मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण १३

१३.  भाग्यवंत, शीलवंत, यशवंत ! - पुरुषोत्तम पांडुरंग गोखले

महाराष्ट्राची अस्मिता भारताच्या सेवेला लावून भारताला जगद्गुरूची स्थिती प्राप्त व्हावी, म्हणून ब्रिटिश रियासतीच्या प्रारंभापासून जे जे लोकमान्य टिळक, ना. गोखले आदी महाभाग झटले त्यांची लोकसंग्रही नेतेपणाची परंपरा चालविणारे गेल्या पंचवीस वर्षांत यशवंतराव एकच पुढारी होते. हे आपल्याला सर्वप्रथम भारतीय मानीत आणि प्रत्येक महाराष्ट्रीयाने तसेच मानून, भारताला जगामध्ये अग्रेसर करावे, अशी त्यांची मनीषा व खटपट असे.

माणसे जोडणे व जोडलेली माणसे विश्वासपूर्वक सांभाळणे हा धडा यशवंतरावांनी आपल्या मातुश्रीपासून घेतला होता. त्यामुळे माणसामाणसांची पारख करून, राजकारणात व समाजकारणात कोणाचा उपयोग किती व केव्हा करून घ्यावयाचा, ही कला यशवंतरावजींना चांगली साधली होती. त्या कलेमुळेच ते अजातशत्रू राहिले. जसे अच्युतराव कोल्हटकर वृत्तपत्रीचे साहेब समजले जात; त्याच धर्तीवर यशवंतराव महाराष्ट्रजीवनाचे साहेब समजले जात. ‘‘साहेब कामासी नाही गेला तर कोण पुसे त्याच्या साहेबीला’’ ते व्रत यशवंतरावांनी पाळले! क-हाडमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजपासून जी कॉलेज शिक्षणाची सोय झाली, बडोदे संस्थान विलीन झाल्यानंतर कविवर्य यशवंतराव पेंढरकर यांचा ‘‘महाराष्ट्रकवी’’ म्हणून गौरव करून त्यांच्या योगक्षेमाची काळजी यशवंतरावांनी वाहिली, ही त्यांच्या साहेबी सेवेची खास उदाहरणे आहेत.

यशवंतराव मातृभक्त होते. ते वाढत्या वयाबरोबर भारतभक्तही झाले.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईसह महाराष्ट्र हे ध्येय होते. ते त्यांनी आपल्या धोरणबाजीने दिल्लीच्या मुत्सद्द्यांना हळूहळू पटवून साध्य केले व भारतीय नकाशावर महाराष्ट्राचे नाव झळकविले. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राचे राज्य मराठ्यांचे होणार की मराठीच होणार, या आशंकेला, यशवंतरावांनी महाराष्ट्राचे राज्य मराठीच होणार, अशी नि:शंक ग्वाही दिली.

कारण यशवंतरावांवर त्यांच्या ‘‘विठाई’’ माऊलीने जसे संस्कार केले होते तसे सावरकरपंथीय कळंबे गुरुजींनीही केले होते. फार काय महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहु महाराज, महात्मा फुले यांच्या कामगिरीने यशवंतरावांचे सामाजिक विचार घडले, फुलले, बहरले होते. जातीयतेचा पगडा त्यांना कधीच मान्य नव्हता. कर्मवीर पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेचे ते अनेकानेक वर्षे अध्यक्ष होते ते त्यामुळेच! परिश्रमातून शिक्षण ही कर्मवीरांची स्वाभिमानपोषक भूमिका यशवंतरावांना मान्यच होती. कारण ते अत्यंत गरीब व बिकट परिस्थितीमध्ये वाढले होते व त्यांनी आगरकरांसारखी पुणे-वक्तृत्वसभेची वगैरे बक्षिसे पटकावून व मित्रांची सहानुभूती सांभाळून आपले वकिलीपर्यंतचे शिक्षण संपादले होते.

यशवंतराव उत्तम वाक्पटू होते. त्यांचे विचार अतिशय संयमी, धीरोदात्त व मंत्रमुग्ध करणारे होते. तसे ते कुशल लेखकही होते. त्यांच्या ‘‘कृष्णाकाठ’’ या आत्मवृत्तावरून व त्यांनी प्रसंगोपात लिहिलेल्या लेखांवरून हे स्पष्ट होते. तसेच ते एक रसिक मर्मग्राही होते. मी लिहिलेल्या ‘‘अठराशे सत्तावन्नचा महाराष्ट्र’’ व ‘‘जागृत सातारा’’ याचे कौतुक यांनी मनमोकळेपणाने जाहीररीत्या केले, यावरून माझ्या प्रत्ययाचे आहे. स्वच्छ विचार, विचाराप्रमाणे सदैव सदाचार व यातून पुरोगामित्वाला विज्ञाननिष्ठेची जोड देऊनही त्यांनी भारतीय परंपरांचा आदर शक्य तो राखलाच. तळागाळातील व्यक्तिमत्त्वालाही त्यांची अस्मिता होती आणि सामुदायिक सहकार्याने विधायक चळवळी राष्ट्रहितैषी करणे हे त्यांना आवडीचे कर्तव्य वाटे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org