मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १०८

१०८ - मातृभक्त चव्हाण – सर्वोदय साधना

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काळात चमकले तो काळ मोठा धकाधकीचा होता. घाटी लोकांना भांडी घासता येतील, पण राज्य कसे चालवता येईल? अशी कुत्सित विचारणा बिगरमराठी धनदांडगे करीत होते. पंडित नेहरूंच्या मनातही काही शंकाकुशंका असाव्यात असेच ते वातावरण होते. पण पुढे पंडितजींनी यशवंतरावांकडे भारताच्या संरक्षणाची धुरा दिली, ही यशवंतरावांच्या कर्तृत्वाची पावतीच होती.

गेल्या एक ऑगस्टची गोष्ट आहे. ‘‘आम्ही दिल्लीत यशवंतरावांच्या ‘‘एक रेसकोर्स रोड’’ या बंगल्यावर साडे आठ वाजता सकाळचा फोन केला, ‘‘आम्ही उद्या भेटायला यावे का?’’ अशी विचारणा केली. फोन स्वत: यशवंतरावांनी घेतला आणि त्यांनी यायची परवानगी दिली. दुस-या दिवशी सकाळी साडे आठ वाजता त्यांच्या सचिवांनी फोन करून आम्ही येत असल्याची खात्री करून घेतली. आम्ही पोहोचलो तेव्हा यशवंतराव स्वत: स्वागताला बाहेर आले आणि मित्रासारखे हस्तांदोलन करून आत घेऊन गेले. कॉफीपान झाल्यानंतर त्यांनी सगळी बारकाईने चौकशी केली आणि मग म्हणाले ‘‘रमाकांतची भेट क्वचितच होते आणि वर्षातून एखाद दुसरे पत्र येते, मला भेटत जा, लिहीत जा.’’

१ जून १९८३ रोजी यशवंतरावांच्या सुशील धर्मपत्नी वेणूताई वारल्या आणि त्या वेळेपासून त्यांचे जीवन काहीसे एकाकी बनले असे वाटते. ज्या माणसाने संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री आणि लहानशा कालापर्यंत उपपंतप्रधानसुद्धा भूषविले ते यशवंतराव दिल्लीत दीर्घकाळ एकाच जागी राहात होते. त्या बंगलीने लोकांची खूप वर्दळ आणि अगदी शांत एकान्त या दोहोंचा अनुभव घेतला. यशवंतरावांनी एकान्तात ‘‘कृष्णाकाठ’’ हे आत्मकथनपर सुंदर पुस्तक लिहिले. त्यांना आणखी २ खंड लिहावयाचे होते. एकाचे नाव त्यांनी कृष्णाकाठ दिले तर दुस-याचे नाव ते देणार होते ‘‘सागरतळी’’ आणि तिस-याचे नाव ते देणार होते ‘‘यमुनातीरी’’ पण हा संकल्प आता अपुरा राहिला. कृष्णा नदीच्या काठावर यशवंतराव वाढले. सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र हे त्यांचे गाव होते.

एखाद्या लहानशा गावाला नुसते राष्ट्रच नव्हे तर देवराष्ट्र असे महान नाव मिळालेल्या त्या गावात यशवंतराव वाढले, आणि या आधुनिक युगात या चिमुकल्या गावाचे नाव त्यांनी पुन्हा प्रकाशात आणले. १२ मार्च १९१३ रोजी यशवंतरावांचा जन्म झाला. लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांची आई विठाई ही मोठी जिद्दीची बाई होती. ती शाळेत शिकली नव्हती पण शिक्षणाचे मोल ती मनोमन जाणत होती. पहाटे दळण दळताना ती स्वत: रचलेल्या ओव्या म्हणत असे. आपल्या मुलांकडून ती ज्ञानेश्वरी वाचून घेई. एकदा मुलाने तिला विचारले, ‘‘हे सगळे तू ऐकतेस खरे पण त्याचा सारांश तू सांगू शकशील काय?’’ आईने एका वाक्यात उत्तर दिले, ‘‘ श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगताहेत की, तू तुझा मीपणा सोड आणि तुझे जे नेमलेले काम आहे ते कर्तव्यभावनेने करीत राहा.’’ यशवंतराव म्हणतात, ‘‘माझ्या आईने सांगितलेला गीतेचा इतका साधा, सोपा, सरळ आशय मी कोणाही पंडिताकडून कधी ऐकला नाही. आमची आईच आमची खरी शाळा होती.’’

यशवंतराव मातृभक्त होते याचे कारण आहे. ही त्यांची धीराची आई नसती तर त्या काळात त्यांचे शिक्षण आणि संरक्षण झालेच नसते. एकदा ते आई आणि आजी यांच्याबरोबर कित्येक मैल चालत पंढरपूरला गेले आणि चार तास रांगेत उभे राहून त्यांनी विठोबाचे दर्शन घेतले. बडवे लोक हटवीत असताना या लहान मुलाचे डोके आईने विठोबाच्या चरणावर टेकवले. हा प्रसंग सांगून यशवंतराव म्हणतात की, मंत्री झाल्यानंतर आपण निवांतपणे विठ्ठलाचे अनेकवार दर्शन घेतले. परंतु आईसोबत घेतलेले हे विठ्ठलाचे दर्शन आगळेच होते.

यशवंतरावांची पहिली भेट आठवते ती संयुक्त महाराष्ट्राच्या काळातील. यशवंतराव आमच्या ‘भूदानयज्ञ समितीचे’ सभासद होते, त्या वेळची. त्यांनी आम्हाला बोलावले आणि म्हणाले की, ‘‘लहान लहान सभा तुम्ही घेतल्या तर मी येऊन विनोबांचा विचार सांगेन. तुमचा आणि माझा लहानसाच मतभेद आहे. विनोबा म्हणतात, सत्तेपासून अलग रहावे परंतु मी सत्तेवर आहे, त्यामुळे मला अधिक शाळा उघडता येतील. लोकांना त्यापासून शिक्षण मिळेल. मला लहानपणी फार उशिरा शिक्षण मिळाले. सत्तेमुळेही काही सेवा करता येते. म्हणून मी सत्तेला त्याज्य मानत नाही. एवढाच माझा मतभेद आहे.’’

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org