मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४५

४५. काबिल आदमी – कविवर्य ग. दि. माडगूळकर

विटे, कराड, कृष्णाकोयनासंगम, सातारा, सांगली, कुंडल यांपैकी कशाचाही काही कारणाने संदर्भ आला की, मला हटकून यशवंतरावांची आठवण होते. आम्ही दोघे एका परिसरात जन्मलो, एका परिसरात वाढलो, हेच कदाचित त्यांच्या माझ्यातील अकृत्रिम स्नेहाचे प्रथम कारण असेल.

यशवंतराव वयाने माझ्यापेक्षा वडील आहेत. बालपणात त्यांच्या माझ्या भेटीचा योग आला नाही. यशवंतरावांचे शिक्षण कोल्हापूरला झाले. ते ग्रॅज्युएट होऊन पुढच्या शिक्षणासाठी पुण्याकडे गेले, आणि नंतर मी कोल्हापुरात आलो. तिथेही ओळखदेख झाली नाही.

बेचाळीस सालचा लढा सुरू झाला आणि ‘‘यशवंतायना’’चा अध्याय सुरू झाला. मी कोल्हापुरातच होतो. माझ्या दोन खोल्यांच्या टाचक्या बि-हाडात साता-याकडचे भूमिगत कार्यकर्ते हमखास आस-यासाठी जमत. त्यांच्या तोंडून मी यशवंतरावांविषयी ऐकले. खूप ऐकले.

शाहीर निकम हा चळवळ्या मुलगा आम्हा दोघांतला स्नेह दुवा. एका रात्री त्याने मला यशवंतरावांनी रचलेली एक राष्ट्रीय ‘कव्वाली’ साभिनय म्हणून दाखवली. तिचे शब्द आता मुळीच आठवत नाहीत. मुखड्याची ओळ तेवढी स्मरणात आहे..

‘‘पर्वा न आम्हाला कैदखान्याची..’’

त्या तीन-चार वर्षांत मी कितीदा निकमला म्हटले असेल, निक्क्या, लेका आमची एकदा ओळख तरी करून दे तुझ्या या यशवंतरावांशी?’’

निकम हज्जारदा ‘‘हो’’ म्हणाला, पण माझ्या आणि यशवंतरावांच्या भेटीचा योग आला नाही तो नाहीच. ऐन धरपकडीच्या दिवसांत मी निकमच्या लग्नासाठी कुंडलला गेलो. प्रतिसरकारचे सारे वैभव पाहिले. नाना पाटलांना उराउरी भेटलो. पण यशवंतराव दृष्टीसदेखील पडले नाहीत. स्वातंत्र्य मिळाले. लढा संपला. भूमिगत प्रकट झाले. मंतरलेले दिवस संपून गेले. मी पोटाच्या उद्योगाला लागलो. खादीच्या कपड्यापुरतीही देशभक्तीची खूण अंगावर राहिली नाही. यशवंतराव राज्यकर्ते होण्याच्या रस्त्याने निघाले.

पोटासाठी भटकता-भटकता मी पुण्याला आलो. सुरूवातीला पंताच्या गोटात राहात होतो. एके दिवशी तिथे अचानकपणे एक असामी उपटला. दलसंघटक राघुअण्णा लिमये भारी रसाळ माणूस. ते मसूरचे. यशवंतरावांचे दोस्त.

‘‘आमचा यशवंता’’ या विषयावर त्यांनी मला किती ऐकवले असेल?... निकम नुसती मधाची बोटे चाटवीत होता. राघुअण्णांनी मधाचे द्रोणच्या द्रोण पाजले. त्या घडीपर्यंतचे यशवंतरावांचे चरित्र मला पूर्ण ज्ञात झाले.

गावात दोन आकण्याचे घर आणि रानात दोन बिघे शेती ही छोट्या यशवंतरावांच्या घरची आर्थिक स्थिती. वडील विट्याला बेलिफ होते. यशवंतराव नकळते आहेत तोवरच ते हे जग सोडून चालते झाले. आई खंबीर. एका विटकरीवर अठ्ठावीस युगे उभी राहील अशी. तिचे नावच विठाबाई. थोरले दोन भाऊ. दोघांनी तिस-याला शहाणा करायचा विडा उचलला. यशवंतराव जात्या बुद्धिमान, अभ्यासू. ते बी.ए.झाले. एलएल.बी. झाले; यशस्वी वकील ठरले. पण त्यांचे मन मात्र वकिलीत रमले नाही. त्यांनी राजकारणात उडी घेतली. देश स्वतंत्र झाला पाहिजे, यासाठी ते निकडीचे प्रयत्न करू लागले. शिणेचे सौंगडी त्यांच्या भोवती जमा झाले.

बेचाळीसच्या युद्धात साता-याने अजब उठाव केला. त्या लढ्याच्या वेळी यशवंतराव आपोआपच आघाडीवर आले.

त्यांचा तो लढा स्वयंभू होता. त्यांचे नेतृत्वही तसेच ‘‘स्वयंभू’’ स्वरूपाचे उत्पन्न झाले.

राघुअण्णा त्या सर्व सातारकरांबरोबर वावरलेले होते. त्यांना उत्तम कथनशैली अवगत होती. ‘‘चले जाव’’ चळवळीतले अनेक प्रसंग त्यांनी माझ्या डोळ्यासमोर उभे केले. त्यातल्या अनेक प्रसंगांचे नायक होते श्री. यशवंतराव चव्हाण.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org