मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ६१

६१.  चौफेर दृष्टीचा नेता – चित्रकार ग. ना. जाधव

पंडित जवाहरलाल नेहरूंनी महाराष्ट्राचा पोलादी पुरूष, राजकारणपटू मुत्सद्दी मा. यशवंतराव चव्हाण यांची संरक्षण मंत्री म्हणून नेमणूक केली. त्या निमित्ताने महाराष्ट्रात सगळीकडे सत्कार सभा चालू होत्या. त्याच सुमारास महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक प्रा. ना. सी. फडके यांच्या घरी साहित्यिकांच्या गप्पागोष्टी ऐकण्यात मी रमून गेलो होतो. त्या गप्पांचा विषय होता:

‘‘ना. यशवंतराव चव्हाण.’’ नागपूरच्या जवळपासच्याच गावी एका कारखान्याची रौप्य महोत्सवी सभा भरली होती. त्या सभेचे अध्यक्ष म्हणून नामदार यशवंतराव चव्हाण आले होते. त्या सभेत मोठमोठ्या साहित्यिकांची भाषणे झाली. ती साहित्याची खैरातच होती. शेवटी अध्यक्षीय भाषणास यशवंतराव बोलायला उभे राहिले. सर्वांना वाटले, एवढे मोठमोठे साहित्यिक बोलले तेव्हा यशवंतराव काय बोलणार? या काहीशा भ्रमात प्रेक्षक असतानाच यशवंतराव वेगवेगळे मुद्दे घेऊन बोलू लागले आणि त्या कारखान्याची शास्त्रीय माहिती जी सर्वसामान्यांनाही ठाऊक नव्हती ती आपल्या भाषणात करून दिली. तेव्हा प्रेक्षकांनी आणि साहित्यिकांनी टाळ्या पिटल्या. सर्व लोक यशवंतरावांचे भाषण ऐकून मंत्रमुग्ध झाले होते. अशा त-हेने ती साहित्यिकांची सभा यशवंतरावांनी जिंकली होती. या मागील रहस्य कोणते असावे? तर यशवंतराव कुठेही प्रवासात निघाले की, त्यांच्याबरोबर त्यांची अशी एका गाडीत पुस्तकांची लायब्ररी असायची. बाजारात एखादे चांगले पुस्तक आले की, ते लगेच विकत घेऊन आपल्या लायब्ररीत ठेवीत असत. अशा त्या दिवशी फडके माडखोलकर यांच्या गप्पागोष्टी ऐकत असताना त्या झंझावाती ४२ च्या आंदोलनातील रोमांचकारी घटना आणि त्यांचे राजकारण डोळ्यापुढे साकार होत होत्या. तेव्हा मनात एक गोष्ट येऊन गेली की, यशवंतरावांनी नुसत्या साहित्याचीच सेवा केली असती, तर त्यांनी ज्ञानपीठ पारितोषिक नक्की मिळविले असते.

४२ च्या आंदोलनातील हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन १७ ऑगस्ट १९५७ ला ना. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते व्हावयाचे होते. त्यासाठी मला श्री. शंकरराव किर्लोस्कर यांनी दोन पोट्रेट्स करायला सांगितली होती. ती पूर्ण करून, त्या स्तंभाच्या पायथ्याशी ती दोन पोट्रेट्स ठेवली होती. किर्लोस्कर कारखान्यातील अगदी तरूण इंजिनियरची जोडी, म्हणजे तुमचे आमचे सर्वांचेच मित्र हुतात्मा पंड्या व पेंढारकर होते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी तरूण रक्त सळसळत होते. अनेक क्रांत्या झाल्या. त्यात तालुक्याच्या ठिकाणी मामलेदार कचेरीवर झेंडे लावणे, राज्यसत्ता खिळखिळी करणे, वगैरे कार्यक्रम आखले होते. आम्हा तरूणांची घालमेल चालू होती. एक मोर्चा इस्लामपूरला व दुसरा तासगावला ठरला होता. तासगावला जाणा-या मोर्चात सेवादल मित्रांच्या बरोबर मीही जाणार होतो. परंतु आदल्या दिवशी मला थोडा ताप आल्याने, जाता आले नाही. दुस-या दिवशी एक दु:खद वार्ता किर्लोस्करवाडीत आली, की इस्लामपूरच्या मोर्चात आमचे मित्र पंड्या यांना गोळी लागून खलास झाले. आम्हा सर्वांची अंत:करणे फाटून गेली. कारण याच हुतात्म्याला पहिलाच मुलगा झाला होता. म्हणून तो सांगलीला पेढे आणायला जाणार होता. पण हे कसे काय झाले? म्हणून सर्वांची मने गोठून गेली होती. अतिशय गोड स्वभावाचा माणूस, सदा हसतमुख, सर्व खेळांची आवड असणारा हा पंड्या हुतात्मा झाला. दुसरे श्री. पेंढारकर. मा. यशवंतरावांचे मित्र, तेही किर्लोस्करवाडीत इंजिनियर होते. ते हीलव्हूवर (ब्रह्मचारी आश्रमात) राहात होते. त्यांच्याकडे यशवंतराव वरचेवर येत असत. तेथे क्रांतीतील रात्र रात्र खलबते चालत असत. ती सफूर्ती घेऊन श्री. पेंढारकरांनी शेणोली ते रहिमतपूर स्टेशनच्या दरम्यान खजिना— रेल्वे पगाराचा डबा लुटला. त्यातच ते सापडले गेले आणि त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. तुरूंगात त्यांचे फार हाल केले. त्यातच त्यांचा अंत झाला. तेव्हा अशा या दोन क्रांतीत कामी आलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकाची सभा जमली होती. सर्वजण दु:खी अंत:करणाने बसले होते. ठरल्या वेळी यशवंतराव आले. समारंभ सुरू होण्यापूर्वी यशवंतरावांनी या थोर हुतात्म्यांच्या चित्रांना पुष्पहार घातले. पेंटिंग्ज पाहून ‘‘कुणी केलीत चित्रे?’’ म्हणून शंकरराव किर्लोस्करांना त्यांनी विचारले.तेव्हा शंकररावांनी या आमच्या चित्रकार ग. ना. जाधवनी केलीत म्हणून माझा परिचय करून दिला. ‘‘जाधव, छान केलीत चित्रे.’’ म्हणून माझ्या पाठीवर हात ठेवला. पण पुढे मात्र त्यांना बोलवेना. .. ते स्टेजवर जाऊन बसले. इतके ते हळवे होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org