सह्याद्रीचे वारे - ११९

लहानमोठ्या पातळीवरील लोकांच्या या संस्था अर्थातच लोकशाही पद्धतीनें उभारल्या गेल्या पाहिजेत. कारण निरनिराळ्या पातळीवर लोकशाही संस्था निर्माण झाल्याशिवाय आपण लोकशाही नेतृत्व निर्माण करूं शकणार नाहीं. लहानलहान क्षेत्रांत काम करणा-या ह्या लोकशाही संस्थांतूनच भावी नेते तयार होतील. आपण स्वीकारलेली लोकशाही पद्धत दृढमूल करण्याच्या दृष्टीनें या गोष्टीला फार महत्त्व आहे. लोकशाही जीवनपद्धतीवर आपली संपूर्ण निष्ठा आहे. आणि म्हणून आपली प्रत्येक कृति, ही निष्ठा दृढतर कशी होईल या दृष्टीनें घडली पाहिजे.

आपली आर्थिक परिस्थिति लक्षांत घेतां या संस्थांनी सेवावृत्तीनें काम करणें अत्यंत जरुरीचे आहे. हें घडून येण्यासाठीं या संस्था चालविण्याची जबाबदारी ज्या माणसांवर पडेल ती माणसें वृत्तीनें सेवाभावी आणि त्यागी असलीं पाहिजेत. अशा वृत्तीच्या मंडळींची आपणांमध्यें आज उणीव आहे अगर ती यापुढें भासेल असें मला मुळीच वाटत नाहीं. मात्र अशा व्यक्तींना काम करण्याची अधिकाधिक संधि मिळाली पाहिजे. आणि म्हणून निरनिराळ्या पातळींवर लोकशाही संस्थांची उभारणी आपण अशा प्रकारें करावयास पाहिजे कीं, त्यामुळें त्यांना आपल्या विकासयोजना सुरळीतपणें पार पाडतां येतील. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांतील आपलें उद्दिष्ट साध्य करण्यासाठीं या संस्थांना अविश्रांत श्रम करावे लागतील व त्याचप्रमाणें त्यांना कल्याणकारी यंत्रणेचे महत्त्वाचे घटक बनावें लागेल. या संस्थांना सुरळितपणें कार्य करतां आलें पाहिजे असें मीं म्हटलें. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा कीं, आपल्या जबाबदा-या पार पाडण्यासाठीं त्यांना जरूर ते अधिकार असले पाहिजेत आणि त्यासाठीं योग्य प्रकारची यंत्रणाहि त्यांच्याजवळ असली पाहिजे. शिवाय त्यांच्या कामासाठी लागणारा पैसाहि त्यांच्याजवळ असला पाहिजे. तसेंच, त्यांना तांत्रिक सल्ला व जरूर तें मार्गदर्शन मिळालें पाहिजे आणि विकासाच्या विविध कार्यासाठी जनतेचें सहकार्य मिळविण्याची त्यांच्यांत ताकद असली पाहिजे. थोडक्यांत म्हणजे, विकासाच्या क्षेत्रांतील स्थानिक स्वराज्यसंस्था म्हणून ख-या अर्थानें त्यांना काम करतां आलें पाहिजे. परंतु याहिपेक्षां महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचें कार्य नेहमी जनहिताला पोषक होईल या भूमिकेवरूनच झालें पाहिजे. या दृष्टीनें आपल्या कार्यक्रमपत्रिकेवर असलेल्या सर्व प्रश्नांचा आपण सखोल आणि सर्वांगीण विचार करणें फार आवश्यक आहे. लोकशाही विकेन्द्रीकरणाची ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे असें माझें ठाम मत आहे. आणि म्हणून या बाबतींत आम्हांला कोणतेहि फेरबदल घाईनें करावयाचे नव्हते. विशेषतः आपल्या राज्यांत अगोदरच निरनिराळ्या प्रकारच्या लोकशाही संस्था कार्य करीत असल्यामुळें लोकशाही विकेंद्रीकरणाच्या दृष्टीनें पुढचें पाऊल टाकण्यापूर्वी तत्संबंधी सर्व प्रश्नांचा अत्यंत बारकाईनें विचार करणें आवश्यक आहे असें आम्हांला वाटलें आणि म्हणून या समितीची नेमणूक करण्यांत आली.

आपण येथें जी चर्चा करणार आहांत तिची आपल्या अंगीकृत कार्यांत आपल्याला बरीच मदत होईल या विचारानें विकेंद्रीकरण समितीनें हा परिसंवाद घडवून आणलेला आहे. येथें होणा-या चर्चेमुळें आपल्या ज्ञानाचा आणि अनुभव समितीला जो लाभ मिळेल त्याचा तिला चांगलाच उपयोग होईल. म्हणून आपणांस मला सांगावेंसें वाटतें कीं, येथें होणारी चर्चा खुल्या आणि मोकळ्या मनानें होऊं द्या. आपल्या मनांत कोणताहि आडपडदा न ठेवतां आपले विचार खुल्या दिलानें आपण प्रदर्शित करा. आपणांस जे निरनिराळे महत्त्वाचे प्रश्न सोडवावयाचे आहेत त्यांपैकी कांहींचा उल्लेख मीं केलाच आहे. तेव्हां आपला अधिक वेळ न घेतां या परिसंवादांत आपण सर्वांनीं उत्साहानें भाग घेऊन तो यशस्वी करावा अशी मी आपणांस आग्रहाची विनंती करतों.

लोकशाही विकेंद्रीकरण समितीनें या परिसंवादाचें उद्घाटन करण्यास मला बोलाविलें त्याबद्दल समितीचे आभार मानून मीं हा परिसंवाद सुरू झाला असें जाहीर करतों व या परिसंवादाला सुयश चिंतितों.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org