मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ३०

३०.  यशवंतरावांच्या सहवासात आल्यानंतर – ना. मा. सो. कन्नमवार

२६ फेबु्रवारी १९६१ रविवारचा दिवस. यशवंतराव अहमदाबादच्या दौ-यावर जायला निघताना तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी त्यांना विचारू लागले, ‘‘काय यशवंतराव, मी परवा दिलेली दोन इंग्रजी पुस्तके आपण वाचलीत ना ?’’ ‘‘नाही हो’’ यशवंतराव म्हणाले, ‘‘मला वेळ मुळी मिळालाच नाही. अलीकडे कामाचा व्याप एवढा वाढला आहे की, पुस्तके वाचायला वेळ मिळतच नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास मला वाटते की, सहा वर्षानंतर मी अज्ञानी होऊन जाईन.’’ (I May become ig-ora-t i- six years)

यशवंतरावांची परिस्थिती आज ही आहे की, लोक झोपू देतील तेव्हा त्यांनी झोपावे, लोक जेवू देतील तेव्हा जेवावे. थोड्या दिवसांपूर्वी त्यांच्या धर्मपत्नी सौ. वेणूताई यांची प्रकृती विशेष बिघडली होती... घरीच उपचार चालू होता. रात्री ९ चा सुमार होता. साडेनऊ वाजता असेंब्लीतील काँग्रेस आमदारांची पक्षसभा व्हावयाची होती. शिवाय काही माणसे भेटावयाची राहून गेली होती. त्यावेळी त्यांना आठवण झाली आपल्या रूग्ण पत्नीची. ते लगेच मला म्हणाले, ‘‘कन्नमवारजी, तुम्ही आजची ही सभा सांभाळा. मी आत्ताच घरी जोतो. कारण आज दिवसभरात पाच मिनिटेदेखील माझ्या पत्नीचा कुशल समाचार घ्यायला मला वेळ मिळाला नाही. ती आता झोपेल. नऊ वाजल्यानंतर ती जागत नाही. मला गेले पाहिजे.’’

मी चटकन म्हणालो, ‘‘आपण आता सारी कामे बाजूला सारून ताबडतोब अवश्य घरी जा.’’ ते लगेच गेले. पण कामाबद्दल आस्था व चिंता दाखविणारे, कर्तव्य व अंत:करणाची ओढ या कात्रीत सापडलेले आणि ‘‘मी काम सांभाळतो. तुम्ही जा,’’असे म्हणताच समाधान व विश्वास दर्शविणारे सर्वभाव त्या क्षणमात्रात त्यांच्या मुद्रेवर मला दिसून आले, ती त्या दिवशीची त्यांची मुद्रा
माझ्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेली.

नागपूरचे असेंब्ली अधिवेशन संपत येऊ लागले होते. सर्व महिला आमदारांनी आपल्या निवासस्थानी यशवंतरावांना जेवावयाला बोलाविले होते. हे जेवण दुपारी १२ वाजता ठेवले होते. यशवंतरावांचे काम त्या दिवशी साडेबारा वाजेपर्यंत उरकू शकले नाही. त्यांना काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व एक महत्त्वाचे निवेदन विधानसभेत द्यावयाचे होते. मी म्हणालो, ‘‘आपण जेवण आटोपून एक वाजेपर्यंत असेंब्लीत येऊ कसे शकाल? जेवायच्या कार्यक्रमाला न गेल्यास काय हरकत आहे?’’ नाही नाही! हा महिलांचा कार्यक्रम आहे. मला त्यांचा मान राखलाच पाहिजे, मी जातो आणि लगेच येतो वेळेवर.’’ यशवंतराव म्हणाले. त्याप्रमाणे ते एक वाजायला तीन मिनिटे कमी असताना विधानसभेत येऊन पोचले. तेव्हा मी त्यांना विचारले,’’ आपले जेवण एवढ्या लवकर आटोपले कसे?’’ ते म्हणाले, मी महिलांच्या बरोबर पानावर बसलो. घाईघाईने वर वर थोडा भात घेतला आणि त्यांची क्षमा मागून लगेच येथे आलो.’’ जेवणाच्या बाबतीत त्यांचे नेहमी असेच घडत असे. समाधानाने जेवण करणे, वेळेवर जेवणे हे त्यांना कामाच्या गर्दीमुळे जमतच नाही. अलीकडे तर ते सचिवालयात व विधानसभा अधिवेशनाच्या वेळी विधानसभा भवनातील आपल्या कार्यालयात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेवण करीत असतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org