सह्याद्रीचे वारे - ११०

भारतामध्यें लोकशाहीचें राज्य येऊन दहा वर्षे झालीं. पण अजूनहि आपला राज्यकारभार ज्या आदर्श पद्धतीचा असावयास पाहिजे त्या पद्धतीचा किंवा त्या पद्धतींतील ज्या पातळीपर्यंत जाऊन पोहोंचावयास हवा त्या पातळीपर्यंत पोहोंचलेला नाहीं ही गोष्ट उघड आहे. आदर्श अशा पातळीवर राज्यकारभार नेण्याचें काम, ज्यांना सार्वजनिक सेवक म्हणतां येईल अशांनी करावयाचें आहे. सार्वजनिक सेवकांचे आम्ही जुन्या मुंबई राज्यांत दोन प्रकार मानीत होतों. अर्थात् ही कल्पना फक्त जुन्या मुंबई राज्यापुरतीच मर्यादित होती असें नाहीं, तर सबंध भारताच्या बाबतींतहि सार्वजनिक सेवकांचे हे दोन प्रकार करावे लागतील. प्रत्यक्ष सरकारी यंत्रणेमध्यें राहून काम करणारे आणि सरकारी यंत्रणेच्या बाहेर राहून काम करणारे असे हे सार्वजनिक सेवकांचे दोन प्रकार आहेत. सरकारी यंत्रणेमध्यें राहून काम करणारा सेवक त्या कामासंबंधीं एका विशिष्ट त-हेचें शिक्षण घेऊन काम करीत असतो. त्याला एक प्रकारची शिस्त घालून दिलेली असते आणि त्याच्यावर निश्चित अशी जबाबदारी टाकलेली असते. त्यासाठीं त्याला वेतन मिळत असतें. परंतु सरकारी यंत्रणेबाहेर काम करणारा सेवक सेवेची जबाबदारी आपल्या विचारानें पत्करीत असतो. तो वेतनानें बांधलेला नसतो, तर तो आपल्या विचारानें बांधलेला असतो. सार्वजनिक सेवकांच्या या दोन प्रकारांतील हा महत्त्वाचा फरक आहे. परंतु हा फरक असला तरी, शेवटीं दोघांच्या कामामध्यें एक साधर्म्य आहे. तें म्हणजे दोघांनाहि शेवटीं जनतेचीच सेवा करावयाची असते.

राज्यकारभार चांगला चालला आहे कीं नाहीं याची खरी कसोटी वरच्या अधिका-यानें तुमच्या कॉन्फिडेन्शियल शीटवर काय लिहिलें आहे ही नाहीं, किंवा बदली झाल्यानंतर लोकांनी सत्कार करून हार घातले, हीहि नाहीं. माझ्या मतें लोकांचें समाधान हीच चांगल्या राज्यकारभाराची खरी कसोटी आहे. कांहीं मंडळी असें म्हणतील कीं, ''असें म्हणून कसें चालेल ? मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीची साक्ष ठेवून सांगतों कीं मी माझें काम चांगल्या रीतीनें करीत आहें.'' एवढें झालें म्हणजे आपलें काम पुरें झालें, असें समजण्याची प्रवृत्ति मला अधिका-यांमध्यें आढळून येते. पण ही प्रवृत्ति योग्य नाहीं असें मला वाटतें.

लोकशाही राज्यकारभारामध्यें, मी चांगलें काम करतों, लोकांच्या उपयोगाचें काम करतों एवढी कसोटी अपुरी आहे. काम चांगलें तर केलेंच पाहिजे, पण काम चांगल्या प्रकारें झालें आहे याची लोकांना प्रचीति आली पाहिजे, लोकांना तें जाणवलें पाहिजे. म्हणूनच मी म्हणतों कीं राज्यकारभाराची खरी कसोटी, लोकांच्या समाधानांत आहे. सरकार चांगलें असून उपयोग नाहीं, तर सरकार चांगलें आहे, राज्यकारभार चांगला चालला आहे असें लोकांना वाटलें पाहिजें, जाणवलें पाहिजे. तरच तो सरकारी कारभार चांगला म्हणतां येईल. ही मूळ कसोटी आम्हीं आमच्या मनाशीं ठरविली आहे. आणि याच दृष्टीनें राज्यकारभार यशस्वी झाला कीं नाहीं, राज्याच्या अधिका-यांचें काम चांगलें झालें कीं नाहीं, याची कसोटी लागणार आहे. मला आणि तुम्हांला काय वाटतें, यापेक्षां सर्वसामान्य लोकांना राज्यकारभारासंबंधीं काय वाटतें, लोकांना त्यापासून कितपत समाधान मिळतें, ही खरी कसोटी आहे. आम्हीं हीच अंतिम कसोटी मानली पाहिजे. आणि याच कसोटीवर यापुढील राज्यकारभाराची परीक्षा पाहिली जाणार आहे.

वैयक्तिक जीवनामध्यें जशी आपण प्रगति करतो तशीच ती सार्वजनिक जीवनांतहि करावयाची असते. राज्यकारभारामध्यें सुधारणा व प्रगति करण्याचें ठरवून तुम्ही आणि मी जरी काम करणार असलों, तरी आत्मसंशोधनाची, आत्मटीकेची आपल्याला फार जरुरी आहे. राज्यकारभार चांगला करावयाचा असेल तर तो चांगला करण्याची सतत काळजी घेतली पाहिजे. एक क्षणभर जरी आपल्या मनांत अशी कल्पना आली कीं 'नाहीं, आतां बरें चाललें आहे', आणि ह्या विचारानें आपण बेसावध राहिलों, निष्क्रिय राहिलों, तर पुढच्याच क्षणापासून वाईट होण्याची प्रक्रिया सुरू होईल, ती सुरू होण्याची भीति उत्पन्न होईल. म्हणून आपल्याला सतत जागरूक राहण्याची फार आवश्यकता आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org