मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १०९

१०९ - दुरून ऐकलेले साहेब – शशिकांत टेंबे

यशवंतराव चव्हाण यांच्या भाषणाचे सातारी वळणाचे घराणे आहे. मोजक्या, मार्मिक शब्दांची पखरण करीत चव्हाणसाहेब प्रेक्षकांचे रूपांतर श्रोत्यांमध्ये सहज करतात. श्रोते मग यशवंतरावांच्या पारदर्शक विचारांच्या शब्द-ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातात.

वर्षे मोजायची झाली तर बत्तीस वर्षांपूर्वीची हकीगत आहे. बारामतीला मार्वेâट कमिटीच्या मैदानावर काँग्रेसची सभा होती. त्या काळात बारामती भागात शेतकरी काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष, यांचा प्रभाव जाणवत होता. काँग्रेस सभेत साता-याचे यशवंतराव बोलणार म्हणून जाहीर झाले होते. सभेमध्ये गोंधळ होणार या शक्यतेने गर्दी उसळली होती. सभा चाललेली असताना शे.का.पक्षाचे त्या वेळचे कार्यकर्ते उद्धवराव इंगळे यांनी माईकवर यावे आणि आपले म्हणणे मांडावे असे साहेबांनी आवाहन करून सभेतील गोंधळ आटोक्यात आणला. उद्धवरावांच्या भाषणानंतर काकासाहेब गाडगीळांच्या सभाशास्त्राचा हवाला देऊन यशवंतरावांनी सभेतील लोकांना सांगितले, ‘‘उद्धवरावांचे म्हणणे आपण सर्वांनी ऐकले. मला माझे विचार सांगावयाचे आहेत. सभेमध्ये शांतता राखण्याची हमी मला तुमच्याकडून हवी आहे.’’ या सलामीच्या उद्गारांनी त्यांनी प्रारंभ केला. ते संपले केव्हा याची खबरबात ज्या श्रोत्यांना समजली नाही अशा असंख्य श्रोत्यांत मी एक होतो.

या काळात यशवंतराव आमदार, नामदार व खासदार नव्हते. काँग्रेसचा झेंडा महाराष्ट्राच्या खेडोपाडी निष्ठेने नेणा-या कार्यकर्त्याच्या पथकाचे ते बिनीचे सेनापती होते. त्या भाषणानंतर यशवंतराव चव्हाण यांची कित्येक भाषणे ऐकण्याचा योग आला. सत्तास्थानावर चढत्या श्रेणीने चव्हाण साहेब जात होते. चमकत होते. गर्दीचा तुटवडा त्यांना कधी भासला नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या वादळी कालखंडामध्ये काँग्रेसच्या जहाजाचे कप्तानपद त्यांच्याकडे चालून आले होते. त्या काळात अन्य काँग्रेस नेत्यांना बोलणे जनतेने अवघड केले होते. पण यशवंतराव यांची भाषणे जनतेने ऐकून घेतली. त्यांना विरोध केला, सभेमध्ये निदर्शने केली पण यशवंतराव काय बोलतात म्हणून मराठी जनतेचे कान त्यांच्या बोलण्याकडे संयुक्त महाराष्ट्राच्या काळात लागले होते. या कालखंडामध्ये त्यांच्या सभा ऐकतांना सारखे जाणवायचे की, या माणसाला मराठी माणूस समजला आहे, उमजला आहे. समोरच्या माणसाला आपलेसे करण्याची चव्हाणांची खास शैली आहे.

या खास शैलीचे अनुभव साहित्य संमेलनात आले. सार्वजनिक वाचनालयाच्या महोत्सवामध्ये आले. नाशिकला कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओलावा अगर नाटकातील वाक्यांचा उल्लेख केल्याशिवाय चव्हाण साहेबांनी आपले भाषण कधी थांबवले नाही. महाराष्ट्राच्या विविध शहरांना त्यांची त्यांची दैवते आहेत. चव्हाणसाहेबांना या दैवतांच्या महात्म्याची जाण चांगली आहे. त्याचा उल्लेख सभांमध्ये करून सभा जिंकण्याची यशवंतरावांची खासीयत मी अनेक वेळा अनुभवली आहे.

साहित्यावरील सभा वेगळ्या आणि राजकीय मैदानावरील सभा वेगळ्या आहेत. काँग्रेसच्या व्यासपीठावरून विचारांचे आणि निष्ठेचे आवाहन करताना सामान्य माणूस हा त्यांच्या भाषणाचा सदैव केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट जाणवले. त्यांच्या सभोवती गोळा झालेल्यांपैकी काहींना या विचाराचे वावडे असल्याचे लक्षात आले.

विशेषत: नाशिकला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या सत्काराला यशवंतराव अगत्याने आले. दिलखुलास बोलले, दलितांच्या रास्त हक्काचा त्यांनी पाठपुरावा केला. त्या सभेच्या व्यासपीठावर अस्वस्थ झालेले काही नेते आम्हा पत्रकारांच्या नजरेतून सुटले नाहीत. यशवंतरावांच्या विचारांचा पल्ला प्रभावी आहे. नव्या जमान्याची चाहूल घेणारा आहे एवढेच नव्हे तर नव्या जमान्याचे स्वागत करणारा आहे. याची ग्वाही दलित नेते बुद्धवासी गायकवाडांच्या राजकारणाला त्यांनी डोळस साथ दिली तेव्हा सर्वांना पटली. दोन्ही पक्षाच्या सहजीवनावर त्यांचा कटाक्ष होता. पुरोगामी राजकारणाचे ते सदैव कैवारी राहिले आहेत. त्यांच्या या मोठेपणाची ग्वाही मिळालेले आज त्यांच्या सांगाती आहेत. सुखाचे व सत्तेचे सोबती आपापल्या सुखदु:खात मग्न आहेत.

सातारा क-हाड भागामध्ये यशवंतराव चव्हाण यांना आपल्या घरातील वडीलधारामाणूस म्हणूनच पाहिले जाते. ही जवळीक महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यामध्ये कमी अधिक आहे. पण यशवंतराव हे केवळ राजकारणी नाहीत, साहित्य, संगीत, कला यांचे मर्मज्ञ जाणकार आहेत याचा प्रत्यय त्यांच्या भाषणातून येतो. दुरून ऐकलेले साहेब या तोलामोलाचे आहेत. ज्या भाग्यवंतांना त्यांच्याजवळ वावरण्याची, राहण्याची, चार शब्दांची देवाणघेवाण करण्याची संधी लाभली आहे त्या सर्वांना साहेबांबद्दल किती आपुलकी, आदर, वाटत असेल याची कल्पना करणे अवघड आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org