सह्याद्रीचे वारे - १११

आत्मटीकेच्या दृष्टीनें पाहतां, आतांपर्यंत दहा वर्षांचा काळ गेला असूनहि राज्यकारभारासंबंधानें लोकांचें समाधान झालें आहे असें मला वाटत नाहीं. तुमच्या माझ्या सभोंवतींचीं दहा माणसें चांगलें म्हणतात ही त्याची खरी कसोटी नाहीं. कारण राज्यकारभाराची परंपरा आपण ज्या परकीय सत्तेपासून घेतली आहे, त्या सत्तेच्या परंपरेमध्येंच असे कांहीं दोष आहेत आणि खुद्द सत्ता ही गोष्टच अशी आहे कीं, त्यामुळें आपल्या भोंवतीं नेहमीं खुषमस्क-यांचा वर्ग निर्माण होत असतो. आपण जें केलें तें बरें केलें, फार चांगलें केलें, छान केलें, असें सांगणारीं माणसें आपल्या आवतींभोंवतीं हिंडत असतात. याउलट लोकांच्या समाधानाची कसोटी लावून आपण पाहिलें तर आज राज्यकारभाराबाबत लोकांचें समाधान झालेलें नाहीं असेंच आपणांला आढळून येईल. तेव्हां ही जाणीव ठेवून आपण सर्वांनी पुढें गेलें पाहिजे. त्याकरितां काय करावयास पाहिजे याची निश्चित कल्पना आपणांस असणें जरुरीचें आहे. आणि या दृष्टीनें चार-पांच महत्त्वाच्या गोष्टी मी आज आपल्यापुढें मांडणार आहे.

पहिली महत्त्वाची गोष्ट अशी कीं, लोकांचे समाधान ही जर आपण कसोटी ठरविली तर लोकांना या बाबतींत स्वतःचें निश्चित मत व्यक्त करण्याइतका धीर आणि विश्वास वाटला पाहिजे. अधिका-यांचें चुकतें आहे, किंवा आपल्याला न्याय मिळत नाहीं हें निर्भिडपणें अधिका-यांना सांगण्याचें धैर्य लोकांच्या ठिकाणीं असलें पाहिजे. अशा प्रकारचा विश्वास व निर्भीडपणा आपण लोकांमध्यें निर्माण केला पाहिजे. ही जबाबदारी सरकारची म्हणजे सरकारी अधिका-यांची आहे. मी कांहीं तरी अमूर्त, अनिश्चित असें बोलतों आहें असे आपणांला वाटेल. पण वस्तुस्थिति तशी नाहीं. कालच घडलेली एक गोष्ट आपणांस उदाहरण म्हणून सांगतों, म्हणजे मी काय म्हणतों याची आपल्याला नीट कल्पना येईल. काल दुपारी आपल्या विभागांतील एका जिल्ह्यांतून मी जात होतों. केवळ उदाहरण म्हणून आपल्या विभागाचा मी उल्लेख करीत आहें इतकेंच. अशा गोष्टी इतर विभागांतहि घडत असतील. सांगावयाची गोष्ट म्हणजे मी जात असतांना एका गांवांतील लोकांनी, ''तहसिलीच्या कचेरीवर आम्ही जातो तेव्हां कचेरीच्या आंत आम्हांला बसूं देत नाहींत, आम्हांला हाकलून धक्के मारून बाहेर काढतात,'' अशी माझ्याजवळ तक्रार केली. ही तक्रार खरी कीं खोटी हें मला माहीत नाहीं. कदाचित् ती खोटीहि असेल. परंतु ही तक्रार यापूर्वी दुस-या कुणाजवळ करण्यांत आली नव्हती, हें माझ्या लक्षांत आलें. ही तक्रार त्यांनीं माझ्याजवळ येऊन केली हें एका अर्थानें चांगलें झालें. परंतु त्यांतील महत्त्वाची गोष्ट ही आहे कीं, लोकप्रतिनिधींजवळ आपण बोललें पाहिजे असा विश्वास आणि सरकारी अधिका-यांजवळ आपण बोलूं नये अशी भीति, अशी शंका अजून त्यांच्या मनांत आहे. अशा प्रकारची तक्रार वरिष्ठ सरकारी अधिका-यांजवळ करावी असा विश्वास, असा धीर अजूनहि लोकांच्या अंगीं कां येत नाहीं, याचा आपण विचार केला पाहिजे. अद्यापहि अशीच वस्तुस्थिति असेल, तर मला वाटतें, या बाबतीत आपण गंभीरपणानें विचार करणें अत्यंत जरुरीचें आहे.

आजच्या लोकशाहीच्या काळांत अजूनहि लोकांना कुणी धक्के मारीत असेल तर राज्यकारभाराच्या दृष्टीनें त्यापेक्षां अधिक तिरस्करणीय अशी दुसरी कुठली गोष्ट असूं शकेल असें मला वाटत नाहीं. मीं हें सर्व अशासाठीं सांगितलें कीं, ''मीं माझें काम चांगलें करीत आहें ना'' एवढाच विचार करण्याची जी वृत्ति आहे, ती आपण सोडून दिली पाहिजे. मी जर चांगलें काम करीत असेन तर त्याचा परिणाम माझ्या आवतींभोवतीं असणा-या लोकांवर कितपत होत आहे हें पाहण्याचें काम माझें आहे. जिल्हाधिकारी व तालुकाधिकारी यांनीं आपण जें चांगलें काम करतों त्याचा परिणाम आपल्या हाताखालीं काम करणा-या माणसांच्या वर्तनावर कसा होतो हेंहि पाहिलें पाहिजे. अधिकारी आपल्या कचेरीत बसल्यानंतर त्याला आपला पट्टेवाला बाहेर कसा वागतो हें कळणें अवघड असलें तरी तें पाहण्याचें काम या अधिका-यांचें आहे, असें आपण मानलें पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org