थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (3)

सुसंस्कृत नागरिक व सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आशेचा किरण दाखवणारा “आदर्श” शोधावा लागेल. असा आदर्श शोधताना मला आपल्याच राज्यांत समाजाच्या उन्नतीकरिता सतत निस्वार्थीपणे कार्यरत राहीलेल्या, संस्कृती, विकास, राजनिष्ठा यात आपल्या कार्यातून आदर्श निर्माण करणा-या अनेक सतपुरुषांपैकी, देशावर-महाराष्ट्रावर जिवापाड प्रेम करणा-या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यपध्दतीचा आदर्श प्रभावी वाटतो. देशासाठी कष्ट घेताना महाराष्ट्राला विसरले नाहीत व महाराष्ट्राचा विचार करताना देशाला विसरले नाहीत असे हे प्रभावी व्यक्तीमत्व राज्याचा व देशाचा विकास साधताना पदोपदी विकासाच्या दिशा स्पष्ट करुन गेले आहे.

महाराष्ट्राच्या निर्मितीच्या पूर्व संधेला स्व. यशवंतरावजीनी नवमहाराष्ट्राच्या आपल्या कल्पना मांडल्या व त्यामुळेच त्यांना आपण नवमहाराष्ट्राचे शिल्पकार मानतो. महाराष्ट्राचा विकास करताना देशविकासाकडे दुर्लक्ष होवू नये अशी दक्षता घेण्याचे महत्व त्यांनीच आपल्यांत रुजवले. कर्तृत्वाला अल्पसा अवधी लाभलेले स्व. मारोतराव कन्नमवार यांच्या रुपाने एक धडधडीचा सहकारी यशवंतरावजीना लाभला. निश्चित केलेला महाराष्ट्राचा आराखडा अमलांत आणण्याकरिता कामावर श्रध्दा ठेवणारे हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या सारखे स्वामीनिष्ट सहकारी यशवंतरावजींना लाभले. स्व. वसंतदादा सारखे सहकार शक्तीद्वारे महाराष्ट्राचा विकास साधणारे लोकसंग्रहाचे उत्तम प्रशासक सहकारी यशवंतरावजींना लाभले. महाराष्ट्राच्या अस्मीतेचा खानदानी मराठमोळेपणा जतन करणारे लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई हे सहकारी यशवंतरावजींना लाभले. सामान्यांचे जिवन सुसह्य करण्याचा शोध घेणारे स्व. वि. स. पागे हे सहकारी यशवंतरावजींना लाभले. बेरजेचे राजकारण हा शब्द यशवंतरावांचा. पण ही बेरीज कोणाची होती ? सर्व क्षेत्रातील व सर्व पक्षातील पारखलेल्या गुणीजनांची ही बेरीज होती. वेगवेगळ्या गटाचे त्यांच्या आप्तजनांना सत्तेत घेवून केलेली ही संधीसाधूंची बेरीज नव्हती. गुणवंताला जवळ ओढून आपुलकी देणे हा यशवंतरावांचा गुण होता. यशवंतराव तळमळीच्या आणि कळकळीच्या विरोधी नेत्यांना सांगत की, “तुम्ही आता नुसते विचार का मांडता ? सत्तेत सहभागी व्हा आणि तुमचे विचार अमलांत आणा. यशवंतरावांचे बेरजेचे राजकारण म्हणजे मात्तब्बर गुणी नेत्यांची बेरीज होती. या नेत्यांना यशवंतरावजींनी घडविलेही. यशवंतरावांचे मन मोठे होते. गुणांची पुजा ही त्यांची कार्यपध्दती होती. दान करावे गुप्तपणे. घरी आलेल्याचा सत्कार करावा. कुणाचे भले केले तरी उच्चार करायचा नाही. उपकाराची वाच्यता करायची नाही. संपत्तीचा अहंकार नाही आणि दुस-याचे अपयश किंवा अपकीर्ती याचा उल्लेख करायचा नाही. हा यशवंतरावजींचा स्वभाव होता. श्रवण करुन मनन करावे, मनन करुन चिंतन करावे आणि चिंतनाचे आचरण करावे ही यशवंतरावजींची कार्यपध्दती होती. जातीधर्माचा विचार करताना सर्वच धर्मपुरस्कर्त्यांनी सहिष्णुता, मानवता आणि समता याचा समाजजिवनाकरिता केलेला उपदेश मान्य करावा असा यशवंतरावजींचा आग्रह होता. म्हणूनच त्यांनी जातीच्या नावाखाली उच्च-निच भेद मानला नाही. याकरिता समाजांत समतेचा मंत्र रुजवण्याचा यशवंतरावजींनी अखंड प्रयत्न केला. तुमचे राज्य मराठा की मराठी ? असा प्रश्न केला असता “हे राज्य मराठी आहे” या तात्काळ उत्तराने त्यांच्या मनातील समता स्पष्ट केली. नेतृत्वाची दुसरी फळी उभी करा अशी त्यांना कोणी विनवणी केली नव्हती. यशवंतरावजीनी प्रोत्साहन देवून, मार्गदर्शन करुन अनेक कार्यकुशल समाजसेवकांची फळी उभी केली आहे. आज अशा नेत्यांचे मार्गदर्शन व त्यांनी चालवलेला राज्याचा कारभार हा यशवंतरावांच्या दूरदृष्टीचा ठेवा आहे. “समाजवादाचा” पाळणा प्रथम महाराष्ट्रांत हलेल” ही मावळत्या सुर्याला साक्ष ठेवून, प्रतिज्ञा करुन यशवंतरावांनी अंधारांत खितपत पडलेल्या बहुजन समाजाला प्रकाश दिला. यशवंतरावजीना सत्तेचा लोभ नव्हता. त्यांना सत्ता हवी होती विकास साकार करण्यासाठी. तळागाळातील सामान्यांच्या उध्दारासाठी. यशवंतराव म्हणजे महाराष्ट्राची मुर्तीमंत संस्कृती होती. तत्वाशी अजीबात तडजोड न करताही नेमस्त पण यशस्वी राजकारण कसे करता येते, याचा यशवंतरावजींची कारकिर्द हा आदर्श वस्तूपाठ होता. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री, उपपंतप्रधान होते. त्यांच्या मागे उत्तमोत्तम पुस्तके आहेत. ही पुस्तके सगळ्यांना उपलब्ध व्हावीत अशी सोयही त्यांनी करुन ठेवली आहे. म्हणून आज स्व. यशवंतरावांनी आपल्या कार्यकाळांत राबवलेल्या समाजाभिमुख कार्य पध्दतीचा प्रस्तापीतांकडे आग्रह धरणे गरजेचे आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org