सह्याद्रीचे वारे - १२

पण केवळ औद्योगिक मुंबई शहर सुधारलें म्हणजे महाराष्ट्र सुधारला असें नाहीं. मला आठवतें कीं, हिंदुस्तानांतील कांहीं परिषदांत मुंबईचा मुख्यमंत्री म्हणून मी बसलों असतांना पुष्कळ वेळां मला एक विचित्र अनुभव आला आहे, आणि तो म्हणजे आम्हीं सगळ्या गोष्टी मागितल्या तरी चालतात, पण उद्योगधंद्यांच्या बाबतींत आम्ही कांही मागितलें म्हणजे बाकीच्यांच्या डोळ्यांवर येतें. ते विचारतात, मुंबईला आणि उद्योगधंदे ? त्यांची समजूत अशी कीं, मुंबई राज्यांत सर्वत्र मुंबई शहरासारखीच औद्योगिक परिस्थिति असली पाहिजे. परंतु येथें असे कितीतरी मागासलेले भाग आहेत कीं, जेथें अद्यापि कुठलेहि उद्योगधंदे गेलेले नाहींत. आपणांला या मागासलेल्या भागांचा आतां विकास करावयाचा आहे. त्याचप्रमाणें विदर्भाचे, मराठवाड्याचे जे कांही अविकसित भाग आहेत त्यांचाहि आपणांस विकास करावयाचा आहे. उदाहरणार्थ, नागपूरच्या बाजूला अनेक उद्योगधंदे वाढण्याची शक्यता आहे. कोळसा आणि लोखंड यांची विपुल संपत्ति तेथें आहे. कारखानदारीसंबंधींच्या आमच्या कांही चुकीच्या कल्पना आहेत, कापडाच्या गिरण्यांना आपण कारखानदारी म्हणतों. मी तर त्याला कारखानदारी म्हणत नाहीं. कापड तयार करणा-या कारखानादारीला, कंझ्युमर्स गुड्स तयार करणा-या कारखानदीराला, लोक म्हणतात म्हणून कारखानदारी म्हटलें पाहिजे इतकेंच. ज्याला खरी कारखानदारी म्हणतां येईल, अशी लोखंडाची कारखानदारी असूं शकते, कोळशाची असूं शकते, यंत्रनिर्मितीची असूं शकते, रासायनिक द्रव्यांच्या निर्मितीची असूं शकते. अशा प्रकारच्या कारखानदारीकरितां लागणारा मालमसाला, साधनसामुग्री, नागपूरच्या आवतींभोंवती, विदर्भाच्या भागांत आहे. आम्हांला तिकडे लक्ष दिलें पाहिजे, त्या प्रश्नाला प्राधान्य दिलें पाहिजे. त्याचबरोबर आमच्या शेतीमध्यें जो माल तयार होतो, ज्या वस्तु तयार होतात त्या वस्तुचा पक्का माल तयार करण्यासाठीं आम्हांला कारखाने उभे करतां आले पाहिजेत. हें असली काम आहे. आजपर्यंत आमच्याकडे उंसाचे मळे होतें. या मळ्यांतील उंसाचे केव्हां तरी गु-हाळ करून पाव्हण्यारावळ्यांना किंवा इष्टमित्रांना बोलावून त्यांना रस पाजावयाचा व राहिलेला ऊंस कोठें तरी अडत्याच्या दुकानांत विकून टाकावयाचा म्हणजे संपलें शेतीचें काम, असें लोक मानीत असत. पण आपण आतां त्या उंसाचे मोठ्या प्रमाणावर साखरेचे कारखाने उभे करावयाला शिकलों आहोंत. तेंव्हा आमच्या शेतीमध्यें जो कांही माल तयार होतो त्याचा पक्का माल बनविण्यासाठीं आम्हांला कारखाने उभे करतां आले पाहिजेत. आतां पश्चिम महाराष्ट्रांत हिंदुस्तानांतील लोकांच्या नेतृत्वानें लोखंडी कारखान्यांची, इंजिनियरिंग वर्क्स ज्याला आपण म्हणतों त्यांची कारखानदारी सुरू झालेली आहे. इंजिनियरिंगच्या कारखानदारीची परंपरा आपल्या महाराष्ट्राची आहे. कोल्हापूरच्या भागांत कुशल कारागिरी करणारे लोक आहेत. कोठलीहि इंजिनियरिंगची परीक्षा पास न झालेली आमची ही मिस्त्री मंडळी उत्तम इंजिनें तयार करतात. ही जी कांहीं आमची अक्कल आहे, हें जें कांही आमचें कौशल्य आहे, त्याचा आम्हांला अभिमान वाटावयास पाहिजे. या लोकांच्या बुद्धीला, कर्तृत्वाला जर आम्हीं खतपाणी दिलें तर यांतून कांहींतरी नवीन निर्माण होण्याचा संभव आहे. म्हणूनच आपण या बाबतींत जोराचा प्रयत्न करावयास पाहिजे. महाराष्ट्राच्या सगळ्या भागांतून उद्योगधंद्यांची वाढ झाली पाहिजे. हा आज आमच्यासमोर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे.

तिसरा जो प्रश्न आहे तो मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांतून निर्माण होणारा असून त्यांतहि शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासंबंधानें विस्तृत बोलण्याचा हा प्रसंग नाहीं. कारण मी आपल्याशीं फार वेळ बोलत राहिलों आहें. आमच्या शिक्षणाची पद्धति कशी असावी हाहि आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आजपर्यंत आम्हीं ज्या त-हेचें शिक्षण घेतलें तें शिक्षण चांगलें असेल, योग्यहि असेल, परंतु त्यामुळें आमच्यांत नोकरीपेशाची मनोवृत्ति निर्माण झाली आहे. आम्हांला असें सांगण्यांत येतें कीं, आमची बुद्धिच-आमचा पिंडच-नोकरीपेशाचा आहे. मला ही गोष्ट मंजूर नाहीं. आजपर्यंत आम्हीं नोक-या केल्या अशी कल्पना करूं या. परंतु नोक-या सुद्धां आम्हांला ब्रिटिश राजवटीतच कराव्या लागल्या. आम्ही महाराष्ट्रांतले लोक तोपर्यंत शेती करीत होतों, जमलें तर राज्य करीत होतो, नाहीं तर परस्परांशीं भांडत होतों. परंतु हें नोकरी करण्याचें तंत्र, हें पेन्शनीचें वेड आमच्या डोक्यांत ब्रिटिश राजवटीनें भरविलें. तेव्हां आमची बुद्धिच तशी आहे हें एक थोतांड आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org