मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ३८

३८. प्रेमळ साहेब – टी. एस. शृंगारे

एखादा कार्यकर्ता त्यांच्या सान्निध्यात येऊन गेला की, तो कदापिही साहेबांपासून दूर जाऊ शकत नसे, हे त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे लक्षण आहे. कार्यकर्त्याच्या जीवनातील सुखदु:ख व त्यापाठीमागच्या प्रेरणा, यातना, वेदना समजावून घेतल्या की, संघटनेतील कार्यकर्त्यामध्ये स्नेहाचे जाळे ते विणीत असत. असे अनेक कार्यकर्ते खालपासून वरपर्यंत त्यांनी निर्माण केले. काही विश्वासाची माणसे सांभाळली आणि त्यासाठी असंख्यांच्या मनाची विचारांची जपणूक केली.

राजकारणात कोणतीही गोष्ट सरळ आणि सहजरीत्या करता येत नसते. कार्यकर्ते हे पक्षांचे भांडवल असते, म्हणून परस्परात कसलाही वैचारिक दुरावा न होईल याची त्यांनी काळजी घेतली. त्याचाच परिणाम महाराष्ट्रात असंख्य कार्यकर्त्याचे मोहोळ ग्रामीण आणि शहरी विभागात निर्माण झाले. काँग्रेस संघटनेची बांधणी यशस्वीरीत्या होऊ लागली.

चव्हाण साहेबांच्या बालमनावर ब-यावाईट अनुभवांचे संस्कार झालेले आहेत. पण त्यांची आई ख-या अर्थाने प्रेरणा देणारी होती. अशा परिस्थितीतून जो मनुष्य जातो तोच ख-या अर्थाने देशाची सेवा करू शकतो. विद्यार्थिदशेत असतानाच अवांतर पुस्तके वाचण्याची व त्यावर विचारमंथन करण्याची सवय त्यांना होती. त्यामुळे त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले आहेत.
त्याशिवाय त्या देशातील समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे, टिळक, फुले, आंबेडकर इत्यादींच्या विचारांचा यशवंतरावांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. त्यांच्याकडून त्यांना सतत स्फूर्ती व प्रेरणा मिळालेली आहे. त्या अनुरोधानेच त्यांच्या मनाची बांधणी झालेली आहे. प्रत्यक्ष राजकारणात उतरल्यानंतर सामाजिक, आर्थिक व राजकीय समतेचा मनात विसर पडू न देता ते साध्य करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात धोरणात्मक बदल केले.

चव्हाण साहेबांनी सर्व जाति-जमातींच्या कार्यकर्त्याच्या गुणवत्तेचा विचार करून, मानाच्या व सत्तेच्या जागी नेमणुका करून, सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया सुरू केली, या प्रक्रियेत उपेक्षित व पिढ्यान् पिढ्या दुर्लक्षित समाजाला विशेष प्राधान्य दिले व त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढविली.

शिवाय दलित, बौद्ध, आदिवासी व भटक्या विमुक्त जातिजमातींना शैक्षणिक, आर्थिक व सरकारी नोकरीसंबंधी विशेष सवलती उपलब्ध करून देऊन कायदेशीर तरतुदीही करून दिल्या.

चव्हाण साहेबांनी अंगीकारलेले कोणतेही कार्य असो ते निश्चयाने व संयमाने त्यांनी पुढे नेले आहे. अन्यायापुढे कधी त्यांनी मान तुकविली नाही. राजकीय ब-यावाईट प्रसंगांना संयमाने तोंड दिले. त्यांचे राजकीय जीवन ही एक खडतर तपश्चर्याच आहे. मनाने कोमल असूनही अन्यायाशी कठोरपणे प्रतिकार करण्याच्या स्वाभिमानी माणसाचे दर्शन त्यांच्या जीवनात आढळते.

सत्तेची पदे हे मोराचे पंख असतात. हे केव्हा गळून पडतात त्याचा नेम नाही. पण आपल्याला मिळालेली सत्ता ही जनतेची असून ती जनतेच्या हितासाठी व उद्धारासाठी, उन्नतीसाठीच वापरली पाहिजे असा साहेबांचा आग्रह होता. त्यांचे ध्येयवादी कुशल नेतृत्त्व व विधायक मार्गदर्शन आम्हा सर्वांना प्रेरणा देणारे स्फूर्तिस्थान आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org