मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण १५

१५.  बेरजेचे राजकारण करणारा मुत्सद्दी - धुळाप्पाणा नवले

केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात बेरजेचे राजकारण करणारा मुत्सद्दी राजकारणी म्हणून ना. यशवंतराव चव्हाण यांची ख्याती आहे. आम्ही त्या वेळच्या सातारा ल्ह्यातील कार्यकर्ते साहेबांच्या जवळ राहिलो ते त्यांच्या मुत्सद्दीपणा आणि संघटनाकौशल्य यामुळेच.

राजकारणाच्या आयुष्यात मी साहेबांच्या सहवासात उणीपुरी ५० वर्षे काढली. सन १९३६ पासून मी साहेबांना जवळून पाहात आलो. त्यांच्या अंगातील राजकारण शब्दात वर्णन करण्यासारखे नाही. राजकारण कसे असावे याचे धडे त्या वेळेपासून आम्ही त्यांच्याकडून शिकलो. सन १९३६ला जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीच्या वेळी माझा आणि त्यांचा प्रथम परिचय झाला. म. गांधीजींच्या धोरणानुसार राजकारण करणारा एक धुरंधर नेता म्हणून त्याच वेळी माझ्या मनात एक प्रकारचा ठसा उमटला होता. आत्माराम बापू पाटील (बोरगाव) व साहेब सांगलीत आले की, त्या वेळी लोकल बोर्डात बसायचे. वसंतदादा, मी आणि अन्य निवडक कार्यकर्ते स्वतंत्र भारताच्या कल्पना करीत बसत असू. १९३७ मध्ये पार्लमेंटची निवडणूक झाली. त्या वेळी सातारा जिल्ह्यात काँग्रेस व कूपर पार्टी असे दोन गट निवडणूक लढवीत होते. या निवडणुकीत साहेबांनी फार मोठे श्रम घेतले तरी देखील अगदी काठावर काँग्रेसला यश मिळाले. या यशाचे सारे श्रेय साहेबांनाच द्यावे लागेल. याच निवडणुकीपासून माझा आणि साहेबांचा दैनंदिन संबंध वाढत गेला. दादा आणि साहेब यांच्या राजकीय मतप्रवाहात माझी मते तयार झाली. सन १९३९-४० ला वैयक्तिक सत्याग्रह करावा, असा आदेश म. गांधींनी दिला. त्यानुसार साहेब व दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्याग्रह केला. भाऊसाहेब सोमण, साहेब व दादा यांनी प्रांतिकपासून ते जिल्ह्यापर्यंत कमिट्या नेमून त्या कमिट्या सांगतील त्या कार्यकर्त्यानी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घ्यायचे, असे ठरले. सत्याग्रह कसा करायचा, याचे प्रशिक्षण दादा व साहेब द्यायचे. त्या वेळची त्यांची बोलायची लकब, वागण्याची पद्धत, उमदे व्यक्तिमत्त्व, यामुळे आम्ही सारे कार्यकर्ते हुरळून जायचो.

राजकारण करता करता साहेबांना पुस्तके वाचायचा नाद फार होता. मग ते कोणत्याही विषयाचे पुस्तक असो, हाती पडले की, ते वाचत राहणे हेच त्यांचे काम. या त्यांच्या वाचनाच्या छंदातूनच त्यांची प्रतिभा अधिक फुलली असे मला वाटते. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शेती या विषयांवरील पुस्तकांबरोबरच वृत्तपत्रे आणि ललित साहित्यातील पुस्तके, कवितासंग्रह, यांचाही साहेबांना चांगलाच छंद होता.

कौटुंबिक आघात आणि अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतले. या शिक्षणाचा उपयोग त्यांनी देशासाठी केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मात्र साहेबांना मनस्ताप झाला. संयुक्त महाराष्ट्र हवाच ही त्यांची भूमिका होती. तथापि आपली भूमिका ते वेगळ्या पद्धतीने मांडत होते. सामोपचाराने हा प्रश्न सुटावा अशी त्यांची इच्छा होती. संयुक्त महाराष्ट्राबाबत सांगलीत एकदा त्यांनी दादांबरोबर चर्चा केली. आम्ही निवडक कार्यकर्ते त्या वेळी हजर होतो. साहेबांची भूमिका मला मनापासून पटली. परंतु विरोधक साहेबांवर भयानक आरोप करीत होते. त्यावेळी साहेबांच्या प्रत्येक जाहीर सभेत अंडी फेकणे, चप्पल फेकणे असे निंद्य प्रयत्न काहींनी केले होते. काही काळ साहेबांनी जाहीर कार्यक्रमांना जाणे बंद केले होते. त्या वेळी आम्ही साहेबांना सांगलीत आणून त्यांची जाहीर सभा घेतली. शिवाय त्यांचा सत्कार केला. या सत्काराच्या वेळी साहेबांच्या चेह-यावरील समाधानाच्या छटा पाहून आम्ही सद्गदित झालो. साहेबही गहिवरून गेले होते. ‘‘माझा जिल्हा, माझी माणसे माझ्यावर जिवापाड प्रेम करतात,’’ असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

जास्तीत जास्त कार्यकर्ते जमवायचे, सवंगड्यांशिवाय राजकारण नाही. असलेल्या सवंगड्यांना कधीही तोडायचे नाही, असे बेरजेचे राजकारण साहेबांनी केले. त्यांच्या एकूण कामाचा ठसा आम्हा कार्यकर्त्याच्या मनावर इतका रूजला, की आम्हीही कार्यकर्ते जमवू लागलो.

१९५२ नंतरचा काळ असा होता. एक आमदार वारल्यामुळे पोटनिवडणूक होती. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार कोण उभा करावा हे ठरविण्याकरिता मी आणि यशवंतरावजी चव्हाण दोघेही पुण्यास जावयाचे होतो. यशवंतरावांचे त्यांच्यापेक्षा थोरले बंधू गणपतराव वारल्यामुळे घरी दु:खाचे वातावरण होते. तिसरा दिवस होता. आता पुण्यास जावयाचे की नाही असा विचार पडला. एका बाजूला लोकाचार व बंधूप्रेम व दुस-या बाजूला संघटनेसंबंधीचे आपले कर्तव्य ! यशवंतरावांनी यासंबंधी निर्णय घेण्यास मुळीच वेळ घालविला नाही. कौटुंबिक मोहापेक्षा राजकीय कर्तव्य श्रेष्ठ असे म्हणून ते ताबडतोब पुण्यास जावयास निघाले. पुण्यास पोहोचल्यानंतर मगच त्यांनी दाढी वगैरे केली. राजकारणात जसे यशवंतराव बुद्धिपूर्वक काम करत असत तसेच कर्तव्याचा निर्णयसुद्धा ते विचाराला अनुसरूनच घेत. भावनाप्रधान असूनही ते भावनेला बळी पडत नव्हते हे विशेष! राजकारणात दादा व साहेबांचा वाद खूपच गाजला. हा वाद मिटावा, मतभेद संपावेत म्हणून मी अनेक वेळा उभय नेत्यांशी एकेकट्यांशी चर्चा केली. माझे प्रयत्न फळाला आले तो दिवस माझ्या राजकीय जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.

अखेर-अखेरच्या काळात त्यांच्या शरीराला स्थूलता प्राप्त झाली होती. त्यांनाही तशी जाणीव झाली होती. त्यांनी ती जाणीव प्रगट करताच मी त्यांना व्यायाम करण्याचा अनाहूत सल्लाही दिला. ‘‘वेळ कुठे मिळतो?’’ असे ते म्हणाले. मी लगेच त्यांना सांगितले की, ‘‘झोपायला वेळ मिळतो, जेवायला वेळ मिळतो आणि व्यायामाला वेळ मिळत नाही ही तुमची शुद्ध थाप आहे.’’ त्यांच्या मनावर त्याचा परिणाम झाला व थोडे दिवस त्यांनी व्यायाम करण्यास सुरुवात केली. पण ते सातत्याने टिकू शकले नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org