यंत, मी विनंतीपूर्वक सांगू इच्छितो कीं, या सगळ्या प्रश्नांची दखल घेऊन त्यांची उत्तरें देण्याचें काम आतां तुम्हांआम्हांला करावयाचें आहे. हें काम सोपें नाहीं. हें काम तुम्हीं एकट्या यशवंतराव चव्हाणांवर सोपविलें किंवा त्यांच्या मंत्रिमंडळांतील सहका-यांवर सोपविलें तरी आम्ही सुद्धा कुणी माणसेंच आहोंत; म्हणून आमच्या हातून त्यांत चुका होणारच नाहींत असे सांगू शकत नाहीं. मीं मागे आपल्याला सांगितलें होतें कीं आमच्या शक्तीला, आमच्या बुद्धीला जितकें झेपेल तितकें करण्याचा आम्ही प्रयत्न करीत राहू आणि त्याप्रमाणें आम्हीं तो प्रयत्न केलाहि आहे. आमच्या हातून चुका घडलेल्या नाहींत असा आमचा दावा नाहीं आणि पुढें त्या घडणार नाहींत अशी प्रतिज्ञाहि नांहीं. प्रतिज्ञा एका गोष्टीची आहे, ती म्हणजे आमच्या बुद्धीला पेलेल त्या हिंमतीनें आम्ही निर्णय घ्यावयाचा प्रयत्न करूं आणि प्रामाणिकपणें तो अंमलांत आणण्यासाठीं झटू. एका गोष्टीची मात्र आम्हांला जरुरी आहे. आपला आशीर्वाद आम्हांला पाहिजे, आपल्या प्रेमाचा आधार आम्हांला पाहिजे. आपल्या आशीर्वादाच्या बळावरच आम्ही ही जबाबदारी उचलतो आहोंत. म्हणून आपली शाबासकीची थाप जरी नसली तरी आपली रागाची नजर नसावी, एवढीच माझी आपल्याकडून अपेक्षा आहे.

गेल्या दोनचार महिन्यांत जबाबदारी घेऊन आम्हांला कांहीं निर्णय घ्यावे लागले. आम्हांला महाराष्ट्रापुढील प्रश्नांची नुसतीच तात्त्विक चर्चा करावयाची असती तर किती तरी प्रश्न मीं तुमच्यापुढें मांडले असते, कारण मला ते जास्त माहीत आहेत. घोड्यावर बसणा-यालाच घोड्याची खोडी माहीत असते. त्याचप्रमाणें राज्यकारभाराचे प्रश्न आम्ही हाताळतों म्हणून त्यांत काय दोष आहेत तें आम्हांला जास्त माहीत आहे. परंतु आम्हांला निव्वळ तात्त्विक चर्चा करून दोष काढावयाचे नव्हते. तेथें बसल्यावर 'दे, घे' करून मला निर्णय घ्यावयाचे होते. आपल्या खेड्यांतील गोष्ट आहे, ती मी आपल्याला सांगतों. एका छोट्या वस्तादाची एका चांगल्या वस्तादाशीं गांठ पडली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org