सह्याद्रीचे वारे - ११३

त्यासंबंधीं आपल्या मनाला सतत चिंता लागून राहिल्याशिवाय हा विलंबाचा प्रश्न सुटणार नाहीं. विलंब हा सबंध राज्यकारभाराच्या पाठीमागें लागलेला एक राक्षस आहे, असें माझें मत आहे. नित्य जागरुकता ठेवल्याशिवाय हा राक्षस पराभूत होणार नाहीं. तो एकदां पराभूत होऊन जात नाहीं. तो रोज जन्माला येतो, प्रत्येक क्षणाला जन्माला येतो आणि प्रत्येक क्षणाला त्याच्याशीं युद्ध करावें लागते. म्हणून एखाद्याच दिवशीं विलंबाचा प्रश्न दूर झाला तर त्याचा उपयोग नाहीं. दुस-या दिवशीं परत विलंब होण्याची शक्यता असते. ज्याला आपण सरकारी यंत्रणेचें काम म्हणतों, त्याला मराठींत कागदावरचे घोडे नाचविणें म्हणतात. राज्यकारभारामध्यें खरेखुरे घोडे नाचूं शकत नाहींत, ते कागदावरचेच नाचतात. तेव्हां या कागदी घोड्यांना आपण सारखें पळविलें पाहिजे, हलविलें पाहिजे, त्यांच्या संबंधीं जागरूक राहिलें पाहिजे. अधिक माहिती मागविण्याकरितां जें काम जाणार असेल त्याच्यासंबंधीं कांहीं निश्चित निर्णय घेतले पाहिजेत. जी माहिती द्यावयाची असेल तिच्याकरितां सर्वसाधारणपणें दोन दिवसांची, कांहीं बाबतींत आठ दिवसांची, कांहीं बाबतींत दहा दिवसांची, पंधरा दिवसांची ह्याप्रमाणें जास्तींत जास्त कालमर्यादा निश्चित केली पाहिजे. माहिती मागविण्याकरितां गेलेला कागद अमुक दिवसांनीं परत आलाच पाहिजे, अशी आपल्याला आणि त्याचप्रमाणें ज्याच्याकडून माहिती मागवायची असेल त्यालाहि संवय लागली पाहिजे. कारण आपल्याकडे आलेलें काम ज्या दिवशींचें त्या दिवशी पुरें झालेंच पाहिजे अशी त्याला संवय लागली कीं, तोहि माहिती पाठविण्याचें काम कदापि लांबविणार नाहीं.

दुसरा प्रश्न लांचलुचपतसंबंधींचा आहे. राज्यकारभारांतून लांचलुचपत अजिबात नाहींशी झाली आहे असें आपण म्हणूं शकणार नाहीं. ज्याला 'करप्शन बाय एक्स्टॉर्शन' म्हणतां येईल अशी सक्तीनें पैसे वसूल करण्याची लांचलुचपतीची पद्धत पूर्वी राज्यकारभारामध्यें कांही ठिकाणी चालू होती. परंतु ही पद्धत आतां बंद होत चालली असून ती बंद करण्यांत लांचलुचपत प्रतिबंधक खात्यानें बरेंच यश मिळविलें आहे. परंतु संमतीनें लांचलुचपतीचे जे प्रकार घडतात त्यांना आळा घालण्यांत आपण कितपत यशस्वी झालों आहोंत हे मला माहीत नाहीं. या बाबतींत जिल्हाधिका-यांनीं या अनिष्ट प्रकाराला आळा घालण्याच्या दृष्टीनें विचार करून सरकारला सूचना कराव्यात अशी मी आपल्याला विनंती करतों. आपल्या सहकार्याची या बाबतींत मला अतिशय आवश्यकता आहे.

लांचलुचपतीचा एक अप्रत्यक्ष प्रकार आहे. तो म्हणजे कांहीं ठराविक पद्धतीनेंच अधिका-यांकडे गेलें तर काम होतें हा होय. या प्रकारामध्यें कांहीं दिलें जात नाहीं, घेतलें जात नाहीं, याची मला खात्री आहे. पण काम व्हावयाचें असेल तर ओळखीनें किंवा एका विशिष्ट पद्धतीनें गेलें पाहिजे, अशा त-हेची लोकांची भावना होणें याला मी लांचलुचपत म्हणतों. म्हणून ह्या दृष्टीनें राज्यकारभार व्यक्तिनिरपेक्ष होण्याची आवश्यकता आहे. कोणत्याहि पक्षाचा मनुष्य असो, अथवा त्याचें समाजांतील स्थान कोणतेंहि असो, आपलें काम योग्य व न्याय्य असल्यास अधिका-यांकडून आणि राजसत्तेकडून तें होईल असा त्याला विश्वास वाटला पाहिजे. तो गरीब आहे, त्याला आपले प्रश्न व्यवस्थितपणें मांडतां येत नाहींत, तो पुढें यावयास घाबरतो, त्याची व आपली ओळख नाहीं, असल्या अडचणी त्याच्या आड येतां कामा नयेत. तो मनुष्य कदाचित वाईटहि असेल, पण त्याचें गा-हाणें योग्य असेल तर त्याच्या बाबतींत आपल्याकडून अन्याय होतां कामा नये. इतक्या प्रमाणांत राज्यकारभार व्यक्तिनिरपेक्ष होणें आवश्यक आहे. त्यासाठीं आपण व्यक्तीपलीकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र याचा अर्थ असा नव्हे कीं, एकदां एक नियम करावयाचा आणि तो नियम डोळे झांकून पाळावयाचा. अशा प्रकारचा व्यक्तिनिरपेक्ष राज्यकारभार फार धोक्याचा ठरेल. कारण कोणत्याहि गोष्टींत शेवटीं माणुसकीची म्हणून बाब असते. आणि तींत जो मानवी संबंध येतो तो टिकविण्यास चोवीस तास नुसतें कायद्याकडे आणि नियमाकडे बोट दाखवून चालत नाहीं. म्हणून आपल्यापुढें होण्यासारखें जें काम असेल तें आपण अडचणींतून मार्ग काढून केलें पाहिजे. अशा रीतीनें एखादा प्रश्न सोडविण्याचा जो मार्ग असतो तो आपण सोडून देतां कामा नये. या अर्थानें कारभार व्यक्तिनिरपेक्ष व्हावयास पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org