मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४४

४४.  भावासारखे यशवंतराव – आनंदीबाई शिर्के

१९२४ साल होते की १९२५ आठवत नाही. ऋतू हिवाळा होता की उन्हाळा होता तोही आठवत नाही. पावसाळा मात्र नव्हता. जिकडे तिकडे नवी पालवी फुटलेली दिसे. सुंदर फुले वा-याने डोलून सुवास पसरवीत होती. सारे कसे आल्हाददायक छान दिसे. अशा सुंदरस्थळी सातारला अजिंक्यतारा डोंगराच्या पायथ्याशी आम्ही नुकतेच राहायला आलो होतो. यांची बदली साता-यास झाली होती. आठ दिवस साता-यास मुक्काम व ऑफिसात काम व आठ दिवस फिरती असे त्या नोकरीचे स्वरूप होते. शेजारपाजार होता. भोसलेबाई नामक एक वृद्धा विचारपूस करी. कामात मदत करी. घर मोठे होते. दोन मुलांसह मला रहावे लागत असे. बाजारहाट सारे दूर. मला जाणे शक्य नव्हते. मला जाणे शक्य नव्हते. मुलांना ठेवून जाणार कशी? घरात सारे भरपूर भरलेले होते. खेड्यातून एक दूधवाली दूध घालून जाई. एक बाई आंबे आणून देई. एक आण्याला आठ आंबे. शेवग्याच्या झाडावर शेंगा, फुले, पाने असत. त्यांची भाजी करता येई. शिवाय मूठभर मेथी हातभर जागेत पेरली तर तीन दिवसांनी दोन पानी भाजी मिळे. मुलांना तर भाजी नकोच, पण मलाही फारशी गरज लागत नसे. असे आमचे सुरळीत चाले. एके दिवशी हे ऑफिसात गेले असता एक गृहस्थ येईन म्हणाले, ‘‘दोन भाकरी व चटणीचा गोळा तयार ठेवा. एक माणूस येईल त्याला द्या.’’

‘‘म्हणजे जेवायला कोणी येणार आहे.’’

‘‘नाही, भूमिगतासाठी भाकरी व चटणी द्यावी लागते. आज तुमची पाळी.’’ कोण येणार त्याचे नाव विचारून ठेवले. हे दुपारी आल्यावर त्यांना सांगितले. त्यांना काही बरे वाईट वाटले नाही. म्हणाले, ‘‘माणूस आल्यावर चटणी भाकरी द्या. चटणी जरा अधिक द्या. माणसाचं नाव काय?’

‘‘लवंगामिरे, असं कायसं सांगितलं?’’
‘‘लवंगामिरे नाही लवंगरे असेल.’’
‘‘असेल, असेच काही गांवोगावी नवं नाव.’’
‘‘हो, खानदेशात नाही का, दगडू, धोंडू, कचरू, शेणफडू अशी नावं ठेवतात. पुढे हा शेणफडू हुद्देदार झाला तर त्याची त्यालाच लाज वाटते. आईबापांना तो दोष देतो.

‘‘बरं पण मला सांगा, हा भूमिगत कोण? त्याचं आपलं नातं काय? त्याला भाकरी का द्यायच्या? भूमिगत म्हणजे दरोडेखोर ना? वाटसरूला लुबाडतात, मारहाण करून त्यांचा पैसाअडका घेतात ते?’’

‘‘छे, छे! असं नाही. हे लोक शिकलेले असतात. ते गरिबांच्या हक्कासाठी सरकारशी तक्रार करतात. मागासलेल्या लोकांना माणसासारखं वागवा असं सांगतात. अधिका-यांना ते आवडत नाही, म्हणून हे भूमिगत.’’

मला फारशी वर्तमानपत्रे वाचायला मिळत नव्हती. एके दिवशी एक हातात पडले. त्यात एका शिकलेल्या पुरूषाचे नाव दिसले. ते नाव यशवंतरावांचे होते. मला नवल वाटले, ‘‘घरचा सुखी माणूस, त्याला काय ही दुर्बुद्धी आठवली भूमिगत होण्याची, आणि गरिबासाठी त्रास सोसण्याची?’’

मी यांना म्हटले, ‘‘ यशवंतराव भूमिगत आहेत, भूमिगत कसे असतात ते मला पाहायचं आहे.’’

एके दिवशी यांनी मला सांगितलं, ‘‘चव्हाण तुम्हाला भेटू इच्छितात.’’

मी संमती दिली. एका ओढ्याच्या काठी ही भेट झाली. आणि काय आश्चर्य? हेच ते जेवून गेलेले गृहस्थ! अंगावर जुने आणि खादीचे कपडे. खांद्यावर कांबळे. मुद्रा हसरी. त्यांनी नमस्कार केला. कुशल पुसले. आश्चर्य म्हणजे ते गृहस्थ माझ्या गोष्टींची नावे घेऊन आपली आवडनिवड सांगू लागले! ‘बांडगूळ,’ ‘‘बांगड्यावर बहिष्कार’’ इतकेच नव्हे तर माझी एक जुनी गोष्ट ‘‘अमृता मोकिंदा’’ ही विद्यार्थ्यांना का आवडत असे हेही सांगितले. चटणी भाकरी खाऊन भूमिगत राहून हे गृहस्थ गोष्टीही वाचताता! माझ्या गोष्टी इथपर्यंत पोचल्या याचे मला बरे वाटले की संकोच? मी आभार मानले की गप्प राहिले? मला सांगता येणार नाही? मला सांगता येणार नाही. पण मनाचा गोंधळ उडाला होता. हीच यशवंतरावांची व माझी पहिली भेट.

त्यानंतर काही काळ लोटला. यशवंतराव आता मोकळेपणी वावरत होते. मोठ्या हुद्द्यावर होते. त्यांचे लग्न झाले. वेणूताई कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या. यशवंतराव सुखी होते. सभा संमेलनाचे अध्यक्ष होत होते. वसंतदादा त्यांचे परमस्नेही त्यांना ते फार मानीत.

माझे जावई दिलीपसिंह घाटे मध्यप्रदेशात डी.आय.जी. होते. पुणे मुक्कामी ते अचानक वारले. तेव्हा यशवंतराव चव्हाण भावासारखे धावून आले. त्यावेळी त्यांचा पहिला प्रश्न होता,‘‘आनंदीबाई कुठे आहेत?’’...

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org