सह्याद्रीचे वारे - १

एका अर्थांने हीं त्यांची प्रातिनिधिक भाषणें आहेत असें म्हणतां येईल. लोकशाही आणि राष्ट्रीय एकता यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उत्कर्षाचे विचार त्यांनीं या भाषणांतून मांडलेले आहेत. त्यांच्या मतें, महाराष्ट्राचें भावनात्मक ऐक्य व त्याचा आर्थिक विकास यांवरच महाराष्ट्राचें भवितव्य अवलंबून असून तें घडवून आणण्याचें महाराष्ट्र राज्य हें फार मोठें साधन आपणांस प्राप्त झाले आहे. आर्थिक विकास हा त्यांच्या विचारांचा मुख्य गाभा असून महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या अनेक दिशा त्यांनी या भाषणांतून दाखविल्या आहेत. तसेंच महाराष्ट्राच्या सध्यांच्या विशिष्ट परिस्थितींत त्यांच्या दृष्टीनें शिक्षणाला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असून सहकार हा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा त्यांनीं पाया मानला आहे. इतिहासाची त्यांना लाभलेली दृष्टि, प्रश्नाच्या अंतरंगांत शिरून त्याचें मूळ शोधणारी त्यांची तत्त्वचिंतक वृत्ति आणि लोकशाही, समाजवाद आणि मानवता या मूलभूत मूल्यांवर असलेला त्यांचा अढळ विश्वास यांचें दर्शन पदोपदीं या भाषणांतून वाचकांना होईल.

त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचेंहि दर्शन वाचकांना त्यांतून घडेल. त्यांच्या विचारांचे, भावनांचे व प्रेरणांचे स्वच्छ प्रतिबिंब या भाषणांत पडलेलें असून महाराष्ट्राच्या आणि अंतिम दृष्टीनें भारताच्या उत्कर्षाशीं हे विचार, या भावना व या प्रेरणा एकरूप झाल्या आहेत व हें तादात्म्य हीच त्यांच्या जीवनाची सर्वांत मोठी प्रेरणा आहे.

महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या संदर्भांतील त्यांचीं भाषणें 'नवे राज्य' या भागांत समाविष्ट करण्यांत आलीं आहेत. या भाषणांत नव्यानें अस्तित्वांत येणा-या महाराष्ट्र राज्यांतील विशिष्ट परिस्थिती, त्याच्यापुढें असलेल्या महत्त्वाच्या समस्या आणि त्याची प्रेरकशक्ति यांवर भर देण्यांत आला आहे. नव्या महाराष्ट्राच्या आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाच्या दिशा दाखविणारीं त्यांनी जीं भाषणें केलीं आहेत, त्यांचा समावेश 'नवी क्षितिजें' या भागांत मुख्यत्वेंकरून करण्यांत आला आहे. साधन आणि साध्य यांमधील ही विभाजक रेषा पुसट असली तरी त्यामुळें नव्या महाराष्ट्राचें चित्र अधिक स्पष्टपणें वाचकांपुढें उभें राहण्यास मदत होईल.

विशेष आभार : सौ.वेणूताई चव्हाण प्रतिष्ठान, कराड

मुंबई
२६ जानेवारी १९६२

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org