मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ३३

३३. लौकिक व्यक्तिमत्त्वाचा  म-हाठमोळा माणूस – कमलाशंकर पंड्या

यशवंतरावांची आठवण झाली की, त्यांची अनेक रूपे आज डोळ्यांसमोर उभी राहतात. मुंबई राज्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी, द्विभाषिक मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारताचे संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री, विरोधी पक्षनेते ही त्यांची राजकीय रूपे. या प्रत्येक रूपात वावरताना, आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवून ठेवलाच, पण या सर्व भूमिका वठवताना ‘‘एका संस्कारक्षम माणूस’’ हे त्यांचे मूळचे रूप कायम होते. राजकारणात वावरणा-या माणसाला नेहमीच मनासारखे निर्णय घेता येत नाहीत. अनेकदा मनाला पटणारे निर्णय बाजूला ठेवून, सदसद्विवेकबुद्धीला प्राप्त परिस्थितीनुसार मुरड घालून निर्णय घ्यावे लागतात वा इतरांनी घेतलेले निर्णय मान्य करावे लागतात. त्याचा परिणाम म्हणून टीकेचे घावही सोसावे लागतात. यशवंतरावांच्यावर असे प्रसंग त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेकदा आले पण त्यातून धैर्याने व संयमाने त्यांनी वाट काढली. हे त्यांना शक्य झाले ते त्यांच्या संस्कारक्षम मनामुळे.

‘‘संस्कारक्षम मन असणे ही देणगी नियताची’’ असे यशवंतराव एका ठिकाणी म्हणतात. ही देणगी त्यांना मुळातच लाभली होती. कृष्णाकाठच्या निसर्गाचे, आई विठाईचे, विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासारख्या समतावादी नेत्याचे प्रत्यक्ष संस्कार त्यांना कोवळ्या वयात लाभले. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गांधी, नेहरू यांच्यासारख्या कार्यापासून यशवंतरावांनी राष्ट्रीय संस्कार घेतले. तसेच वि.स.खांडेकर, ना. सी.फडके, तात्यासाहेब केळकर, नाट्याचार्य खाडिलकर यांच्यासारख्या साहित्यिकांकडून सांस्कृतिक अभिरूचीचे संस्कार घेतले. या सर्व संस्कारांनी घडलेला यशवंतरावांचा पिंड, पुढच्या आयुष्यातील राजकीय धबडग्यात टिकून राहिला. देशात अगर परदेशात कोठेही गेले तरी यशवंतरावांनी आपल्या प्रासंगिक,
राजकीय, जबाबदारीबरोबरच आस्था बाळगली ती तिथल्या माणसांबद्दल, त्यांच्या सांस्कृतिक जीवनाबद्दल, ते समृद्ध करणा-या निसर्गाबद्दल. यशवंतरावांनी आयुष्यात मित्र खूप मिळविले. त्यात कॉ.डांगे, आचार्य अत्रे, एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे यांच्यासारखे त्यांचे राजकीय विरोधकही होते. पण यशवंतरावांची अगदी खरीखुरी मैत्री होती ती ग्रंथांशी, ललित, वैचारिक, राजकीय, शास्त्रीय, अशा कोणत्याही दालनातील ग्रंथ त्यांनी सदैव आपले मानले, मराठी साहित्य आणि साहित्यिक हा तर त्यांचा खास प्रेमाचा विषय. या प्रेमाचा यथेच्छ लाभ कित्येक जुन्या-नव्या साहित्यिकांना झाला आहे. माय मराठीचे बारसे त्यांनीच केले. या अखंड ग्रंथप्रेमानेच यशवंतरावांच्यातील ‘संस्कारक्षम’ माणूस अखेरपर्यंत जिवंत राहिला. या संस्कारक्षम मनामुळे राजकीय उलथापलथीत कधी यशवंतरावांना फायद्याची पाऊले टाकता आली नसतील, कधई महत्त्वाची संधी हुकलीही असेल, पण त्याची खंत कधी त्यांनी बाळगली नाही. म्हणूनच आज त्यांच्या स्मृतीला उजाळा देताना प्रत्येकाला जाणवतो आहे, तो त्यांच्या संस्कारक्षम मनाचा उमटलेला ठसा. यशवंतरावांच्या राजकीय कर्तृत्वाचे मूल्यमापन काळ काय करायचे ते करेल, पण त्यांच्यातील संस्कारक्षम माणसाचे मूल्यमापन करण्यासाठी  काळाची तरी काय गरज? गरज आहे ती त्यांच्या स्मृती जपण्याची.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org