मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण ६-१

निवडणुकांचे दिवस होते! तेव्हा माण तालुक्याची जबाबदारी मी व  माधवराव जाधव यांच्यावर असे! साहेबांची सभा म्हटल्यावर तालुक्यातून  तुफान गर्दी जमलेली! जेवण आ.आण्णासाहेब जाधव यांचेकडे केले व एक अर्धा तास विश्रांती घेऊन स्टेजवर-दहिवडी-यावयाचे!! तालुका पंचायतीतील गाद्या आणलेल्या. मी स्वत: सर्व तपासले व बैठका घातलेल्या! मी सभेकडे निघून गेलो. इतक्यात कुठून विंचू आला व साहेबांना चावला! त्यांना तर तो चढतो. सर्वत्र एकदम गडबड सुरू झाली! सर्व डॉक्टर जमा झाले! मांत्रिक जमा झाले! अंगारेधुपारे आले!! साहेबांनी सर्वांना सांगितले, ‘‘मला औषध घ्यावयाचे नाही! इंजेक्शन वगैरे काही नाही! इतक्यात मी आलो व पाहिले तर कपाळास घाम फुटलेला! मी म्हटले, ‘‘एक विडा देऊ का?’’ ‘‘द्या’’ म्हणाले,
औषध घालून विडा दिला! किंचित कमी झाले पण वेदना होत होत्या !

आत्मिक सामथ्र्य एवढे की, ते स्टेजवर बोलू लागले! अखंड १।। तास बोलले, यांना विंचवाच्या कळा चालू आहेत हे सांगून खरे वाटणे कुणास शक्य नाही !

व्याख्यान संपल्यावर विचारले, ‘‘कळा येत आहेत?’’ ‘‘होय!’’ ‘‘अरे भाई त्याचे काम तो करतो, माझे काम मी करतोय !!’’ पुन्हा चेहे-यावर ते हसे, तो विनोद, तो आनंद! एवढे सामथ्र्य - मनाची तयारी - येरे गबाळ्याचे काम नव्हे !

ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचे दिवस होते. दे.भ.शंकरराव देव, भाऊसाहेब हिरे आदी काँग्रेसमधील नेतेसुद्धा भावनांच्या आहारी गेल्याने आपण काय करतो आहोत हे त्यांना समजेना! आपले चुकते आहे ते उमजेना! सर्व विरोधी पक्ष व काँग्रेस कमिटी, प्रांतिक यांची सर्वपक्षीय सभा घेऊन त्यात दे.भ.शंकरराव देवांना सर्वांनी सर्वाधिकारी नेमले! मा. यशवंतराव हे या गोष्टीस विरोधी होते. ‘‘बाकीच्या सर्व विरोधी पक्षांच्या पुढा-यांची गोष्ट वेगळी आहे व आपली काँग्रेसजनांची गोष्ट निराळी आहे! आपल्या आंदोलनास मर्यादा आहेत! वर आपलेच सरकार आहे! त्याची शिस्त, बंधने आहेत! बाकीचे सर्व पक्ष म्हणतील महाराष्ट्राची काँग्रेस मोडून टाकावी! बरखास्ती करावी. अरे, आज सुमारे ७० वर्षे सर्वस्वी त्यागाने, सेवेने, राष्ट्रीय वृत्तीने काम करते आहे तिला नष्ट करणारे आपण कोण?’’

मा. यशवंतरावांचे हे म्हणणे काँग्रेसमधील लब्ध प्रतिष्ठांना पटेना! त्यांनी असे ठरवले की, यशवंतलाच काँग्रेस कमिटीतून काढून टाकू या! दे.भ.शंकरराव देवांना सर्व पक्षीयांच्या समितीचे अध्यक्ष नेमून त्यांना दिल्लीस वरिष्ठांच्या वाटाघाटीस पाठवून जर वरचे मानीनात तर त्यांना सांगून टाकावयाचे, ‘‘आम्ही सर्वांनी हे राजीनामे आणलेत!’’ अशा त-हेने यशवंतरावांचा मधला काटाच काढावयाचे ठरवले! त्यांना प्रांतिकची मीटिंग बोलवा म्हटले तर प्रांतिक मीटिंग बोलवेना- मग ताबडतोब फलटणला येऊन जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग घेऊन दिल्लीस पंडितजींना तार दिली, ‘‘काँग्रेसचे म्हणणे म्हणून मांडावयास आलेल्या मंडळींच्या विचारांस आमचा विरोध आहे! संपले, दे.भ.शंकरराव देवांच्या फुग्यातील हवाच निघून गेली! महाराष्ट्र प्रांतिकच्या कार्यकारिणीच्या मीटिंगपुढे ठराव मांडून तेथे निर्णय होईल तो सर्वांनी मानावयाचा! - वास्तविक सर्व सभासद दे.भ.देव व भाऊसाहेब हिरे, या बाजूचे परंतु ज्या वेळी यशवंतराव बोलावयास उठले त्या वेळी जसा एखादा शूर वीर योद्धा आत्मविश्वासाने युद्ध करतो तसे अखंड दीड तास भाषण झाले. सर्व काँग्रेसच्या कामाचा आढावा घेतला व ‘‘एखाद्या कामासाठी ही संस्था नष्ट करावी? शेकडोंचे बलीदान, त्याग, व्यर्थ घालवावा?’’ असे विचारले. ते भाषण काँग्रेसच्या जीवनमरणाचे शेवटच्या क्षणी अमृतासारखे अजरामर झाले. ठराव यशवंतरावांच्या बाजूने पास झाला! विरोधी पक्षांचा काँग्रेस नाशाचा व्यूह ढासळत गेला.प्रतापगड काय, किंवा पुण्यास ऑल इंडिया वर्किंग कमिटीची भरलेली सभा काय, ‘‘दोन्ही बाजूंनी आता मारामारी होऊन आपसात मुडदे पडणार काय?’’ असे प्रसंग आले तरी स्वत:च्या बुद्धिकौशल्याने निराळाच मार्ग काढून प्रतापगडची मारामारी साहेबांनी होऊ दिली नाही. तर पुण्याच्या वर्किंग कमिटीच्या वेळी विरोधी पक्ष मोर्चा आणणार होते. मोर्चा म्हणजे काय? मारामारीच! तोंडाने म्हणावयाचे शांततामय! पण रक्ताचे दोन्ही बाजूंचे म्हणजे आपसातील रस्त्यावर सडेच की !! आम्ही, किसनवीर वगैरे, इकडे मारामारी कशी करावयाची याचे व्यूह रचत होतो तर कुणास न सांगता तिकडे एकटेच यशवंतराव टॅक्सीत बसून केसरी वाड्यात गेले! विरोधी पक्षांतील पुढा-यांशी चर्चा करून मोर्चाचा मार्ग ठरवून घेतला व मारामारी टाळली! ठरल्या रस्त्याने मोर्चा गेला. वर्किंग कमिटीचे सभेचे काम अतिशय उत्कृष्टपणे दोन दिवस पार पडले!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org