मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण ७-१

१९४५-४६ सालची गोष्ट असेल. श्रीरामपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची सर्वसाधारण सभा होती. त्यावेळी राष्ट्रसेवादलातर्फे कै. शंकरराव देव यांचा खासगी चिटणीस म्हणून मी काम करीत होतो. राष्ट्रसेवादलाचे श्री.वि.म.हर्डीकर हे सेवादलप्रमुख होते. तेही या सभेस हजर होते. ह्या वेळपर्यंत यशवंता चव्हाण यशवंतराव चव्हाण झाला होता. महाराष्ट्रात काँग्रेसचा एक थोर कार्यकर्ता म्हणून तो गणला जाऊ लागला होता. या सर्वसाधारण सभेस मी हजर होतो. शंकरराव देव हे प्रदेश काँग्रेसचे त्या वेळी अध्यक्ष होते. त्या सभेत एका वाक्याने यशवन्तरावाने ही सभा जिंकलेली मला आठवते. आपल्या भाषणात तो म्हणाला होता, १९४२ मध्ये सातारा जिल्ह्यात झालेली प्रतिसरकारची चळवळ ही काँग्रेसच्या अहिंसेत बसत होती की नव्हती हे मला माहीत नाही. पण हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो की सर्व महाराष्ट्रात त्या वेळी काँग्रेस जर कुठे जिवंत स्वरूपात दिसली असेल तर ती फक्त सातारा जिल्ह्यातच! १९४२ ची सातारा जिल्ह्यातील प्रति सरकारची चळवळ त्या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यात उलटसुलट चर्चेचा विषय झाला होता. त्याला उद्देशून यशवंतराव हे बोलला होता. त्या एका वाक्याला जोरदार टाळ्या पडल्या व यशवंतरावाला काँग्रेस कार्यकर्त्यात अमाप लोकप्रियता मिळाली.

कराडचा माणूस म्हणजे यशवंतरावांना एक विशेष आपुलकी वाटे. तो माणूस कुठेही दिसला तरी त्याची वास्तपुस्त केल्याशिवाय यशवंतराव राहायचे नाहीत. यशवंतरावांचा विलेपाल्र्याला एक कार्यक्रम होता. तेथील पार्लेश्वर सोसायटीत कराडचे श्री. वामन जंगी, श्री. बाबू आपटे व माझा थोरला भाऊ श्री.के.वा.नेने हे रहात. त्यांनाही यशवंतराव कराडचे म्हणून आपुलकी व आदर होताच. त्यांची इच्छा की यशवंतरावांनी त्यांचे घरी यावे. प्रथम डोंगरे यांच्यामार्फत खटपट केली. पण त्यांनी परस्पर कळविले की यशवंतरावांना वेळ नाही. तेव्हा हे तिघे समक्ष यशवंतरावाला भेटले व विनंती केली. तेव्हा यशवंतराव म्हणाले, ‘‘अरे, कराडची माणसे म्हटल्यावर मी त्यांचेकडे जाणार नाही हे शक्य तरी आहे का?’’ त्या तिघांनी डोंग-यांचे उत्तर सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘अरे, त्यांना काय माहीत कराडच्या माणसांबद्दलची माझी आपुलकी? मी लक्षात ठेवून येईन.’’ त्यानुसार विलेपाल्र्याचा कार्यक्रम आटोपून ते श्री. वामन जंगी यांच्या दोन खोल्यांच्या संसारात आले. तेथेच बाकीचे दोघेही व मीही होतो. १५-२० मिनिटे गप्पा व जुन्या आठवणींना उजाळा देऊन ते निघून गेले. यशवंतरावांची ती आपुलकी पाहून मी तर गहिवरून गेलो होतो.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत यशवंतरावांची फार ससेहोलपट झाली. मनाने ते संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने होते, पण अद्याप ते स्वप्न साकार होण्याची वेळ आली नव्हती असे त्या काळच्या परिस्थितीनुसार वाटे व ते बरोबरही होते. सं.महाराष्ट्राच्या मागणीत म.काँग्रेस बरीच पुढे गेली होती व त्यामुळे काय करावे, एक प्यादे मागे कसे घ्यावे हा विचार त्यांना सतावत होता. जनमत संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने होते. पण त्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने लढायचे ठरवले तर काँग्रेसशीच लढा करायचा असा त्याचा परिणाम दिसत होता. तेव्हा यातून बाहेर पडायचे ठरवून त्यांनी फलटण येथे ‘नेहरू सांगतील ते मी मानीन’ अशी घोषणा करून काँग्रेसला वाचविण्याचे मोठे धारिष्ट्याचे पाऊल टाकले यात संशय नाही. त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या व त्यातच १९५७ ची निवडणूक उभी राहिली. त्यात काँग्रेसला मोठा पराभव महाराष्ट्रात पत्करावा लागला. गुजरात विदर्भांत मात्र काँग्रेस विजयी झाली होती. यशवंतरावही कराड मतदारसंघातून अवघ्या ३२६ च्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यानंतर मुख्यमंर्त्याच्या निवडणुकीत भाऊसाहेब हिरे विरुद्ध यशवंतराव अशी लढत झाली व गुजरात व विदर्भातील मतांच्या जोरावर यशवंतराव विजयी झाले होते. त्या वेळी फलटण येथे यशवंतरावांनी घेतलेली भूमिका मला मान्य नव्हती. म्हणून त्यांना कसून विरोध करून भाऊसाहेब हि-यांची बाजू मी घेतली. महाराष्ट्राची सर्व ११८ मते भाऊसाहेबांना पडली. यशवंतराव विजयी झाल्यावर त्यांचे अभिनंदन करावयास त्यांच्या बंगल्यावर गेलो. त्यांना भेटलो व सांगितले, ‘‘यशवंतराव, तुमच्याशी मी भांडलो. पण त्यात वैयक्तिक काहीही नव्हते. माझे अभिनंदन स्वीकारा.’’ यशवंतरावांनी हसून म्हटले. मीही ते वैयक्तिक असे मानीत नाही. निवडणुकीबरोबरच ते संपले. आणि शेजारी बसवून घेऊन त्यांनी मला चहा पाजला.

१९३० सालापासून चळवळीत भाग घेणारा व स्वातंर्तानंतरही सातत्याने सार्वजनिक कार्य करीत राहणारा एक कराडचा कार्यकर्ता म्हणून त्यांना माझ्याबद्दल आपुलकी वाटे व ते अनेक वेळा मी पाहिलेही आहे. द्विभाषिकाचे व नंतर संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा मी त्यांना भेटलो, चर्चा केल्या, भांडलो, मतभेद प्रगट केले. पण मला कधी दूर केले नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org