सह्याद्रीचे वारे - ११२

आपण लोकांमध्यें विश्वास निर्माण करण्याचें काम केलें पाहिजे असें मी म्हणालों. पण हें काम जेव्हां सरकार आणि अधिकारी यांच्या दृष्टिकोनांमध्यें एक प्रकारची एकात्मता निर्माण होईल तेव्हांच होऊं शकेल. येथें मला एका गोष्टीचा स्पष्टपणें खुलासा करावयाचा आहे. आपण जनतेचे सेवक आहोंत याचा खरा अर्थ आपण नीट समजावून घेतला पाहिजे. सरकारी अधिकारी जनतेचे सेवक आहेत हें खरें आहे. मात्र ते जनतेला जबाबदार नसून सरकारला जबाबदार आहेत, ही गोष्ट आपण स्पष्टपणें लक्षांत घेतली पाहिजे. या बाबतींत पुष्कळ वेळां गोंधळ होण्याचा संभव असतो, म्हणून मी हें आपल्याला सांगत आहें. आपण जनतेचे सेवक आहांत, आपल्याला जनतेची सेवा करावयाची आहे, जनतेशीं एकनिष्ठ राहून ती करावयाची आहे, ही गोष्ट खरी आहे. पण हें करीत असतांना, आपली जबाबदारी सरकारवर आहे हें आपण विसरतां कामा नये. आपल्याकडे असलेलें काम पुरें करण्याची जबाबदारी सरकारनें घेतलेली आहे. सरकारी अधिकारी हा आधीं जनतेला आणि नंतर सरकारला जबाबदार आहे, अशा चुकीच्या विचारांतून गुंतागुंत निर्माण होण्याचा आणि त्यामुळें जनतेच्या सेवेचा प्रश्न बाजूला पडून दुस-याच कांहीं आपत्ति कोसळण्याचा संभव असतो. म्हणून या दोन गोष्टींतील फरक आपण स्पष्टपणें समजावून घेतला पाहिजे. आपल्याला जनतेची जी सेवा करावयाची आहे, ती अधिकारावर असलेल्या सरकारच्या कार्यक्रमामार्फत करावयाची आहे. त्यानें जो कार्यक्रम, जें धोरण, जी पद्धति स्वीकारली असेल, त्याला अनुसरूनच आपल्याला आपलें काम पार पाडावयाचें आहे. कार्यक्रम पार पाडतांना जनसेवेच्या भावनेनें तो पार पाडला पाहिजे, हीच त्यांत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याचसाठी सरकारच्या धोरणाच्या बाबतींत तुमची संपूर्ण निष्ठा असावी, अशी मी अपेक्षा करीत आहें. मी आपणांकडून या सहकार्याची अपेक्षा करतों आहें. असें सहकार्य मागणें हें माझें काम आहे आणि तें देणें हें आपलें कर्तव्य आहें. परंतु यापेक्षांहि जास्त मोठी अपेक्षा मी आपणांकडून करतों आहें. आणि ती ही कीं, सरकार जें धोरण व जो कार्यक्रम स्वीकारील त्या कार्यक्रमाच्या बाबतींत आपल्याकडून साडेनव्याण्णव टक्के नव्हे तर शंभर टक्के निष्ठेची मी अपेक्षा करतों. कारण जो कार्यक्रम व जें धोरण सरकारनें स्वीकारलें असेल त्या धोरणाच्या बाबतींत आपल्या मनांत पाव टक्कासुद्धां शंका राहतां कामा नये. याचा अर्थ असा नव्हे कीं, आपलीं कांहीं वैयक्तिक मतें असू शकणार नाहींत. ज्याला वैयक्तिक मतें नाहींत तो माणूसच असूं शकणार नाहीं. परंतु सरकारी यंत्रणेमध्यें जेव्हां आपण जबाबदारी उचलतां तेव्हां आपलें स्वतःचें कांहींहि मत असलें, आपल्या स्वतःच्या कांहींहि भावना असल्या, तरी जें सरकारी धोरण असेल तें आपण निःपक्षपातीपणानें आणि शंभर टक्के निष्ठेंनें पार पाडलें पाहिजे, हीच आपली मनोभूमिका असली पाहिजे आणि अशाच निष्ठेची मी आपणांकडून अपेक्षा करतों.

आम्ही सारखे सांगत असतों कीं, राज्यकारभार कार्यक्षम पाहिजे. कार्यक्षम राज्यकारभाराच्या माझ्या कल्पना अगदीं साध्या आहेत. कार्यक्षम कारभार याचा अर्थ जें काम असेल तें आपण तांतडीनें केलें पाहिजे, प्रामाणिकपणानें केलें पाहिजे, आणि तें करून आपण लोकांचें समाधान केलें पाहिजे. माझ्या कल्पनेप्रमाणें कार्यक्षम राज्यकारभाराच्या ह्या तीन कसोट्या आहेत. विलंब कां लागतो याची आपण वारंवार तपासणी केली पाहिजे. परंतु या बाबतींत एकच एक असा नियम कोणालाहि घालून देतां येणार नाहीं. सरकारनें, विभागीय अधिका-यांनीं किंवा जिल्हाधिका-यांनीं आपल्या खात्यामध्यें कांहीं गोष्टींत थोडाफार बदल करून हा प्रश्न सुटणार नाहीं. विलंब टाळण्याचा एकच मार्ग आहे व तो म्हणजे आलेलें काम एका ठराविक मुदतींत पुरें केलेंच पाहिजे अशी आपण आपल्या मनाला संवय लावून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणें ती इतरांना लावली पाहिजे. एखाद्या प्रकरणासंबंधीं अधिक माहिती मागवावयाची नसेल तर प्रश्नच नाहीं. पण अधिक माहिती मागवावयाची असेल तर त्यामुळें विलंब होतो, असा आपला अनुभव आहे. तेव्हां माहिती मागविण्याच्या बाबतींत, सदरहू माहिती एका ठराविक काळांत आलीच पाहिजे असा आपण आपल्या मनाशीं निर्णय घेतला पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org