मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण ७-३

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात चालू होती. त्याच वेळी द्विभाषिक राज्य चालविण्याची तारेवरची कसरत यशवंतरावांना करावी लागत होती. संयुक्त महाराष्ट्र त्यांनाही व्हायला हवा होता म्हणून त्यासाठी चळवळ करणारांबद्दल त्यांच्या मनात कटुता नव्हती व त्यांच्याही मनात काँग्रेसबद्दल कटुता न यावी म्हणून यशवंतराव शर्थीचे प्रयत्न करीत होते. एस्.एम्.जोशी, डांगे इ. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालवणारांना त्यांच्या मुलाखतीसाठी दार प्रथम खुले व्हावयाचे. मग त्यासाठी काँग्रेस आमदारांना तिष्ठत राहावे लागले तरी तेही यशवंतराव करीत. याच काळात मजदूर सभेने एस्.टी. कामगारांत मान्यतेसाठी अर्ज केला होता व फेडरेशन बहुमतात गेल्याने फेडरेशनची मान्यताप्राप्त युनियन एस्.टी.त होती. पण कटुता येऊ नये म्हणून यशवंतरावांनी मजदूर सभेतर्फे एस.एम. जोशी आले व त्यांच्याशी बोलणी करून त्यांनी एक मागणीचे मान्यतेचे अभिवचन दिले. मला ते समजताच मी त्यांच्याकडे गेलो व त्यांना सांगितले, ‘‘फेडरेशन हे मान्यताप्राप्त युनियन असता तुम्ही एस्.एम्.ना मागणी मान्य म्हणून कसे सांगितलेत? हे कायदेशीर व नीतिदृष्ट्याही बरोबर झाले नाही.’’ त्यांनी न रागावत एस्.एम्.बरोबर झालेल्या बोलण्याची पाश्वभूमी सांगितली व कोणत्या परिस्थितीत त्यांना होकार दिला ते समजावून सांगितले. तरीही मी त्यांना म्हटलेच, पण हे बरोबर झाले नाही. तेव्हा ते हसले व माझ्या पाठीवर थाप मारून म्हणाले, "-oted for the future"

स्वातंर्तानंतरच्या पहिल्या मोरारजीभार्इंच्या मंत्रिमंडळात यशवंतराव व नानासाहेब कुंटे हे पार्लमेंटरी सेक्रेटरी झाले. त्या वेळेस मी धुळ्यास राहात होतो. माझी वास्तव्याची जागा अगदीच बेकार होती. तरीपण त्या जागेत मी त्यांना चहाचे आमंत्रण दिले. दोघांनी ते स्वीकारले. दोघेही माझे बालमित्र. माझ्या जागेत माडीवर येण्यासाठी त्यांना खालच्या मजल्यावरील हॉटेलातून यावे लागले. दोघांनीही संकोच मानला नाही. मलाच संकोच वाटत होता. चहापाणी झाल्यावर यशवंतराव माझ्या आईच्या पाया पडले. आईला दिसत नव्हते, म्हणून ते म्हणाले, ‘‘आई, मी यशवंता नमस्कार करतोय्.’’ आई नेहमीप्रमाणे ‘औक्षवंत हो’ असा आशीर्वाद देऊन पुढे म्हणाली, ‘‘अरे यशवंता आमच्या राजाला मुंबईत जागा दे की रे मिळवून तुझ्याकडे आहे ना ते खाते?’’ यशवंतरावाचा एकेरी उल्लेख ऐकूनही यत्विंचितही नाराज न होता यशवंतराव म्हणाले, ‘‘पाहीन हं मी, मुंबईला गेल्यावर!’’ ते गेल्यावर मी आईला म्हटले, ‘‘अगं आई, तू त्यांना ‘यशवंता’ म्हणून एकेरी अशी हाक मारलीस?’’ आई म्हणाली, ‘‘तुम्हाला झाला असेल तो यशवंतराव. मला मात्र तो यशवंताच आहे.’’ पुढे यशवंतरावांजवळ हे सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘तुझ्या आईचं बापू काही चुकलं नाही. तिला मी अजून यशवंताच आहे. त्यात आपुलकी आहे. उलट तिने मला यशवंतराव म्हटले असते तर मला बरे नसते वाटले.’’आणखी एका प्रसंग मी काँग्रेस भवनमध्ये राहात असता तेथे मुख्यमंत्री असता यशवंतराव आले होते. मी तिथे राहातो म्हणताच ते आत आले व त्याही वेळी त्यांनी आईला वाकून नमस्कार केला. आईनं आशीर्वाद दिला होता, ‘‘लोकांसाठी असाच मोठा हो.’’ महाराष्ट्राच्या आदरास पात्र झालेला एका राज्याचा हा मुख्यमंत्री माझ्या आईला वाकून नमस्कार करताना पाहून मी भारावून गेलो होतो.

यशवंतराव व भाऊसाहेब हिरे हे दोघेही सुरुवातीस संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मताचे होते. त्यासाठी सर्वपक्षीय संयुक्त महाराष्ट्र समितीतही काँग्रेसला त्यांनी सामील केले होते. पण संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला त्या वेळी पं. नेहरू व इतर काँग्रेस श्रेष्ठी तितकेसे अनुकूल नव्हते. त्यामुळे शेवटी यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्र समितीतूून अंग काढून घेतले व फलटण येथील मेळाव्यात ‘नेहरू आमचे नेते व ते सांगतील ते मी ऐकेन’ अशी घोषणा केली. भाऊसाहेब हिरे यांना ती तितकीशी पटली नाही. परंतु त्यांनी विरुद्ध जाऊन बंड केले नाही. पण मनोमनी ते त्या घोषणेच्या विरोधात होते. यशवंतरावही संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मताचे होते, पण काँग्रेसश्रेष्ठींच्या मनाविरुद्ध जाऊन व बंड करून तो मिळवावा असे त्यांना वाटत नव्हते.

या वादातून शेवटी द्विभाषिक राज्य आले. गुजरात व महाराष्ट्र एक राहिले. कर्नाटक मुंबई प्रांतातून वेगळा झाला. त्या द्विभाषिकाचे मुख्यमंत्री म्हणून हिरे यांनी निवडणूक लढवावयाचे ठरवले. त्यामुळे श्री. मोरारजीभार्इंनी माघार घेतली. तेव्हा यशवंतराव उभे राहिले व गुजरात आणि विदर्भाच्या मतावर निवडून आले. तेव्हापासून चव्हाण व हिरे असे दोन विचारसरणीचे गट जणू काँग्रेसमध्ये निर्माण झाले. विशेषत: नाशिक जिल्ह्यात वसंतराव नाईक हे भाऊसाहेबांचा द्वेष करीत अशी त्यांची वागणूक असे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org