सह्याद्रीचे वारे - १०५

मी या प्रेरणेचा सेवक आहें. ही प्रेरणा पार पाडण्यासाठीं तुमचें माझें जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रांत आपल्यावर कोणत्या जबाबदा-या येतात याचा आपण विचार करूं या. माझ्या कल्पनेप्रमाणें या प्रेरणेंतून येणारी आमच्या देशाची पहिली जबाबदारी आज ही आहे कीं आम्हांला आमचा देश एक ठेवतां आला पाहिजे. फुटीर वृत्ति हें आज या देशावर येऊं पाहणारें महान संकट आहे, पहिलें महान संकट आहे. बाहेरची संकटें तर आहेतच. कुठें उत्तरेला कुणाच्या मनांत पाप आहे, तर कुठें शेजा-यापाजा-यांच्या मनांत पाप आहे. पण या पापांची मला भीति वाटत नाहीं. जोंपर्यंत आमच्या मनगटामध्यें आणि आमच्या मनामध्यें सामर्थ्य आहे, तोपर्यंत इतरांच्या पापांची मला भीति वाटत नाहीं. तुमचें माझें मन जर एकजिनसी झालें असेल, तुमच्या माझ्या मनामध्यें जर कांहीं सद्भावना असतील, तुमचें माझें मनगट जर एका सामर्थ्याने बांधलें गेलें असेल तर मग आपल्याला कशाचीहि भीति नाहीं. पण आज छोट्या छोट्या घोषणांनीं छोट्या छोट्या आग्रहाला बळी पडून, मोठीं मोठीं माणसें चुकीच्या मार्गानें जातात कीं काय याची चिंता वाटावयास लागते. येथल्या स्थानिक परिस्थितीला उद्देशून मी हें बोलत नाहीं. येथील स्थानिक परिस्थिति हा एक त्यांतला अगदीं छोटा, दुर्लक्ष करण्यासारखा भाग आहे. थोडीशी गडबड आज नागपूर शहरामध्यें कांहीं लोकांनी करण्याचा प्रयत्न केला तर त्याबद्दल मी चिंता करीत नाहीं. परंतु आज आमच्या देशामध्यें निराळे प्रश्न निर्माण झाले आहेत. आज देशामध्यें वेगवेगळ्या त-हेचे वाद वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. भाषांचे आग्रह, प्रदेशांचे आग्रह, जमातीजमातींचे आग्रह, हिंदु-मुसलमानांत वाद वाढविण्याच्या त-हा, या सर्व प्रकारांनी जी एक परिस्थिति निर्माण होत आहे, तिच्यांतून हा देश एकजिनसी कसा राहील यासाठीं प्रयत्न करणें हें तुमचें आमचें पहिलें काम आहे. अलिकडेच मीं एका लेखकाचें पुस्तक वाचलें. त्यांत त्यानें सांगितलेली एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. ती गोष्ट अशी कीं, स्वांतत्र्यप्राप्तीनंतरची पहिलीं दहा-बारा वर्षे आम्ही आमच्या देशाची बांधणी करण्याच्या कामामध्यें होतों; त्यामध्यें आम्हांला थोडेंफार यश येत गेलें; पण आतां आमच्या देशांतील यापुढचीं दहा-पंधरा वर्षे हीं अत्यंत कठीण अशीं वर्षे आहेत. त्याचबरोबर कांहीं व्यक्तींच्या मनामध्येंहि महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्या आहेत. त्यांना असें वाटतें कीं आपणांला जातीचें वजन वापरतां येईल, भाषेचें वजन वापरतां येईल, आणि सत्तेचं गाठोडें पाठीशीं मारतां येईल. या सगळ्यांतून ह्या देशाला आपण वांचविलें पाहिजे, आणि त्याला एकत्र ठेवून प्रगतीच्या दिशेकडे नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. असा हा कठीण काळ देशाच्या पुढें उभा आहे. आणि या कठीण काळामध्यें या देशाची जिम्मेदारी पाहण्याचें काम तुम्हां आम्हां सर्वांच्यावर आहे. तुमच्या आमच्या जिम्मेदा-या आतां तुम्हीं आम्हीं ओळखल्या पाहिजेत. हें सर्व पाहावयाचा प्रयत्न करणें हीच आपली पहिली जबाबदारी आहे.

आणि हें करीत असतांना आम्हांला आमच्या देशामध्यें लोकशाही दृढमूल करावयाची आहे. ही आमची दुसरी महत्त्वाची जबाबदारी आहे. मी हिंदुस्तानच्या आवतीभोवतीं पाहावयाचा प्रयत्न करतों, तेव्हां मला असा एकहि देश दिसत नाहीं कीं ज्यामध्यें सत्ता मुळींच गडगडलेली नाहीं. खालीं सिलोनपासून, ब्रह्मदेशापासून मजल मारीत मारीत तुम्ही ईजिप्तपर्यंत जा. प्रत्येक देशामध्यें गेल्या दहा-बारा वर्षांत दोन दोन क्रांत्या होऊन गेल्याचें तुम्हांला आढळून येईल. आठ दिवस, पंधरा दिवस, महिना, दोन महिने असे पंतप्रधान राहिले आहेत. कांहीं तर वा-यावर उडालेल्या पतंगासारखे कुठल्या कुठें वाहत गेले आहेत. कॉमनवेल्थचा मी गेल्या बारा-पंधरा वर्षांचा इतिहास पाहिला. पण या सर्वांत एकच पंतप्रधान कायम आहे आणि तो म्हणजे हिंदुस्तानचे पंडित जवाहरलाल. हिंदुस्तानची नीति, हिंदुस्तानचा आवाज, हिंदुस्तानची भाषा यासाठीं स्थान निर्माण व्हावें म्हणून गेली पंधरा वर्षें त्यांनी सतत काम केलें आहे. आणि हें काम एकमुखानें आणि तें सुद्धां लोकशाहीच्या मुखानें चालविण्याचा त्यांनीं प्रयत्न केला आहे. याचा तुम्हांला आम्हांला अभिमान वाटला पाहिजे; आणि हेंच काम आमच्या देशामध्यें कायम करण्याचा आम्हीं प्रयत्न केला पाहिजे. दुनियेमध्यें, निदान या आशिया खंडातल्या देशांमध्यें, लोकशाहीची ही जी हवा वाढते आहे ती तशीच वाढत राहावी म्हणून आम्हीं प्रयत्न केला पाहिजे. तसें करतांना सामान्य माणसाच्या हातून कदाचित् चुका होतील. पण त्या चुका सांभाळून घेऊन त्या चुकांतून नवी शक्ति निर्माण करण्याचें लोकशाहीचें जें सामर्थ्य आमच्या हातांत आलें आहे, त्या सामर्थ्यांची वाढ करण्याचा आम्हीं प्रयत्न केला पाहिजे. या लोकशाहीचें आणि तिच्याबरोबर येणा-या लोकशाही मूल्यांचें आम्हांला आमच्या देशामध्यें रक्षण करावयाचें आहे. पण लोकशाहींत जागृत झालेल्या माणसाला त्याचें सामाजिक स्थान आणि त्याचें आर्थिक उत्थान करण्याची संधि आम्हीं दिली नाहीं तर ती लोकशाही आपणांस सांभाळतां येणार नाहीं. म्हणून लोकशाहीच्या या विचाराची आणि त्याच्या हाताशीं हात धरून चालणा-या समाजवादाच्या विचाराची चिंता या देशामध्यें तुम्हीं-आम्हीं आज वाहिली पाहिजे. त्यामुळेंच या देशांतील जनतेचें अखेर कल्याण साधणार आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org