सह्याद्रीचे वारे - १०८

किती नांवें सांगूं? माझें मंत्रिमंडळ माझें मित्रमंडळ आहे अशा पद्धतीनें वागण्याचा मी प्रयत्न करतों आहें. माझे छोटे छोटे तरुण कार्यकर्ते त्यामध्यें आहेत. एकेकाळीं प्रत्येकाचा वेगवेगळा आग्रह होता. परंतु आज आम्हीं सगळ्यांनी एकमुखानें ठरविलें आहे कीं, आमची ही सर्व शक्ति मराठी जीवन संपन्न करण्याच्या कामीं आम्ही लावूं. कन्नमवारजींनीं बंधूसारखें माझ्यावर प्रेम केलें आहे. त्यांच्या आग्रहामुळें खरें म्हणजे मी या नागपूरच्या समारंभाला आलों. माझ्यापेक्षां वयानें ते मोठे आहेत. माझा हा अठ्ठेचाळिसावा वाढदिवस. पण कन्नमवारजींनीं साठ वर्षे केव्हां संपविलीं त्याचा मला पत्ता लागूं दिला नाहीं. आणि माझा अठ्ठेचाळिसावा वाढदिवस मात्र ते समारंभानें साजरा करतात. तेव्हां मीं त्यांना म्हटलें, ''भैय्या, अन्याय चालला आहे माझ्यावर हा !'' पण त्यांचे जें प्रेम आहे, त्या प्रेमाचाच मी फार भुकेला आहें. एक वेळ प्रामाणिकपणानें त्यांना वाटलें कीं विदर्भाकरितां खटपट करावी, पण आज त्यांना प्रामाणिकपणानें असें वाटतें कीं महाराष्ट्राचें राज्य चाललें पाहिजे. ती भूमिका घेऊन ते कामाला लागले आहेत. सामान्य माणसांतून जनतेची सेवा करीत आज ते सत्तेच्या पदापर्यंत पोहोंचले आहेत. ते कमी बोलतात, पण त्याचा गैरफायदा घेण्याचा कांहीं माणसांनी जर प्रयत्न केला तर तें गैर ठरेल. आपल्या या प्रेमाबद्दल आणि मैत्रीबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतों. माझे मित्र श्री. गांवडे यांचेहि मला आभार मानले पाहिजेत. त्यांनीं प्रत्येक गोष्टीमध्यें आग्रह धरून मला या समारंभाच्या संकटांत टाकलें. शेवटीं महाराष्ट्राचें बरें करावयाचें, जनतेचें बरें करावयाचें, भारताचें बरें करावयाचें हा एकच विचार आपल्या मनाशीं ठेवून प्रगतीची वाटचाल आपण चालू ठेवली पाहिजे.

जनतेच्या या एवढ्या मोठ्या प्रेमाच्या प्रसंगीं दूर गांवीं असणा-या माझ्या म्हाता-या आईची आज मला आठवण येते. आपल्या या सगळ्या प्रेमाला पोंचविण्याचें श्रेय माझ्या त्या अशिक्षित आईला आहे. आज दुनियेमध्यें काय चाललें आहें ह्याचें तिला फारसें ज्ञान नाहीं. मी तिचा धाकटा मुलगा आज मुख्यमंत्री आहें; पण मुख्यमंत्री म्हणजे काय हें आजहि तिला माहीत नाहीं. त्या माझ्या म्हाता-या आईची आज मला आठवण येत आहे. तिची पुण्याई, तिचा साधेपणा, तिचें प्रेम, तिनें शिकवलेले लहानपणचे चारदोन छोटे छोटे गुण हेच माझ्या जीवनामध्यें मला उपयोगी पडले आहेत. तिला नमस्कार करतों आणि माझें भाषण पुरें करतों.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org