मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ७०

६९. शिवथडीचे साहेब – धों. म. मोहिते

साहेब आमच्या शिवधडीचे. देवराष्ट्रचे. त्यांचे माझे जन्मगाव देवराष्ट्रेच. साहेबांना आमचे वडील सुपरिचित होते. वडिलांचेबाबत ते मनापासून आदर बाळगून होते. शिवाय दुसरे म्हणजे त्याच्या थोडे अगोदर आमच्या शेजारच्या चिंचणी (अंबक) येथील सुप्रसिद्ध खुनी दरोडेखोर पि-या मांग याच्यावर मी ‘‘किर्लोस्कर’’च्या दिवाळी अंकात ‘‘मी माणसात कसा आलो?’’ हा लेख लिहिला होता. तो चव्हाण साहेबांचे वाचनात आला असून त्यांना तो खूपच आवडला असल्याचे एका कार्यकर्ताने मला सांगितले होते. तेव्हा येणेप्रमाणे धागा पकडून व साहेबांना निमंत्रित करायचे असे ठरवून एकदा मी कराड गाठले.

‘‘तुम्हीच का ते धों.म.मोहिते?’’ माझी भेट होताच साहेब म्हणाले, छान लिहिलात पि-या मांगावर लेख. मी वाचलाय. जबरदस्त लेखणी आहे तुमची. लिहा...खूप लिहा...’’ त्यांच्या या मनमोकळ्या बोलण्याने मला खूपच धीर चढला. मी येण्याचे कारण सांगितले आणि माझ्या मूळ स्वभावधर्माला अनुसरून एकदम बोलून गेलो, ‘‘तुमच्या या दौ-यात नेमकं आमचंच तेवढं गाव तुमच्या टग्यांनी वगळलं बघा.’’ ‘‘टगे’’ हा शब्द ऐकून साहेब खळखळून हसले. ‘‘ठीक आहे. दौरा सकाळी नऊला कडेगावपासून सुरू होतोय. त्या आधी तासभर लवकर सकाळी आठलाच तुमच्या गावात मी हजर आहे.’’ आणि मिस्किलपणे हसत ते पुढे म्हणाले, ‘‘मग तर हे ‘‘टगे’’ आडवे येणार नाहीत ना?’’

कोणत्याही काँग्रेसवाल्या गावाला न जाता साहेब केवळ आपल्याच भागात खास भेट देताहेत म्हटल्यावर गावक-यांच्या उत्साहाला उधाण आले. आमच्या गावापासून अंबकपर्यंत ‘जीपबल’ रस्ता ताबडतोब करण्यात आला.

मुकुंदरावांनी तर आदल्याच दिवशी किर्लोस्करवाडीहून आचा-यासकट चहाफराळाचे साहित्य, कपबश्या, डिशेश, बैठकीसाठी गाद्या, तक्के असे सामान बैलगाडीतून पाठवून दिले. ते स्वत: कार्यक्रमाचे दिवशी सकाळी लवकर सात-आठ मैलांचे अंतर तोडून सायकलवरून गावात दाखल झाले. प्रांतसाहेब, फौजदारसाहेब हेही बैलगाडी, सायकलने, गावात पोचले.

ठरल्याप्रमाणे सकाळी ठीक आठ वाजता चव्हाण साहेब श्रमदानाचे ठिकाणी हजर झाले. बँड तुतारीच्या निनादात आणि हातातील टिकाव, फावडे उंचावून गावक-यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. साहेबांनी नव्या सडकेवर थोडा फेरफटका मारला. तेथेच रस्त्याच्या कडेला आमराईच्या गर्द छायेत खुर्च्या टेबले मांडून मोकळ्या रानातच आम्ही सभेची आखणी केली होती. ही कल्पना साहेबांना फार आवडली. सभेला बायकामुलांसह उभा गाव लोटला होता.

सभेत साहेब बोलायला उठल्यावर प्रथम त्यांनी या कामाबद्दल आम्हा कार्यकर्त्याची आणि गावक-यांची पाठ थोपटली आणि म्हणाले, ‘‘आमचे कार्यकर्ते काय करू शकतात, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही सडक होय. कशाला इंजिनियरची वाट बघायची? होईल थोडी वाकडी तिडकी सडक. म्हणून काय बिघडणार आहे?’’ आणि त्यांनी कार्यकर्ते, गावकरी आणि स्वत:चा गावाचा विकास यावर सुमारे अर्धा तास व्याख्यान दिले. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचा दोष दाखविणे कटाक्षाने टाळले. चुकूनसुद्धा त्यांनी हे शब्द भाषणात येऊ दिले नाहीत. आम्ही आणि आमचे गाव ‘‘कसले’’ आहोत हे त्यांना पक्के ठाऊक होते.

आमच्या गावची साहेबांची ही भेट मला स्वत:ला माझ्या यापुढील सार्वजनिक कार्यात फार मोठी मार्गदर्शक आणि मोलाची ठरून गेली. सार्वजनिक कार्य आणि साहित्याचे क्षेत्र यात त्यांचा माझा सूर चांगलाच जुळला. सार्वजनिक कार्यासाठी त्यांच्या बंगल्याचा आणि कार्यालयाचा दरवाजा माझ्यासाठी सदैव खुला होता. एखादं काम घेऊन मी मुंबईला गेलोय नि साहेबांचे भेटीसाठी दोन-तीन दिवस थांबून राहिलोय किंवा साहेब मुंबईत असूनही त्यांची भेट न होता हात हलवीत परत आलोय, असे कधी म्हणजे कधीच घडले नाही. पी.ए.मंडळी माझी आणि साहेबांची भेट लगेच घालून देत. साहेबांनी त्यांना माझ्यापुरत्या तशा सूचना देऊन ठेवल्या होत्या. मी त्यांच्याकडे माझे स्वत:चे कसलेही काम घेऊन कधीही गेलो नाही. जायचे ते सार्वजनिक काम घेऊनच. लहान, मोठे, क्लिष्ट कसलेही काम असो साहेबांना ते पटले की लगेच त्या कामाला गती मिळे आणि ते काम झटक्यात होऊन जाई. आम्ही आमच्या गावाचा सर्वांगीण विकास केला त्या प्रत्येक गोष्टीला साहेबांचेपर्यंत पोहचवून आम्हाला ते काम करून घ्यावे लागले आहे. मी ती गोष्ट म्हणजे गावाला एस.टी. सुरू करण्यासारखी मामुली बाब असो अगर हायस्कूल वा दवाखान्यासारखे महत्त्वाचे काम असो, साहेब आमच्या पाठीशी उभे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org