मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ९०

८९.  मी पाहिलेला महापुरुष – भु. आ. कुलकर्णी

द्विभाषिकाचे मुख्यमंत्री झाल्याबरोबर एक महिन्याच्या आत साहेब जालन्यास व औरंगाबादेस फिरतीवर आले. माझ्या स्वत:च्या नावागावाबद्दल वैयक्तिक विचारपूस करून झाल्यावर लगेच म्हणाले की, उद्याला माझ्यासाठी एक काम करा. मराठवाडयाचा भूगोल मला समजून सांगा. दुस-या दिवशी औरंगाबादेस आल्यावर अर्धा तास समोर नकाशा ठेवून विचारीत राहिले. भूगोलाबरोबर इतिहासाचीही उजळणी सहजच झाली. मराठवाड्याच्या विकासाची आखणी मनोमनी करीत असावेत असे त्यांच्या प्रश्नावरून तेव्हा वाटत राहिले.

याच मुक्कामात सर्व खात्यांच्या अधिका-यांची बैठक त्यांनी मार्गदर्शन करावे म्हणून टाऊनहॉलमध्ये बोलावली होती. वाक्यावाक्यातून प्रशासनावर त्यांची पकड मजबूत आहे असे प्रतीत होत असे. प्रशासनासंबंधी नव्यात नवी पुस्तके त्यांच्या वाचनात आल्याचेही दिसून येई. भाषणाच्या ओघात दोन तीन बीजतत्त्वे त्यांनी सांगितली होती. त्यांचा आमच्यापैकी अनेकांच्या मनावर कायम परिणाम होऊन गेला. ‘हे करू का ते करू’ असा जेव्हा केव्हा तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल तेव्हा तेव्हा तुम्ही fundamentals च्या मूल तत्त्वांचा व त्यासाठी स्वत:च्या भूमिकेचा विचार कारावा म्हणजे संभ्रम नाहीसा होऊन तुमचे कर्तव्य तुम्हाला स्पष्ट दिसायला लागेल असे त्यांनी तेथे सांगितले. अधिका-यांच्या व राजकीय कार्यकर्त्याच्या भूमिकांसंबंधी या बैठकीतच ते म्हणाले की त्यांना सारखे असे वाटते की, राजकीय कार्यकर्त्यानी आजच्यापेक्षा अधिक नाही म्हणायला शिकले पाहिजे आणि अधिका-यांनी आजच्यापेक्षा अधिक हो म्हणायला शिकले पाहिजे.

एका मुक्कामात साहेबांनी जेवायला आमच्या घरी येण्याचे कबूल केले. चारपाच मंत्री व वीसपंचवीस इतर लोक जेवायला होते. खूप उशीरापर्यंत बोलणी वगैरे झाल्यावर परत जाण्यासाठी गाडीत बसलेले उतरून पाय-या चढून वर आले व तुमच्या पत्नीचे आभार न मानताच मी असा कसा परत निघालो होतो असे म्हणत त्यांचे आभार मानून गेले! अशी केवढी जीवाची धावपळ त्यांची सतत होत असे पण शिष्टाचार न सोडण्याची व लोकसंग्रह वाढवत राहण्याची त्यांची जिद्दही तशीच मोठी होती.

साहेबांच्या वागणुकीत व्यक्तिगत जिव्हाळा अनेकांना लाभला. जमेल तेव्हा ते अधिका-यांची किंवा कार्यकर्त्याची वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवर विचारपूस करायचे. त्या वेळी पोलिस अधीक्षक असलेले आमचे मित्र श्री. त्रिंबकराव पातूरकर एकदा जिन्यावरून पडले. हातास प्रॅक्चर झाल्यामुळे ती आठवड्यांची रजा घेतली. ती मान्यतेसाठी साहेबांकडे गेली असावी. पुढे दोन महिन्यांनी त्यांची भेट झाली तेव्हा आठवणीने ‘‘तुमचा हात दाखवा पूर्ण बरा झाला आहे ना?’’ असे विचारीत राहिले.

१९५७ च्या निवडणुकीत हिंगोलीहून आमचे मित्र नारायणराव गोरेगावकर निवडून आले. निवडणुकीच्या धामधुमीचे जमत नाही. कारण पोटाचा विकार आहे असे ते सहज साहेबांकडे बोलले होते. स्वत: नारायणराव ते बोलणे विसरलेही असावेत पण साहेब मात्र विसरले नव्हते. विधानसभेच्या बैठकीच्या पहिल्याच दिवशी साहेबांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्या तपासणीची सोय केली होती आणि त्यांना तेथे घेऊन जाण्यासाठी श्री. डोंग-यांना पाठविले होते ! त्या ऑपरेशनचा व शुश्रूषेचा खर्च पण आमदारांना साहेबांनी पडू दिला नाही ! अशा गोष्टी ऐकल्या की, साहजिकच अशा थोर अन् प्रेमळ नेत्यावरून जीव ओवाळून टाकावा असे ऐकणा-यांना वाटायचे.

१९५७ सालची सार्वत्रिक निवडणूक जवळ होती व प्रचारासाठी पंडितजींच्या विराट सभा जालन्यास व औरंगाबादेस झाल्या होत्या. पंडितजींबरोबर लेडी माउंट ब्याटनही आल्या होत्या. सर्वजण कैलास लेणी बघत असता साहेबांनी मला बोलावून सुचविले की, त्यांना जरा बरे नसल्याने ते औरंगाबादेस जरा आधी परतू इच्छिताहेत अशी त्यांच्यासाठी पंडितजींची परवानगी मी घ्यावी. पंडितजींनी हो म्हटलेच पण मलाही डॉक्टर वगैरे बोलावण्यासाठी त्यांच्याबरोबर जा म्हणून सांगितले. त्या परतीच्या प्रवासात गाडीत साहेबांनी जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या कार्याबद्दल अनेक प्रश्न विचारले व मी दिलेली निर्भीड उत्तरे त्यांनाही आवडली असावीत असे मला त्या वेळी तरी वाटले होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org