मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण १४

१४.  आमचे मित्र यशवंतराव - बाबूराव घोरपडे

१९३० साली नांदगावास सत्याग्रही शिबिर सहा महिने चालविले होते. त्या शिबिरात मार्गदर्शन करण्याकरिता नेने, नखातेकर, पाचगणीचे गाडेकर हे वरचेवर येऊन मार्गदर्शन करीत होते. त्याच वेळी जंगल सत्याग्रह केला गेला. त्यात मी, व माझे बंधू बाळकृष्ण घोरपडे, प्रामुख्याने होतो. नंतर गावातील लोक याच चळवळीत शिरू लागले. त्यात वरील दोघांचेनंतर सर्वच गाव चळवळीत उतरला. सन १९३९ साली ब्रिटिशांनी सैन्यभरतीस विरोध केला म्हणून बाबूराव घोरपडे, वामनराव कुबेर व मुरारराव जगदाळे यांचेवर खटला भरता भरता तो खटला न होता तिघांना ताकीद दिली गेली. या ठिकाणी हे नमूद करणे आवश्यक आहे की, त्या वेळी मोरारजी भाई यांचेवर मुख्यमंंत्री व्हावे म्हणून दडपण आले आहे अशी माहिती मी स्वत: व भाऊसाहेब भावे एम.एल.सी. यांनी श्री. किसनवीरांना दिली.

श्री. किसनवीर यांनी वातावरणाचा ताण तसाच टिकविण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री म्हणून मोरारजी भाई हेच असावेत असा हेतू श्री. मोरारजीभार्इंचे मंत्रिमंडळातील सातारचे राज्यमंत्री श्री. मालोजीराजे नाईक निंबाळकर व श्री. गणपत देवजी तपासे वगैरेंचा भर होता. श्री. मोरारजीभार्इंनी सांगितले, ‘‘मला बिनविरोध निवडले तर मी उभा राहीन.’’ मोरारजीभार्इंनी माघार घेतली व भाऊसाहेब हिरे हे मुख्यमंत्री होण्याकरिता विरोधात उभे राहिले. त्या वेळी यशवंतराव चव्हाणांनाही मुख्यमंत्री पदाकरिता उभे केले गेले. त्या वेळी महाराष्ट्र राज्यात एक मोठा अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला होता. या निवडणुकीत श्री. भाऊसाहेब हिरे यांना १०१ मते मिळाली व यशवंतरावांना ३०३ मते मिळाली. यात मोरारजीभाई देसाई यांनी श्री. यशवंतरावांना पाठिंबा दिला. निवडणुकीत यशवंतरावांच्या मित्रमंडळींचे प्रयत्न फळास आले. त्यांची सरशी झाली.

१९४२ साली मुंबई येथे काँग्रेसने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ‘करा किंवा मरा’ असा एक आदेश दिला. त्यानंतर सातारा जिल्ह्यात पडवानल पेटला. जिल्ह्यात गटवार ‘डिक्टेटर’ निवडण्याची पद्धत सुरू झाली. ‘डिक्टेटर’ म्हणजे सर्वाधिकारी. सातारा जिल्ह्याचे डिक्टेटर यशवंतराव होते. राजकारण म्हटले की वेडावाकडा मार्ग आलाच असे आपण गृहीत धरतो, परंतु यशवंतरावजींचे राजकारणास सुसंस्कृतीची झालर होती. प्रथम ते पार्लमेंटरी सेक्रेटरी झाले. नंतर ते मंत्री झाले व महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद त्यांना भूषविले.

साहेब मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यावर त्यांनी १०।१२ लोकांची एक सभा घेतली. यशवंतरावांनी प्रश्न केला, ‘‘आपण सर्वांनी सांगावे की मुख्यमंत्री म्हणून कसे वागावे?’’ आबा तेव्हा म्हणाले, ‘‘परमेश्वरा, यशवंतरावांना आपल्या मित्रापासून वाचव.’’ ‘‘बाबूराव तुम्ही सांगा?’’ तेव्हा मी सांगितले, ‘‘आपली मुख्यमंत्रिपदाची शान राखण्याकरिता सर्व जातींच्या धर्मांच्या तसेच आपले पक्षाचे, विरोधी पक्षाचे लोकास हा मुख्यमंत्री आपला आहे ही भावना निर्माण करावी.’’

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org