मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण ७-४

या काळातच हिरे यांच्या कन्येचे लग्न ठरले. विवाहसमारंभ मालेगावात व्हायचा होता. त्यामुळे समारंभ इतमामाने व थाटाने साजरा व्हायचा होता. या समारंभाचे आग्रहाचे आमंत्रण हिरे यांनी यशवंतरावांना दिले व यशवंतरावांनी त्या समारंभास उपस्थित राहायचे असे ठरवले. ही बातमी वसंतराव नाईक इत्यादी लोकांना कळल्याबरोबर त्यांनी ताबडतोब यशवंतरावांकडे धाव घेतली व सांगितले, ‘‘काय वाट्टेल ते झाले तरी या समारंभाला तुम्ही येऊ नका. त्याचा फायदा भाऊसाहेब आपले जिल्ह्यातील वजन वाढविण्याकरता करतील. सध्या मंत्रिमंडळात नसल्याने त्यांचे वजन बरेच कमी झाले आहे. पण आपण आल्याने ते वाढेल व आम्हाला ते परवडणार नाही.’’ पण हे ऐकूनही यशवंतरावांनी विवाह समारंभास उपस्थित राहायचे नक्की केले.

त्यानुसार समारंभाला ते आले. समारंभाला खूप लोक जमले होते. यशवंतराव आल्याने सर्वांनाच बरे वाटले. भाऊसाहेबांना खूप आनंद झाला. मीही या समारंभास गेलो होतो. यशवंतरावांची भेट झाली, तेव्हा मी विचारले, ‘‘तुम्ही आलात म्हणायचे समारंभाला’’ यशवंतराव म्हणाले, ‘‘का? असे का म्हणतोस?’’ मी म्हटले, तुम्ही या समारंभास येणार नाही असा जोरात प्रचार या बाजूस चालला होता म्हणून म्हटले. यशवंतराव त्यावर म्हणाले, ‘‘हे बघ बापू, माझे व भाऊसाहेबांचे मतभेद आहेत हे खरे. पण ते राजकीय पातळीवर आहेत. वैयक्तिक त्यांचे व माझे भांडण थोडेच आहे?  विवाहसमारंभ हा खासगी समारंभ आहे. त्याला हजर राहण्याआड मी राजकीय मतभेद का आणू? ही माझी नीती नाही. वागण्याची पद्धत नाही. त्यामुळे नाशिकच्या वसंतराव वगैरेंना मी हे स्पष्ट सांगितले व मी हजर राहणारच असे स्पष्ट केले. याचा राजकीय वजन वाढविण्यासाठी भाऊसाहेब फायदा घेतील असे मला वाटत नाही.’’

मी मनात म्हटले, ‘‘काय या माणसाचे थोर विचार आहेत. राजकीय मतभेद वैयक्तिक संबंधाआड येऊ देऊ नयेत हा पायंडा सर्वांनीच पाळला तर किती चांगले होईल.’’

आपल्या जीवनात यशवंतरावांनी ही नीती पाळली व त्यामुळे द्विभाषिक राबवतानाही त्यांनी विरोधकांशी चांगले संबंध राखले. परस्परांत कटुता येऊ दिली नाही. आज देशातील सर्वच राजकारणी जर असे वागतील व ही नीती पाळतील तर राष्ट्रीय एकात्मतेला तो मोठा भक्कम आधार होईल असे वाटते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org