सह्याद्रीचे वारे - १०६

आज आपण माझें हें जे अभीष्टचिंतन करीत आहांत त्याचा अर्थ देशाच्या एकतेच्या आणि देशांतील लोकशाही व समाजवादी विचारांच्या अभीष्टचिंतनाची जिम्मेदारी आपण स्वीकारीत आहांत असें मी मानतों. कारण त्या विचारांचा मी पुजारी आहें. हीच माझी भूमिका आतांच्या महाराष्ट्रांतील राजकारणासंबंधीची आहे, आणि देशांतील राजकारणासंबंधींचीहि आहे. आपल्या या सगळ्या आशीवार्दांची मला जी शक्ति मिळेल, मला जें सामर्थ्य मिळेल, ती सारी शक्ति आणि तें सारें सामर्थ्य या तीन शक्तींच्या पुजेसाठीं मी वापरीन. कारण या तिन्ही शक्तींची पूजा शेवटीं मानवतेच्या सेवेसाठीं करावयाची आहे अशी माझी विचारपरंपरा आहे. मी गांधीजींच्याकडून जें कांही शिकलों, महाराष्ट्रांतल्या संतांच्याकडून आणि शिवाजीपासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत निर्माण झालेल्या अनेक परंपरांतून मी जें कांही शिकलों, मानवेंद्रनाथ रॉय यांच्यासारख्या बुद्धिमान विचारवंताच्या विचारांशी संबंध आल्यामुळें थोडेंफार शिकण्याचा मीं जो प्रयत्न केला आणि इतिहासाचा विद्यार्थी म्हणून इतिहासाचा मला जो अर्थ समजला, त्या सर्वांतून माझी ही निष्ठा मानवतेच्या कल्याणाची आहे. आणि म्हणून ती मी कधीं हलूं देणार नाहीं. तुम्ही आम्ही सगळे महाराष्ट्रांत जोंपर्यंत काम करीत आहोंत, तोंपर्यंत मला हें सर्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या ज्या सगळ्या प्रेरणा आहेत, ही जी सगळीं सामर्थ्ये व ध्येयें आहेत त्यांची पूजा करण्याचें तत्त्व आम्हीं अंगिकारलें आहे. म्हणून महाराष्ट्रांत आपण अशी परिस्थिति निर्माण केली पाहिजे कीं त्यायोगें या तत्त्वांची आणि या प्रेरणांची एक जबरदस्त शक्ति आपण महाराष्ट्रामध्यें निर्माण करूं शकूं. ही गोष्ट जर आम्ही करूं शकलों तर आम्हांला हिंदुस्तानची सेवा बरोबर, चांगल्या त-हेनें करतां येईल. आणि हिंदुस्तानहि मानवतेच्या सेवेचें हें काम अधिक बलिष्ठ भावनेनें करूं शकेल. मी या तत्त्वाचा उपासक म्हणून हें काम करतों आहें. थोडेंफार यश सुदैवानें मिळालें असलें तरी या यशानें आपण भाळून जातां कामा नये. कारण, पुष्कळ वेळां अपयशहि पदरांत येतें. पण त्या अपयशाच्या वेळींहि आपण मन ढळूं देतां कामा नये. आपल्या आशीर्वादानें मला जी शक्ति मिळेल त्या शक्तीचा वापर मी जनसेवेसाठींच करीन, असें परत एकदां मी आपणांला माझ्यातर्फे वचन देतों.

या नागपूर शहराचें वातावरण बदलण्याच्या बाबतींत मला आज आपल्याशीं बोललें पाहिजे. कारण ''मला त्याचें काय ?'', ''काय होईल तें बघत राहावें'', या भावनेच्या बाहेर आपणांला एकदां केव्हां तरी आलें पाहिजे. आज येथें जी दंगलशाहीची वृत्ति दिसते तिच्यासंबंधीं मी आपणांला सांगूं इच्छितों कीं, ही वृत्ति वाढल्यानंतर अशी एक परिस्थिति निर्माण होते कीं, दंगलशाही नको म्हणणा-या माणसांना देखील ती आवरतां येत नाहीं. म्हणून ही वृत्ति थांबविली पाहिजे, कुणीं तरी ती थांबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण येथें एक मोठें उच्च स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहांत, पण या त-हेच्या गोष्टी वाढल्यानें आपणांस तें निर्माण करतां येणार नाहीं. टिळक लढले, गांधीजी लढले आणि जवाहरलालजी आज झगडून राहिले आहेत ते सर्व यासाठींच का लढले आणि झगडले? आपले आग्रह असतील, आपली मतें असतील, तर ती मांडण्याचा आपण जरूर प्रयत्न करा. पण सार्वजनिक जीवनाची कांहीं पातळी राखण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. माझ्यावर टीका झाली म्हणून मी हें सांगत नाहीं. गोष्ट ही आहे कीं महत्त्वाच्या मूल्यांची आपण जपणूक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण ज्यांना सांगावयाचें त्यांना सांगून मी कंटाळलों. त्यांना सांगण्याचा कांहीं उपयोग नाहीं. मी आतां अगदीं सामान्य माणसांना सांगणार आहें कीं या त-हेची वृत्ति जर आपण वाढूं दिलीत तर सभ्यपणानें तुमच्या मोहल्ल्यामध्यें राहणें, जगणें तुम्हांला अशक्य होणार आहे. आपण केव्हां तरी बाहेर येऊन या गोष्टीचा निषेध करण्याची प्रवृत्ति निर्माण केली पाहिजे. आपल्या मोहल्ल्यामध्यें आपणांला एखाद्या तत्त्वाची घोषणा करावयाची असेल तर आपण जरूर ती घोषणा करा. पण व्यक्तिगत निंदा आणि खोटा व घाणेरडा प्रचार यासारखे दंगलशाहीचे जे प्रकार येथें चालू आहेत त्यांनीं विदर्भ मिळणार नाहीं, ही गोष्ट मला साफ सांगितली पाहिजे. या त-हेच्या दबावांनी, या त-हेच्या भाषणांनीं या गोष्टी घडवितां येणार नाहींत. आपण जरूर लोकांचें मतपरिवर्तन करा, महाराष्ट्राचें मन वळवा, हिंदुस्तानचें मन वळवा आणि हिंदुस्तानच्या नकाशाचें आणखी पन्नास तुकडे आपणांला करावयाचे असतील तर ते करा. पण ज्या त-हेची दंगलशाही या नागपूर शहरामध्यें चालू आहे ती चालूं देण्याकरितां महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद मीं स्वीकारलें नाहीं, हें मला सांगितलें पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org