सह्याद्रीचे वारे - १०३

माझी जीवननिष्ठा

आपल्या या सत्काराबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहें. हा सत्कार करून आपण माझ्या संबंधानें ज्या सद्भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल आपले आभार मानण्यासाठीं मी उभा राहिलों आहें. या सगळ्या समारंभाच्या पाठीमागची आपली जी भावना आहे ती मैत्रीची भावना आहे, जिव्हाळ्याची भावना आहे. आपली ही भावना केवळ कांहीं एका व्यक्तीसंबंधींची भावना नाहीं असें मी समजतों. माझ्यासारखा कार्यकर्ता मीं स्वीकारलेल्या जबाबदा-या जेव्हां अंगावर घेतो, तेव्हां त्या जबाबदा-या आमच्या कांहीं प्रेरणा आहेत त्या दृष्टीनें, आणि सेवक म्हणून, त्या स्वीकारीत असतो. आणि म्हणून आज या निमित्तानें आपण माझ्यासंबंधीं ज्या सद्भावना व्यक्त केल्या त्या सद्भावना त्या प्रेरणांसंबंधींच्या सद्भावना आहेत असाच मी त्याचा अर्थ मानतों. व्यक्तिपूजेचा मी विरोधी होतों आणि म्हणून गेल्या वर्षी माझे बंधुवत् स्नेही श्री. वसंतराव पाटील यांनीं सांगली येथें माझा असाच सत्कार केला त्या वेळीं या वैयक्तिक सत्कारामध्यें यापुढें मी फसूं इच्छीत नाहीं असें मी म्हणालों. परंतु शेवटीं माझ्या नागपूरच्या मित्रांच्या प्रेमामध्यें परत फसलों. असें जरी असलें तरी यासंबंधींचें माझें पूर्वीचें जाहीर केलेलें मत मी बदललेलें नाहीं. पण माझ्या मताप्रमाणें सुद्धां, मी आतां प्रेमामुळें फसून चूक करतों आहें एवढाच त्याचा खरा अर्थ आहे.

आज येथें मुर्दाबाद म्हणणारीं जीं कांहीं माणसें आहेत त्यांना आपण गडबड न करतां परवानगी द्या. कारण, अगदीं न्यायाचा तराजू हातांत धरून आज मी माझें स्वतःचे वजन करून घेणार आहें. झिंदाबादचेंहि मी वजन करणार आहें आणि मुर्दाबादचेंहि वजन करणार आहें. शेवटी जें माझ्या पदरांत राहील तेवढेंच माझें म्हणून शिल्लक राहणार आहे. लोकांनीं कांहीं हार घातले म्हणून मी फार बिघडून गेलेलों नाहीं, किंवा कोणी मुर्दाबाद म्हटल्यानें बिघडून जाणार नाहीं. मुर्दाबाद म्हणणा-यांना माझे धन्यवाद आहेत. कारण मुर्दाबाद म्हणणाराहि माझी आठवण करतो असाच त्याचा खरा अर्थ आहे. या मुर्दाबादच्या घोषणेंतून मी फार वेळा गेलों आहें. आगींतून जाण्याची मला संवय आहे. मुर्दाबाद म्हणणारे जितके जास्त मुर्दाबाद म्हणतात तितका माझा जास्त विजय होतो, असा आतांपर्यंचा माझा अनुभव आहे. पण आज मला कुणासंबंधीं राग नाहीं. तुम्ही खूप माणसें प्रेमानें जमलांत. आतां चार गोष्टी मला तुम्हांला सांगितल्या पाहिजेत.

नागपूर महापालिकेनें या पटवर्धन मैदानावर जें बहुउद्देशीय क्रीडांगण सुरू करण्याचें ठरविलें आहे त्याबद्दल मला दोन शब्द सांगितले पाहिजेत. या मैदानावर हें जें क्रीडांगण होत आहे ती खरोखरी फार चांगली अशी गोष्ट आहे. नागपूर हें एक अत्यंत महत्त्वाचे शहर असून गेलीं दीडदोनशें वर्षे राजधानी म्हणून ते वावरत आलेलें आहे. म्हणून नागपूर शहराचा अभिमान असणा-या माणसांना मला आग्रहानें सांगावयाचें आहे कीं नागपूर शहराचें जें महत्त्व आहे तें वाढावें म्हणून गेलीं चार वर्षे आम्ही ख-या अर्थानें प्रयत्न करीत आहोंत. राजधानीच्या शहराचें जें एक स्वरूप असतें तें निव्वळ कांहीं तेथें गव्हर्नर राहतो आणि मंत्रिमंडळ राहतें आणि बंगल्यांवर खेटे घालणा-या लोकांची जरा जास्त सोय होते या गोष्टींमुळे त्या शहाराला प्राप्त होतें असें आपणांस म्हणतां येणार नाहीं. राजधानीचें खरें स्वरूप हें आहे कीं तेथल्या प्रत्येक माणसाला आपण कुठल्या तरी राजधानीमध्यें राहतों आहोंत असें वाटलें पाहिजे. जेथें विद्येचीं साधनें भरपूर आहेत, खेळांचीं साधनें भरपूर आहेत, जीवनाचीं नित्यनैमित्तिक साधनें विपुल आहेत, उत्तम रस्ते आहेत, उत्तम बागा आहेत असें तें शहर असलें पाहिजे. तेव्हां हें नागपूर शहर, एक प्रकारची 'मॉडर्न सिटी' ज्याला म्हणता येईल असें एक आधुनिक शहर बनावें अशा त-हेचा प्रयत्न आम्ही करीत आहोंत. आणि मला अभिमानानें सांगावयाचें आहे कीं नागपूर आतां नुसती राजधानी नसून महाराष्ट्राची एक राजधानीहि तें आतां बनतें आहे. म्हणून नागपूर शहराच्या वाढींत आम्हांला अत्यंत जिव्हाळ्यानें पाहावयाचें आहे. आणि म्हणून इथें होणारें हें मैदान हिंदुस्तानांतील चांगल्या मैदानांपैकीं एक व्हावें अशी माझी इच्छा आहे. मला अतिशय आनंद वाटतो कीं माझ्या हस्तें या मैदानाचें उद्घाटन झालें. त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतों.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org