सह्याद्रीचे वारे - १०७

केव्हां तरी या गोष्टीची दखल घ्यावीच लागेल. पण त्यामध्यें मला जनतेचें सहकार्य पाहिजे. केव्हां तरी लोक म्हणतील कीं हें सर्व एकदां बंद केलें पाहिजे. पण ज्यांना ज्यांना महत्त्वाच्या मूल्यांची आठवण आहे त्यांनीं असें म्हणतां कामा नये कीं, हे सर्व बाकीच्या लोकांनीं केलें आहे. अशा त-हेच्या मुत्सद्देगिरीनें राज्यकारभार चालवितां येणार नाहीं. असेल त्या त्या गोष्टीची जिम्मेदारी घेतली पाहिजे, जनतेचें पुढारीपण करावयाचें असेल तर जनतेच्या चुकांची जबाबदारी घेतली पाहिजे आणि चुकांतून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण इथें जी निंदा चाललेली आहे, इथें जी सभ्यतेची कोणतीच मर्यादा पाळली जात नाहीं, हें सर्व पाहिल्यावर अशा त-हेच्या प्रकारांतून जर नवी राज्यें निर्माण होणार असतील तर हिंदुस्तान पांच मिनिटें देखील टिकणार नाहीं ही गोष्ट मला आपणांला सांगितली पाहिजे. अशा त-हेच्या गोष्टी फार काळ चालणार नाहींत, असें या गोष्टी करणा-यांना मला साफ सांगितले पाहिजे. कुणाच्या कानांत कांहींतरी बोलून व दूषित वातावरण निर्माण करून राजकारण करण्याचे दिवस आतां संपलेले आहेत. बोलायचें असेल तर मैदानांत येऊन बोललें पाहिजे. मी मैदानांत तुम्हांला सांगतों आहें कीं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जी जिम्मेदारी मीं घेतली आहे ती महाराष्ट्र राज्य फोडण्याकरितां नसून महाराष्ट्र राज्य चालविण्याकरितां आणि टिकविण्याकरितां घेतली आहे. जनतेचा प्रतिनिधि म्हणून आत्मविश्वासानें मी हें बोलतों आहें. गंगेच्या ओघासारखें मराठी जनतेचें जीवन आतां एक झालेलें असून तो गंगेचा ओघ बंद पाडण्याची शक्ति आज कुणांतहि नाहीं. कारण तें जनतेचें जीवन आहे. कुणाच्या मेहेरबानीनें, कुणा चार व्यापा-यांच्या कृतीनें किंवा कुणाची तरी लहर आली म्हणून चाललेलें असें हे जीवन नाहीं. येथें कांही तरी नवीन सामर्थ्य निर्माण करण्याकरितां तें प्रयत्नशील आहे. हा गंगेचा ओघ, हें गंगेचें जीवन, पुढें पुढें जाईल. तें बंद करण्याची शक्ति अशा अपवित्र गोष्टींनीं निर्माण होऊं शकणार नाहीं. ज्यांची विरोधाची भावना असेल त्यांनीं जरूर विरोध करावा. पण मला लोकशाहीचीं मूल्यें सांभाळावयाचीं आहेत, आणि ती सांभाळलीं जावींत म्हणून या गोष्टी आपल्यापुढें मांडण्याकरतां आज मी येथें आलों आहें. छोट्या छोट्या गटबाजीला घाबरून किंवा निवडणुकीमध्यें काय घडणार आहे हें पाहून काम करणारा मी माणूस नाहीं. माझा मार्ग स्पष्ट आहे. मराठी भाषेचें राज्य यशस्वी करण्यासाठीं, मराठी माणसाच्या मनांत जो ज्ञानेश्वर आहे, जो रामदास आहे, जो तुकाराम आहे, आणि त्याच्या मनांत जी मराठी माउली आहे त्या सर्वांना जागें करण्याचा, माझ्या शरिरांत रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी प्रयत्न करीन. कुणाच्या हातांतला तराजू आणि कुणाची तिजोरी माझ्या या कामाच्या आड येईल अशी भीति बाळगून मी हें काम करीत नाहीं. हें सर्व करण्यामध्यें मला मराठ्यांचें राज्य निर्माण करावयाचें आहे असें चोरटें बोललें जातें. पण पुन्हा एकदां या नागपूरच्या भूमीवरून मी सांगतों कीं ज्या दिवशीं एका जमातीचें, निव्वळ एका गटाचें राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असें सिद्ध होईल, त्या दिवशीं महाराष्ट्रांतल्या जनतेसमोर स्वतःची जाहीर चौकशी करून जनता देईल ती शिक्षा मी पत्करीन. हें व्रत घेऊनच मीं या राज्याची जिम्मेदारी पत्करली आहे.

आपण मला येथें बोलाविलें आणि माझा सत्कार केला, माझें अभीष्टचिंतन केलें. आजच्या घटकेला, १९६१ च्या मार्च महिन्यामध्यें, जेव्हां तुम्ही माझा हा सत्कार करीत आहांत तेव्हां नवीन महाराष्ट्राचें जें राज्य चाललें आहे तें राज्य यशस्वी करण्याची जिम्मेदारी आपण घेतली आहे असाच त्याचा मी अर्थ करतों. ज्यांनीं ज्यांनीं या सत्काराला पाठिंबा दिला त्यांची ही जिम्मेदारी आहे. एका जिवाचीं, एका मनाचीं पन्नास माणसेंहि दुनियेचा इतिहास बदलूं शकतात, असा इतिहासाचा अर्थ माझ्या ध्यानामध्यें राहिलेला आहे. आणि म्हणून इतिहासानें आपल्यावर टाकलेली ही जिम्मेदारी आपण स्वीकारलेली आहे, हें स्पष्ट करण्याकरितां या गोष्टी आपल्यापुढे मांडण्याचा मीं प्रयत्न केला. मी साफ बोललों तें कुणाबद्दलच्या रागानें बोललों नाहीं. मला माझ्या सगळ्या मित्रांचा विश्वास आहे म्हणून मी बोललों. हे माझे सगळे मित्र माझे साथी आहेत. विदर्भांतले माझे मित्र कन्नमवारजी व आबासाहेब खेडकर माझे साथी आहेत आणि मराठवाड्यांतले श्री. भगवंतराव गाढे माझे साथी आहेत. त्याचप्रमाणें येथें माझे अनेक मित्र व साथी आहेत. मीं गेल्या चारपांच वर्षांत जर कांहीं मिळविलें असेल तर तें हें कीं मीं अनेक मित्र मिळवले. माझें मुख्यमंत्रीपद जाईल, पण माझी मैत्री जाणार नाहीं. भावासारखें प्रेम करणारे माझी साथी शेषराव वानखेडे आहेत, वसंतराव नाईक आहेत, काझी आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org