मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण ९

९.  मित्र, मार्गदर्शक, वडील बंधू – नीळकंठराव कल्याणी

‘‘कोयना भागात पुन्हा मोठा भूकंप झाला’’, असे कुणी सांगितले असते तर मी जेवढा हादरलो नसतो तेवढा माझे मित्र, मार्गदर्शक स्फूर्तिस्थान आणि सर्वाधार यशवंतराव चव्हाण गेले, या वार्तेने हादरलो. मन सुन्न झाले. बुद्धी विचार करेनाशी झाली. वाटले, जणू सारे थांबले! ठप्प झाले! भावुक मन ही वार्ता खोटी असेल असे सांगत होते. कारण यांच्या आजाराची कल्पनाच नव्हती. एक-दोन दिवसांत ते इकडे येणार, निवडणुकीसाठी अर्ज भरणार, पुण्याला एस.एम.जोशी यांच्या गौरवार्थ बोलणार, हे सारे काही ठरलेले होते. पण नियतीने  काही निराळेच ठरविले, ते कोणास कळणार?

यशवंतरावजी गेले. महाराष्ट्राचे आणि देशाचे किती नुकसान झाले, हे लवकर कळणार नाही. भूकंपाचे परिणाम लगेच मोजता येत नाहीत. पूर्वानुभवाने अंदाज करता येतो. इतरांना ज्ञात असलेल्या त्यांच्या राजकीय जीवनापेक्षा अनेक क्षेत्रांची त्यांच्या जाण्याने हानी झालेली आहे. मी तर त्यांना लहानपणापासून पाहतो, ओळखतो, मानतो. त्यांच्या राजकीय लढाया ते कशा दमदारपणे लढले, त्याचा मी अलिप्त साक्षीदार आहे.

आम्हा कारखानदार-व्यापा-यांना एखादे राज्य वा राष्ट्रच काय, देशपरदेशही आपले क्षेत्र वाटतात. कारखानदारांचे हात एखाद्या ऑक्टोपससारखे आम्ही सर्वत्र पसरतो. पण त्यातून निर्माण होणा-या संपत्तीचा लाभ आपल्या देशबांधवांना झाला पाहिजे, ही दृष्टी ख-या राजकारणी नेत्याची असते. ती यशवंतरावजींची होती. स्वातंत्र्य, भाषिक राज्य हे कारखानदारी वाढविण्यासाठी साधन आणि त्यामुळे उत्पन्न होणारी समृद्धी हे इतरांचे लाभ, अशी दृष्टी असणा-या निवडक नेत्यांत यशवंतरावांचे स्थान फार फार वरच्या क्रमांकावर होते. प्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर त्यांना आदरांजली वाहताना म्हणाले, की त्या परिसरात सुरू झालेल्या कारखान्यांना या द्रष्ट्या नेत्याकडून अमोल मार्गदर्शन मिळाले.

शंतनुरावजींचा हा अभिप्राय गेल्या पंचवीस वर्षांत महाराष्ट्रात वाढलेल्या सर्वच कारखानदारांनी व्यक्त करावा, असा प्रातिनिधिक आहे. ‘‘भारत फोर्ज’’ हे त्याच द्रष्ट्या नेत्याचे, मित्राचे स्वप्न ! ते आमच्या हातून साकार झाले, एवढेच. त्यांच्या नजरेला भारत आणि महाराष्ट्र, विशेषत: त्यांचा लाडका महाराष्ट्र, सर्वांगाने परिपूर्ण असावा, अशी त्यांची विशाल, अथांग दृष्टी होती. संघर्षाऐवजी समन्वयाने महाराष्ट्र निर्मिती साध्य केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील शेती, शिक्षण, कलाक्षेत्र, सामाजिक स्वास्थ्य या सर्व गोष्टींकडे एकदम लक्ष देण्यास सुरुवात केली. शेती मालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी सहकारी क्षेत्रात सुरू करण्याने आज महाराष्ट्राचा ग्रामीण भाग उद्धरून गेला. शेतक-यांच्या मालकीच्या जमिनीशिवाय त्याच्या जवळ तारण देण्यास काहीही नाही, अशा शेतक-याला ‘‘लँड मॉर्गेज’’ ठेवून कर्ज देणारी ही प्राथमिक सुविधा आता शेतीविकासासाठी, नव्या पिकासाठी, पाणी-पुरवठ्यासाठी, कर्ज देणारी लँड डेव्हलपमेंट बँक बनली. हे श्रेय यशवंतरावजींच्या क्षितिजाला पोहोचलेल्या विशाल नजरेला आहे. क-हाड, सांगली, कोल्हापूर भागातला ऊस, गूळ, हळद खरेदी-विक्री हा तर माझ्या कुटुंबाचाच उद्योग. त्यातले चढउतार मी पाहिले आहेत. त्या उसाचा साखर कारखाना उद्योगही महाराष्ट्रालाच नव्हे, देशाला माझ्या या थोर मित्राची देणगी आहे. त्याच वेळी सांगलीच्या परिसरात साखर उद्योगात निर्माण होणारी सुबत्ता कवठेमहांकाळसारख्या बिनपाण्याच्या, दुष्काळी भागात इतर साधनांनी पोहोचली पाहिजे, हा त्यांचा प्रेमळ इशाराही ऐकावा लागतो.

महाराष्ट्राचे साहित्यक्षेत्र, नाटक, सिनेमा, लोकनाट्याचे क्षेत्र, कोल्हापुरात जपलेली कुस्तीची कला या सा-यांचा यशवंतरावांना केवढा अभिमान. महाराष्ट्राचे दैवत शिवराय आणि देवता तुळजाभवानी यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा, निष्ठा. अनेक क्षेत्रात सारख्याच सहजतेने वावरणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व त्यांना लाभले होते आणि म्हणूनच हा सह्याद्रीच्या कुशीतला शिलेदार भारताच्या सीमारक्षणाला गेला. तेथेही चमकला, मान्यता पावला.
 
पं.नेहरूंनी ज्या विश्वासाने त्यांना दिल्लीत बोलाविले तो विश्वास त्यांनी संरक्षण, गृह, अर्थ, परराष्ट्र अशी तोलामोलाची खाती सारख्याच यशस्वितेने सांभाळून सार्थ केला. ते भारताचे नेते ठरले. एक उत्कृष्ट प्रशासक, कर्तबगार मुत्सद्दी, अबोल शांतता संस्थापक, तयारीचा संसदपटू, संसदीय लोकशाहीचा निस्सीम निष्ठावान असा थोर राजकारणी गेला. माझ्या पिताजींच्या निधनाने झाले त्यापेक्षाही यशवंतरावजींच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान जास्त झाले असे मी म्हणेन. महाराष्ट्राचे तर नुकसान झालेच. पण देश एका विलक्षण अडचणीच्या अस्थिर परिस्थितीतून जात असताना झालेले त्यांचे निधन हा नियतीचा क्रूर घालाच म्हणावा लागेल. या भूकंपाचे परिणाम पूर्ण लक्षात येण्यासाठी बराच काळ लागेल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org