मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ३५

३५. महाराष्ट्र व देशाच्या बांधणीत यशवंतरावांचा मोठा वाटा  - नानासाहेब  गोरे

श्री. यशवंतराव चव्हाण यांचे सगळे आत्मचरित्र जर पूर्ण होऊ शकले असते तर भारताच्या आणि खास करून महाराष्ट्राच्या इतिहासातील काही प्रकरणांवर प्रकाशझोत पडल्यासारखे झाले असते, पण त्यांच्या हातून त्यांचे कृष्णाकाठचे जीवनच शद्बांकित होऊ शकले, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सागरकाठी वसलेल्या मुंबईत आणि यमुनेच्या तीरावर वसलेल्या दिल्लीतच यशवंतरावांच्या जीवनाला बहर आला आणि तेथेच यशवंतरावांचा थोरपणा आपल्याला स्मरतो तो फुलला आणि फळास आला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची जी महाराष्ट्राची आणि भारताची बांधणी झाली, तीत यशवंतरावजींचा फार मोठा वाटा आहे. त्याचे तपशीलावर वर्णन येथे करणे शक्य नाही, परंतु त्यांच्या पुढारीपणामुळे ज्या दोन घटना घडल्या, पहिली महाराष्ट्रात आणि दुसरी देशात, त्यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.

पहिली घटना महाराष्ट्रात घडली. ती यशवंतरावजींच्या विचारावर समाजवादाची जी छाप पडलेली होती, त्याची निदर्शक समजली पाहिजे. आज जे नाव सर्व देशभरच्या सहकारी क्षेत्रात गाजत आहे, ते प्रामुख्याने महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांचे. परंतु अनेकांचे त्यात ज्या एका गोष्टीकडे दुर्लक्ष होण्याचा संभव आहे, असे मला वाटते, ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या खासगी साखर कंपन्यांकडे असलेली जवळजवळ ८०,००० एकर जमीन त्यांच्याकडून घेऊन तिचे रूपांतर शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या विशाल कृषिक्षेत्रात करणे. ही हजारो एकर जमीन शासनाने नेमलेल्या मंडळाच्या हाती सोपवावयाची आणि तिथे प्रचंड प्रमाणावर ऊसाचे उत्पादन करून तो ऊस सहकारी साखर कारखान्यांना पुरवावयाचा, अशी ती भव्य योजना होती. शासननियंत्रित शेती महामंडळाचा हा भक्कम आधार जर पाठीशी नसता, तर महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने एवढ्या मोठ्या प्रमाणात उभे राहिले असते की नाही, यात शंका आहे. हे शेती महामंडळ आपण आर्थिक समाजवादाच्या दिशेने राज्याची वाटचाल व्हावी म्हणून निर्माण करीत आहोत, याची जाणीव त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या यशवंतरावजींच्या ठिकाणी होती आणि त्यांनी ती समाजवादाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल अशा शब्दात बोलूनही दाखविली होती.

आजचे मुख्यमंत्री श्री.वसंतदादा पाटील यांना यशवंतरावांच्या या भव्य स्वप्नाचे भान आहे असे दिसत नाही, नाहीतर या जमिनीपैकी हजारो एकर जमीन पुन्हा मूळ मालकांना देण्याची योजना त्यांनी मनाशी आखलीच नसती.

यशवंतरावजींची दुसरी एक श्रेष्ठ कामगिरी म्हणजे भारतीय सेनादलाची फेरबांधणी. कै.कृष्ण मेनन यांच्या चुकीच्या धोरणामुळे भारतीय सैन्याची किती दुर्दशा झाली होती, ते १९६२ मध्ये चीनने पाहता पाहता हिमालयाच्या खिंडीतून आसाममध्ये तेजपूरमध्ये जी मुसंडी मारली त्यावेळी लक्षात आले. त्यावेळी जनरल अँडरसन यांच्या नेतृत्वाखाली सैन्याच्या या पराभवाचे व दुर्दशेचे कारण खोलवर जाऊन शोधण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. तिने जो अहवाल सादर केला, तो शासनाने कधीच उजेडात येऊ दिला नाही. त्यावेळी कृष्ण मेनन यांच्याजागी पं.जवाहरलाल नेहरूंनी यशवंतरावजींची नेमणूक संरक्षणमंत्री म्हणून केली. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, हे शब्द त्या घटनेला उद्देशून रूढ झाले आहेत. अँडरसन अहवाल जरी जनतेसमोर कधी आला नसला तरी तो यशवंतरावजींसमोर आला आणि यशवंतरावजींनी त्यापासून योग्य तो बोध घेतला हे उघड आहे. त्यानंतर अहवालातील सूचना ध्यानात घेऊन भारतीय सेनादलाची जी आखणी झाली, तिला डागडुजी म्हणता येणार नाही. भारतीय सेनादलाचा तो पुनर्जन्मच म्हणावा लागेल. यशवंतरावजींनी ही कामगिरी किती चोखपणाने पार पाडली याचे प्रत्यंतर पुढे चार वर्षांनी झालेल्या भारत-पाक युद्धात आणि त्यानंतर बांगला देशच्या निमित्ताने झालेल्या दुस-या युद्धात दिसून आले.

कै.कृष्ण मेनन जितके बडबडे, तितके यशवंतरावजी मितभाषी. अजिबात गाजावजा न करता त्यांनी आपल्या सेनादलाची फेररचना केली. उणिवा दूर केल्या. दारूगोळ्याचे कारखाने, कै.मेनन यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे विजेच्या किटल्या आणि गॅसच्या चुली अशासारख्या फालतू गोष्टी न करता दारूगोळाच तयार करतील यावर यशवंतरावजींनी भर दिला.

सेनादलाच्या पुनर्रचनेचा जो भक्कम पाया त्यावेळी यशवंतरावांनी घातला, त्यावरच आजच्या आपल्या सामथ्र्यवान सेनादलाची इमारत उभी आहे, याचा विसर आपणास पडता कामा नये.
एवढी राष्ट्राची भरीव कामगिरी ज्या यशवंतरावजींनी केली, त्यांच्याकडे पुढेपुढे दुर्लक्ष झाले आणि त्यांच्या अंगच्या कर्तृत्वाचा आणि अनुभवसंपन्न बुद्धीचा जो लाभ शासनकर्ता पक्षाला आणि विरोधी पक्षाला मिळायला हवा होता, तो मिळू शकला नाही, याचे मात्र वाईट वाटते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org