सह्याद्रीचे वारे - १०२

तुमच्या अडचणी काय आहेत, तुमच्या मागण्या काय आहेत त्या मला सांगा, त्याकरितां आपण माझ्याकडे या. आपलीं गा-हाणीं मीं काळजीपूर्वक कान देऊन ऐकलीं पाहिजेत. छोटे रागद्वेष, हेवेदावे यामुळें समाजाचें सारें जीवनच विस्कळित होईल. तो मार्ग माझा नव्हे. आपल्या विकासासाठीं राज्य जे प्रयत्न करीत आहे, त्याच्या मागें आपण उभे राहा. आपण अशी साथ दिलीत तरच आपल्याला प्रगतीच्या दिशेनें जातां येईल. हें कांहीं एकदोन माणसांचें काम नाहीं. मी एकटाहि हें काम करू शकणार नाहीं. याला व्यक्तींचे नेतृत्व कमी पडतें. आणि व्यक्तिमत्त्व हवें असेल तर त्याकरितां गांधीजी, नेहरू यांच्यासारखीं असामान्य माणसें लागतात.

मी जें नेतृत्व म्हणतों त्याचा अर्थ आपण नीट समजावून घ्या. नव्या नेतृत्वाकरिता निश्चित कार्यक्रम असावा लागतो, कार्याची दृष्टि असावी लागते. आणि त्याचबरोबर समाज समतेच्या तत्त्वावर चालण्याकरितां, कार्याला वाहून घेणा-या शीलवान शूर वीरांची आवश्यकता असते. महाराष्ट्र राज्याचीं जीं स्वप्नें आहेत, त्यांच्या पूर्तीसाठीं मी आपणां सर्वांना हांक देत आहें. महाबळेश्वर शिबिरानें जनहिताचा जो कार्यक्रम स्पष्ट केला आहे त्याच मार्गानें आपणांस जावयाचें आहे. कारण जी गोष्ट जनतेची असते तीच समृद्ध होते व तीच टिकते असा माझा आग्रह आहे आणि यांतच सर्वांचे हित आहे.

आपण सर्वांनी महाराष्ट्र राज्याच्या मागें उभें राहिलें पाहिजे, त्याच्यामागें आपली शक्ति उभी केली पाहिजे. राज्य ही कांहीं कोणाच्या उपभोगाची वस्तु नाहीं. जनतेचा कार्यक्रम अंमलांत आणण्याचें तें एक प्रभावी साधन आहे. त्या दृष्टीनें त्याचा आम्ही पूर्ण उपयोग करूंच. महाराष्ट्र राज्यापुढें त्याचे असे कांहीं विशिष्ट आदर्श आहेत. म्हणून आपल्या सेवेनें आणि आपल्या प्रेमानें आपण या नव्या राज्याचें सार्थक केलें पाहिजे. आज ही एकच भावना, हा एकच आदर्श घेऊन मी आपल्यासमोर आलों आहें. कांहीं मूलभूत मूल्यें मीं आज आपल्यासमोर मांडलीं आहेत. महाराष्ट्र राज्यासंबंधींचें माझें हें स्वप्न साकार करण्याकरितां आपण मला आपलें सहकार्य द्या, हीच नागपूरच्या जनतेला माझी हांक आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org